ढिंग टांग! : देवस्थान!

ब्रिटिश नंदी
Thursday, 15 October 2020

रोज चालते काकडारती 
रोज वाजतो टाळ मृदंग 
रोज घणघणे घंटनादहि 
रोज दाटतो कीर्तन रंग 

गाभाऱ्यामधी रोज कोंदतो 
धूर, धुपाचा गंध खडा 
आणि उद्याच्या निर्माल्यासम 
पुष्पराशिचा पडे सडा 

घाटावरले सुरेख राऊळ 
चिरेबंदीवर सोनकळस 
पुढ्यात आहे घाट उतरता 
मागील रानामध्ये पळस 

आवारामधी उंच उभी अन्‌ 
लेकुरवाळी ती दीपमाळ 
स्वच्छ पटांगण आरसपानी 
गजबजलेला गावरहाळ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फुलवाल्यांचे मृदू हाकारे 
तबकामध्ये गेंदफुले 
हारतुरे दुरवा, फुलपत्री 
भक्तांची बा रांग डुले 

कुठे लोंबती इष्ट दुकानी 
करदोट्याच्या कृष्णसरी 
मूर्ति चिमुकल्या, प्रसादलाह्या, 
पेढे, बर्फी विविध परी 

सूर्य उगवता झळाळतो हा 
किरीट माझ्या गावाचा 
देव आतला कुणा न माहीत 
नाही कुणाच्या नावाचा 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रोज चालते काकडारती 
रोज वाजतो टाळ मृदंग 
रोज घणघणे घंटनादहि 
रोज दाटतो कीर्तन रंग 

गाभाऱ्यामधी रोज कोंदतो 
धूर, धुपाचा गंध खडा 
आणि उद्याच्या निर्माल्यासम 
पुष्पराशिचा पडे सडा 

देव येथला आहे जागृत 
कुणी लावितो त्याला कौल 
आडरातीला दर्शन घेता 
शापवाणीची पडेल भूल 

पंचक्रोशीचे पोट चालते 
देवचि माझा माय नि बाप 
तोच घालतो पोटाला अन्‌ 
दूर सारतो हा भवताप 

सुघड साजिरी सुंदर मूर्ती 
रूप साजरे गे सुकुमार 
दर्शनहेळामात्रे व्हावा 
दूरचि सारा बा शिणभार 

परंतु, घडले आक्रित सारे- 
होत्याचे नव्हते घडले 
राजकारणी आखाड्यामधी 
दैवत माझे सांपडले! 

एके दिवशी बंद जाहले 
देऊळ, त्याचे बंद कवाड 
बंद जाहला घंटनादहि 
अन्‌ नशिबाला भरली धाड 

नवस संपले, कौल निमाले 
जागृत दैवत झाले कैद 
सामसुमीची नवी राजवट 
म्हणते दर्शन असे अवैध 

मंदिर उघडा, कुणी ओरडे 
कुणी दटावे, म्हणते "चूप' ! 
भक्तजनांचा शुष्क उमाळा 
कुणी न घाली त्याला धूप 

देऊळबंदी गाजू लागली, 
राजकारणां आला ऊत 
देव राहिला बाजूला अन्‌ 
"मतवाल्यां'चे जुळले सूत! 

असाच असतो, अगा ईश्वरा 
कलियुगाचा नेम बरा 
तुझ्या पुढ्यातील तबकापेक्षा 
मतपेढीचा गेम खरा! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article about temple