esakal | ढिंग टांग : तेरी कमीज, मेरी कमीज!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : तेरी कमीज, मेरी कमीज!

शुद्ध भगवा आता फक्त आमच्या खांद्यावर आहे बरं! तुमच्या भगव्याचा रंग बदलून आता मळखाऊ झालाय! राकेल मिसळलेल्या पेट्रोलसारखा भेसळयुक्त भगवा आहे तो! त्याची काय मिजास सांगता? हमारी कमीज तुम्हारे कमीजसे ज्यादा भगवी है!!

ढिंग टांग : तेरी कमीज, मेरी कमीज!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

अपरात्रीची वेळ आहे. मुंबई असल्याने ऐन नव्हेंबरात असह्य उकडते आहे! अंत:पुरात काळोख आहे. गवाक्षाकडे (पक्षी : खिडकी हो!) तोंड करोन कुणीतरी उभे आहे. तेवढ्यात ठेचकाळत मा. उधोजीराजे प्रविष्ट होतात. अब आगे...

उधोजीराजे : (ताडताड पावले टाकीत येत) कोण आहे रे तिकडे? इथली जाजमे कोण उचलणार! जाजमाच्या धाग्यांमध्ये आंगठा अडकून एखादा तोंडघशी पडेल!! एकजात सगळे आळशी, बिनकामाचे!!

कमळाबाई : (गवाक्षाकडे तोंड करुन) खुद!!

उधोजीराजे : (चमकून) कोण...कोणेय तिकडे! मित्र की शत्रू?

कमळाबाई : (खोडकरपणे) मित्र आणि शत्रू दोन्हीही!!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उधोजीराजे : (दुप्पट चमकून) क...क...कोण? तुम्ही? तुम्ही इथं कशा? आय मीन तुम्ही इथं पोचलात कशा? कुणी सोडलं तुम्हाला आत? तुमचा मास्क कुठे आहे? कां आलात?

कमळाबाई : (अचंब्यानं) अगं बाई बाई बाई बाईऽऽ..! एका वेळी किती ते सवाल!! एकावेळी एकच विचारा गडे!

उधोजीराजे : (घायकुतीला येत) गडे नाही नि...काही नाही!! तुम्ही इथून आधी तोंड काळं करा! कुणी पाहिलं तर काय म्हणेल?

कमळाबाई : (लाडात येत) काय म्हणतील- हेच की यांचं अजूनही गॉटम्याट आहे! खुखुखु!!!

उधोजीराजे : (संतापाचा कडेलोट होत) खामोश! खांडोळी करीन!!

कमळाबाई : (हेटाळत) तोंड बघा खांडोळी करणाऱ्याचं! आणि तलवार कुठाय तुमच्या कमरेला? ती नेली काढून त्या तुमच्या नव्या साथीदारांनी! बाई गं, किती हे एखाद्याचं पतन व्हावं!! म्हंटात ना, दैव देतं नि कर्म नेतं!!

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उधोजीराजे : (असह्य संतापातिरेकानं) चे-ची-न!! आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा! या भगव्या रक्ताचा स्फोट होण्याआधी इथून टळा!! नपेक्षा घात होईल!

कमळाबाई : (आश्‍चर्यानं) भगवं रक्त? ते कुणाचं?

उधोजीराजे : (आव्हान देत) हा काय सवाल झाला? आमचंच रक्त भगवं, देश भगवा, आणि झेंडाही भगवा!

कमळाबाई : (कुत्सितपणे) ऐकेल कुणी! त्या कांग्रेसवाल्यांसोबत सामील झाल्यावर तुमचा भगवा फिक्का होऊन पिवळा पडलाय...जुन्या वर्तमानपत्रासारखा!!

उधोजीराजे : (दात ओठ खात) कोण आमच्या भगव्याबद्दल अनुदार उद्गार काढते आहे? जीभ हासडून हातात ठेवीन!!

कमळाबाई : (ठामपणाने) शुद्ध भगवा आता फक्त आमच्या खांद्यावर आहे बरं! तुमच्या भगव्याचा रंग बदलून आता मळखाऊ झालाय! राकेल मिसळलेल्या पेट्रोलसारखा भेसळयुक्त भगवा आहे तो! त्याची काय मिजास सांगता? हमारी कमीज तुम्हारे कमीजसे ज्यादा भगवी है!!

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उधोजीराजे : (अभिमानाने) कुणाचा भगवा शुद्ध आहे नि कुणाचा अशुद्ध...हे आता निवडणुकीच्या मैदानातच कळेल!

कमळाबाई : (पदर खोचून) निवडणुकीला अजून चांगली दोन वरसं अवधी आहे!

उधोजीराजे : (गुर्मीत) दोन असोत, वा दोन हजार! भगवा, भगवाच राहणार!

कमळाबाई : (टोमणा हाणत) दोन वर्षात तुमच्या भगव्याचा रंग उडून शरणागतीचा पांढरा रंग उरेल, तेव्हा आम्हाला बोल लावू नका! आधीच सांगून ठेवत्ये! काही झालं तरी तुम्ही आमचे जुने सांगाती आहा!! आम्ही जुन्या सांगात्यांचंही भलं चिंतितो बरं! हा आमचा तुम्हाला दिलेला शब्द समजा!

उधोजीराजे : (बेदरकारपणे) हु:!! तुमच्या शब्दाला आमच्या लेखी कवडीची किंमत नाही!

कमळाबाई : (एक डेडली पॉज घेत) आम्ही शब्द पाळतो, हे बिहारच्या निवडणुकीनंतर तरी लक्षात आलंय का? शेवटी जो देतो सत्तेचा मेवा - तोच असतो शुद्ध भगवा!