esakal | ढिंग टांग:  हरि हरि ते हरि ॐ : ! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग:  हरि हरि ते हरि ॐ : ! 

लॉकडाउन नावाचा शब्द केराच्या टोपलीत टाकून ‘मिशन बिगिन अगेन’ला प्रारंभ होत आहे. ‘म्हंजे पुनश्‍च हरि ॐ’! यातील ‘पुनश्‍च’ हे ठीक आहे, पण आपण मुळात ‘हरि ॐ’ कधी केले, असा प्रश्न काही जणांना पडेल.

ढिंग टांग:  हरि हरि ते हरि ॐ : ! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

लॉकडाउन नावाचा शब्द केराच्या टोपलीत टाकून ‘मिशन बिगिन अगेन’ला प्रारंभ होत आहे. ‘म्हंजे पुनश्‍च हरि ॐ’! यातील ‘पुनश्‍च’ हे ठीक आहे, पण आपण मुळात ‘हरि ॐ’ कधी केले, असा प्रश्न काही जणांना पडेल. अशांसाठी आणि एकंदरितच काही अतिउत्साही मंडळींसाठी आम्ही येथे काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करीत आहोत. ‘मिशन बिगिन अगेन’ ही एक प्रक्रिया आहे. ती आधी समजून घेतली पाहिजे. आता ही प्रक्रिया, म्हंजे नेमकी काय भानगड आहे, असे कोणी विचारील. तर त्याचे सरळसोपे शास्त्रीय उत्तर असे : 

त्याचे असे आहे की, प्रचड्ड पडसे झाल्यावर दाक बद्द होते. बोलतादासुद्धा त्रास होतो. श्वास घेडे दुरापास्त होते. ‘बला गरब पाडी हवं आहे’ अशी विदत्ती करुदही काहीही बिळत दाही. कारड आपड काय बोल्तो आहे, हेच बुळात लोकाद्दा कळत दाही!! डोक्‍यात बद्द बद्द आवाज येऊद काहीही सुचेदासे होते. पडसे झालेल्या बाडसाच्या चेहऱ्यावर एकप्रकारचा बावळट्टपडा येतो, तो याबुळेच!! अशा वेळी काय क्रावे, अं? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

...डोक्‍यावर आंघोळीचा टावेल घेऊन गरम पाण्याच्या भांड्यावर वाकावे आणि छानशी वाफ घ्यावी. जमले तर त्यात थोडी निलगिरी टाकावी. नाकाच्या अंतर्भागातील सर्व ट्राफिक जाम पाच-दहा मिनिटांत सुटतो व रस्ता वाहता होतो. चेहरा घामाघूम होतो, पण नाक सुटते. वाचकहो, ‘मिशन बिगिन अगेन’ हा असा वाफारा आहे, ज्याने चोंदलेला जीवनमार्ग काहीसा मोकळा होतो. 

काही मार्गदर्शक तत्त्वे :  
एक, दुकानेबिकाने सुरू झाल्यामुळे सारे काही आलबेल असून, कोपऱ्यावरल्या टपरीवर टहलून यावे, असे मनात आले तरी लगेच जाऊ नये. सदर टपरी सम-विषम तारखांपैकी कुठल्या तारखेला उघडी सापडेल, याचा आधी शोध घ्यावा. उदाहरणार्थ, डावीकडील टपरी सम तारखेला उघडी आढळल्यास दुसऱ्या दिवशी यानेकी विषम तारखेस ती बंद असणार, याचे भान हरेकाने ठेवावे. अन्यथा खेप फुकट जाईल. 

दोन, समटपरी बंद आढळल्यास विषमटपरीकडे जाऊ, हा बेसावधपणा झाला! कारण सम-विषमपैकी जिथे उधारी चालते, तिथेच जाणे श्रेयस्कर असते, हे भान सावधचित्त व्यक़्तींना जन्मजात असते. 

तीन, दुकानाच्या काऊण्टरवर कोपर ठेवून ऑर्डर देण्याची ऐट विसरावी! ते दिवस गेले!! तसे केल्यास काऊण्टरच्या पलीकडील व्यक़्तीकडून अपमान होण्याची दाट शक्‍यता आहे, हे ध्यानी असो द्यावे!! 

चार, दुकानात गेल्या गेल्या मालकापुढे निमूटपणाने हात पुढे करावा. गूळखोबरे अथवा टाळी मिळेल, अशी अपेक्षा ठेवू नये. सॅनिटायझरचे दोन थेंब तेवढे मिळतील! (त्याची किंमत तुम्ही विकत घेतलेल्या अर्धा किलो रव्यात अंतर्भूत करण्यात आली आहे, हेही लक्षात ठेवावे.) 

पाच, ज्या प्रमाणे काही दुकाने बंद दिसली तरी ती सुरू असतात, हे आपण लॉकडाउनच्या काळात पाहिले, त्याचप्रमाणे, काही दुकाने उघडी दिसली तरी ती बंद असू शकतात, याचा अनुभव ‘मिशन बिगिन अगेन’च्या काळात येऊ शकेल! मनाची तयारी ठेवावी!! 

सहा, तुळशीबाग (अर्थात पुणे!) सुरू झाली याचा अर्थ सारे विश्व सुरू झाले, असे मानून चालू नये. आणि सातवे आणि शेवटचे कलम- 

लॉकडाउनमधील सर्व नियम पाळावेच लागतील, अन्यथा ‘पुनश्‍च हरि ॐ’चे रुपांतर ‘पुनश्‍च हरि हरि’मध्ये करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.