esakal | ढिंग टांग: पुन्हा अभिनंदन! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग: पुन्हा अभिनंदन! 

आनंदाची बातमी दौडत दौडत आली, की तुम्ही एकदाचे आमदार झालात! कित्ती आनंद झाला म्हणून सांगू? लॉकडाउन नसता तर स्वत: पुष्पगुच्छ घेऊन "मातोश्री'वर आलो असतो.शुभेच्छा दिल्या असत्या!! 

ढिंग टांग: पुन्हा अभिनंदन! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत नमस्कार. अतिशय आनंदाने आणि समाधानाने आपल्याला हे पत्र लिहीत आहे. सध्या लॉकडाउनमध्ये दिवस खायला उठतो. (अक्षरश: खायला उठतो. काय सांगणार?) जीवनात विलक्षण पोकळी निर्माण झाली होती. त्यात लॉकडाउन आल्याने पोकळीत पोकळी निर्माण झाली. मन काळवंडले होते. तेवढ्यात ती आनंदाची बातमी दौडत दौडत आली, की तुम्ही एकदाचे आमदार झालात! कित्ती आनंद झाला म्हणून सांगू? लॉकडाउन नसता तर स्वत: पुष्पगुच्छ घेऊन "मातोश्री'वर आलो असतो. रांगेत उभा राहिलो असतो आणि शुभेच्छा दिल्या असत्या!! आमच्या मुनगंटीवारजींनी तर आणखी एक कचकड्याचा वाघ तयार करायला घेतला होता. मागल्या खेपेला त्यांनी दिलेला असा वाघ तुम्हाला भारी आवडला होता ना? पण सारे राहून गेले. मगर ये हो न सका, और अब न रहे अरमान...असो! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तुमची आमदारकी बिनविरोध आणि विनासायास झाली, हे बाकी टॉप झाले. आता एकदम फायनल काम झाले, असे समजायला हरकत नाही. तशी तुमची खुर्चीदेखील बिनविरोध आणि विनासायास झाली होती म्हणा! एका माणसाची आता जाम मज्जा आहे. पांचो उंगलियां घी में और सर कढाई में! लक्की हं! आम्हा लोकांना उन्हातान्हात फिरावे लागते, तेव्हा कोठे आमदारकी मिळते. उलटेसुलटे राजकारण करावे लागते, तेव्हा कुठे खुर्ची मिळते. तुम्हाला सगळेच रेडिमेड! पंचतारांकित हाटेलात रात्री- अपरात्री फिरलात आणि मुख्यमंत्रीच झालात. बंगल्यात बसून आमरस खात खात आमदार की हो झालात! हे म्हंजे एखाद्याने रेशनचे डाळ-तांदूळ मागावेत आणि त्याच्या पुढ्यात पकीपकायी हुई शिवभोजन थाळीच यावी असे झाले!! 

तुमच्या आमदारकीबाबत सुरवातीला नाही म्हटले तरी थोडी धाकधूक होती. ऐनवेळी काही झाले नाही, तर विनाकारण मलाच पुन्हा उचल खावी लागते की काय असे वाटू लागले होते. म्हणून मी आधीच "मी पुन्हा येईन' असे म्हणून ठेवले होते. आठवते ना? उमेदवारीचा अर्ज भरताना काही गडबड व्हायला नको, म्हणून डमी अर्ज भरून ठेवतात ना? तसा मी तुमचा डमी उमेदवार आहे, असे समजा! माझ्या "मी पुन्हा येईन'चा अर्थ तोच होता, हे आता तुम्हाला कळलेच असेल. जाऊ दे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरे तर "तुमचे काम करून टाका,' अशी गळ मी सर्व वरिष्ठांना घातली होती. पण काही ना काही कारणाने तुमची आमदारकी लांबत गेली. तुमच्यासाठी मी कमी का प्रयत्न केले? राजभवनापासून दिल्लीपर्यंत सगळीकडे निरोप पाठवले. फोनवर रदबदली केली. घरबसल्या जेवढे करता येते, तेवढे सगळे केले. शेवटी तर दिल्लीला " 7, लोककल्याण मार्ग' बंगल्यावर एक आंब्याची पेटीदेखील पाठवणार होतो. तशी पेटी पाठवतो आहे, असे आगाऊ कळवून ठेवले होते. त्याचा फायदा झाला असावा, असे वाटते!! 

माझ्या पत्रावरून काही नतद्रष्ट लोकांना वाटेल की मी तुमच्यावर जळतोय! शुभेच्छांमध्ये दडलेली जळूशी (पक्षी : जेलसी) काही लोकांना दिसेल. पण तसे काही नाही हो! मी अजूनही तोच, तुमचा जुना मित्र आहे. काहीही झाले तरी तुम्ही आणि मी हे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक अद्वैत आहे. आपण अभिन्न मित्र असल्याने तुम्ही खुर्ची बसले काय आणि मी बसलो काय, एकच! त्याअर्थाने शब्द दिल्याप्रमाणे मी पुन्हा आलो आहे!! हो की नाही? पुन्हा शुभेच्छा. कळावे. आपला अभिन्न मित्र. नाना फ.