esakal | ढिंग टांग :  वाघाचे दिवस! (एक अरण्यकथा...)
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग :  वाघाचे दिवस! (एक अरण्यकथा...)

‘‘आख्ख्या होल इंडियात तीन हजार टायगर्स आहेत, असं म्हणतात! खरंय का?’’ छोट्या शिकाऱ्याने जनरल नालेजचा प्रश्न विचारला. या वयातही आपले लेकरू डिस्कवरी च्यानल बघते, हे जाणवून त्याचा ऊर अभिमानाने भरून आला.

ढिंग टांग :  वाघाचे दिवस! (एक अरण्यकथा...)

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

नुकताच पाऊस पडून गेला होता. जंगल सुस्नात झाले होते. आज ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन’ आहे, हे बहुधा जंगलाला माहीत असावे! माकडांच्या फौजा ‘खिसर्र खक खक’ असा घशातून आवाज करीत फळे खात होत्या. मोरांच्या केका सुरू होत्या. बाड्ड्यांचे थवे तळ्याच्या दिशेने कलकलाट करीत उडत चालले होते. (बाड्डे म्हंजे बदके हं! हे काही कुणाचे आडनाव नाही! ) धावडा, सावर, अमलताश, लेंडिया, (हे झाडाचे नाव आहे.) टेंबुर्णी, हळदू अशी झाडे ओलीचिंब झाली होती. अशा सुंदर दिवशी दोन अरण्यप्रेमी आणि व्याघ्रप्रेमी शिकारी पायपीट करत जंगलात हिंडत होते. तुम्ही म्हणाल, अरण्यप्रेमी आणि व्याघ्रप्रेमी स्वत:च शिकारी कसे? तर त्याचे उत्तर ‘आहेतच मुळी’ एवढेच आहे. 

‘‘बॅब्स, अजून किती चालायचं आहे?’’ छोट्या शिकाऱ्याने मोठ्या शिकाऱ्याला विचारले. उत्तरादाखल मोठ्या शिकाऱ्याने ‘हुफ्फ’ असा ध्वनी घशातून काढला. गवतातल्या फत्तरावर पाय मुरगळला असावा!  पण मोठा शिकारी सावध होता. झिलाणीलगतच्या नेपतीच्या झुडपात झालेली हलकी खसफस  त्याच्या अनुभवी कानांनी लागलीच टिपली होती. झिलाणीलगत मचाण बांधून घ्यायला हवे, असा विचार त्याच्या मनात डोकावून गेला. झुडपातल्या आवाजाने त्याने कान आणखीनच टवकारले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

‘‘वाघ दिसेल ना, बॅब्स?’’ छोट्या शिकाऱ्याने पुन्हा विचारले. मोठ्या शिकाऱ्याने त्याला तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्यास फर्मावले.

‘‘का बोलू नको?’’ छोट्या शिकाऱ्याने निरागसपणे मोठ्या आवाजात विचारले. त्यावर खवळलेल्या मोठ्या शिकाऱ्याने दात ओठ खात डोळे वटारून ओठाच्या भेदक हालचाली करत ‘गप्प बसायला काय घेशील?’ असे विचारले. मग थोड्या वेळाने संयमाने तो म्हणाला, ‘‘दिसेल हो दिसेल! अर्थातच दिसेल! हल्ली आपल्याकडे वाघांची संख्या जाम वाढली आहे! दिसल्याशिवाय राहणार नाही.  किंबहुना दिसायलाच हवा!’’  

‘‘आख्ख्या होल इंडियात तीन हजार टायगर्स आहेत, असं म्हणतात! खरंय का?’’ छोट्या शिकाऱ्याने जनरल नालेजचा प्रश्न विचारला. मोठ्या शिकाऱ्याला कौतुक वाटले. या वयातही आपले लेकरू डिस्कवरी च्यानल बघते, हे जाणवून त्याचा ऊर अभिमानाने भरून आला.

 ‘‘बरं का चिरंजीव! आपण प्रयत्न केले म्हणून वाघांची संख्या वाढतेय दिवसेंदिवस!’’ मोठा शिकारी म्हणाला. 

‘‘बॅब्स, वाघांची संख्या तुम्ही वाढवलीत ना?’’ छोट्या शिकाऱ्याचा मोठा प्रश्न.

‘‘तूसुद्धा वाढव हो!!’’ मोठ्या शिकाऱ्याने मायेने छोट्या शिकाऱ्याच्या डोक्‍यावर टप्पल मारली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘मुनगंटीवारकाकांनी वाघ वाढवले की तुम्ही?’’ छोटा शिकारी ऐक्कत नव्हता. मुनगंटीवारकाकांचे नाव ऐकताच मोठा शिकारी चपापला आणि त्याने दातओठ खाल्ले.  

‘‘छे, त्यांच्याकडे तेवढी कुठली आलीये पॉवर?’’ मोठा शिकारी तुच्छतेने म्हणाला. तेवढ्यात झिलाणीच्या लगत कुठल्याशा जनावराचा स्पष्ट कडका लागला. (कडका म्हंजे अरण्यवाचनाच्या भाषेत चाहूल हं! ) माकडांनी ‘खर्रर्र खक खक’ असा (मावा थुंकल्यासारखा) कॉल दिला. हरणांनीही धूम ठोकली. केमकुकडी ओरडली. पाणथळीतले बाड्डे भर्रदिशी उडाले. हुदाळे पाण्यात बुडाले. (हा प्राणी एकदा बघावाच लागणार आहे. असो.) रानडुकरांची एक सहार (म्हंजे रांग हं!) पळत गेली. असे सगळे झाले की समजायचे ‘वाघ आला’ !! किंबहुना, शिकाऱ्यांच्या भाषेत ‘वाघ आला’ एवढे सांगण्यासाठी इतके सगळे तपशीलवार सांगावे लागते. हे सगळे घडेपर्यंत दोन्ही शिकारी गप्प उभे राहिले. 

थोड्या वेळाने छोट्या शिकाऱ्याने शांततेचा भंग करीत मोठ्या शिकाऱ्याला मोठ्या आवाजात निरागसतेने विचारले.- ‘‘आपण आलो, म्हणून हे सगळं घडलं का बॅब्स?’’

मोठा शिकारी खुदकन हसला!