ढिंग टांग!  : राजकारण करु नका! 

ब्रिटिश नंदी
Monday, 21 September 2020

साधं आहे का संकट? एकत्र लढू. 
कोरभर भाकरी सात जणात वाढू. 
हात धुवा, मास्क लावा, दो गज की दूरी 
असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी! 

ते म्हणाले : 
साधं आहे का संकट? एकत्र लढू. 
कोरभर भाकरी सात जणात वाढू. 
हात धुवा, मास्क लावा, दो गज की दूरी 
असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी! 
काहीही करा, घरातल्या घरात 
पण करु नका राजकारण 
खुर्च्यांच्या पळवापळवीत 
ओढवेल ना मरण! 
हे म्हणाले : ठीकाय, ठीकाय! 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ते म्हणाले : 
साधं आहे का संकट? एकत्र लढू. 
सगळं संपल्यावर एकमेकांना नडू. 
मुलांची प्रकृती महत्त्वाची, नकोतच परीक्षा 
असल्या काळात बिचाऱ्यांना ही कुठली शिक्षा? 
काहीही करा, पण करु नका राजकारण! 
खुर्च्याच्या पळवापळवीत ओढवेल मरण! 

हे म्हणाले : बाऽऽरं, बाऽऽरं! 

ते म्हणाले : 
साधं आहे का संकट? एकत्र लढू. 
एवढ्यातेवढ्यावर नका ना चिडू. 
एक अभिनेता जिवानिशी गेला 
त्याच्या मृत्यूचं राजकारण कशाला? 
काहीही करा, पण करु नका राजकारण 
खुर्च्यांच्या पळवापळवीत ओढवेल मरण 
हे म्हणाले : ओक्के, ओक्के ! 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ते म्हणाले : 
साधं आहे का संकट? एकत्र लढू. 
नंतर पाहिजे तर एकमेकांवर चिडू. 
मार्गी लागू द्या मराठा आरक्षण 
आपलं ऐक्‍य आहेच की विलक्षण 
काहीही करा, पण करु नका राजकारण 
खुर्च्यांच्या पळवापळवीत ओढवेल मरण! 
हे म्हणाले : हो ना, हो ना! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते म्हणाले : 
आपण शेवटी सगळेच मराठी 

काढून टाका ती कपाळाची आठी 
खुर्चीचं काय, ती कुठे का असेना, 
कधी तुमची, कधी माझी असेना 
हवं कशाला खुर्चीचं भांडण? 
फुकाचं कडवट, हीन राजकारण? 
हे म्हणाले : अच्छा? बरं बरं! ठीकाय ठीकाय! 
ओक्के ओक्के! हो ना, होना! 

एवढं म्हणून "हे' खुर्ची ओढू लागले 
तेवढ्यात "ते' सुध्दा खुर्ची ओढू लागले. 
खुर्चीच्या ओढाओढीत रंगलं राजकारण 
त्यांचा होतो खेळ, आणि आमचं मात्र मरण! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article about politics