ढिंग टांग : डील अने ढील!

ब्रिटिश नंदी
Thursday, 27 February 2020

गेले दोन दिवस हेच खातोय! पेठा हवाय पेठा!! आगऱ्यात जाऊन पेठा न आणणारं आमचं जगातलं एकमेव कुटुंब असेल!...(एकदम आठवून) आणि येईल, त्याला तो काचपेटीतला ताजमहाल कसला भेट देता हो? 

नमोजीभाई : (गदगद सुरात) जे श्री क्रष्ण, डॉनल्डभाई...तमे मारे घर पधाऱ्या! हुं धन्य धन्य थई गयुं!!

डॉनल्डभाई : (गोंधळून) यू व्हॉट?

नमोजीभाई : (मराठीत खुलासा करत) तुम्ही माझ्या घरी आलात, मला खूप आनंद झालाय, हे सांगत होतो!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉनल्डभाई : (घाम पुसत) पंखा लावा ना जरा! मलाही होईल आनंद!!

नमोजीभाई : (घाईघाईने पंखा लावत) आमच्या इंडियात तुम्हाला उकडत असेल नै?

डॉनल्डभाई : (हुस्स करत) भयंकर!

नमोजीभाई : (पुन्हा मैत्रीची टेप लावत) माझा सच्चा मित्र घरी आलाय, तेही सहकुटुंब! बाय द वे, तुमची आगऱ्याची सहल कशी झाली?

डॉनल्डभाई : (मान हलवत)...पेठा घ्यायचा राहिला! आगऱ्याचा पेठा प्रसिद्ध आहे म्हणे!

नमोजीभाई : (कळवळून) ताजमहाल अधिक प्रसिद्ध आहे हो!!

डॉनल्डभाई : (व्यापारी वृत्तीने) हो, पण तो प्लेटमध्ये घेऊन खाता येतो का?

नमोजीभाई : (बशी पुढे करत) तमे ढोकळा खावो ने!! आ तो पेठाथी सरस छे!! 

डॉनल्डभाई : (छातीशी हात नेत कडवट तोंड करून) गेले दोन दिवस हेच खातोय! पेठा हवाय पेठा!! आगऱ्यात जाऊन पेठा न आणणारं आमचं जगातलं एकमेव कुटुंब असेल!...(एकदम आठवून) आणि येईल, त्याला तो काचपेटीतला ताजमहाल कसला भेट देता हो? 

नमोजीभाई : (अभिमानाने) ताजमहाल तो केटला सरस छे! आ तो हमारे प्रेमसंस्कृती नी संगमरमरी धरोहर छे!

डॉनल्डभाई : (वसकन अंगावर येत) छे? छे...छे...काहीतरीच काय?

नमोजीभाई : (पडेल आवाजात) संगमरमर म्हंजे मारबल!! एकदम दूधजेवा व्हाइट!! 

डॉनल्डभाई : (वैतागून) ते जाऊ दे! बघितला तुमचा ताजमहाल! बराय!! मीसुद्धा व्हाइट हौसमध्ये राहातो, हे विसरु नका म्हंजे झालं!! पेठ्याचं बोला!!

नमोजीभाई : आपला व्यापार करार झाला की पाठवून देईन मी पेठा, मग तर झालं? अपने दोस्ती का वास्ता!!

डॉनल्डभाई : (मान झटकत) म्हंजे झाऽऽलं! ह्या जन्मी तरी पेठा मिळण्याचं नाव नको!

नमोजीभाई : (विषय शिताफीने बदलत) आपला एनर्जी डील, डिफेन्स डील अने ट्रेड डील झ्याला ने के लागलीच पेठा पाठवतो! प्रोमिस!!

डॉनल्डभाई : (रागावून) वाटाघाटींमध्ये तुम्ही कडक आहात, असं जाहीर भाषणात कौतुक केलं म्हणून डीलच्या नावाखाली आम्हाला ढील देऊ नका! आगऱ्याचा पेठा पुरवणे, हा आपल्या डीलचा भाग नाही!! इज दॅट क्‍लिअर?

नमोजीभाई : (नरमाईच्या सुरात) तो रेहवा दो!! बाकी आपला टूर च्यांगला झाला!! तुम्ही अमेरिकेमध्ये माझी आवभगत च्यांगली केली होती, हवे हुं परतफेड करु छुं!! बे दिन कसे गेले कळला पण नाय!! 

डॉनल्डभाई : (गुडघे चोळत) इलेक्‍शनची भानगड नसती, तर मी इतकं झेललं नसतं कुणाला! गेल्या दोन दिवसांत आपण एकमेकांना अठ्ठेचाळीस मिठ्या मारल्या आहेत आणि तीनशे चोपन्न वेळा हस्तांदोलन केलं आहे! अरे, काही लिमिट आहे की नाही? आमच्या अमेरिकेत असं चालत नाही!!

नमोजीभाई : (सुस्कारा सोडत) पोलिटिक्‍समां आ बध्दा करवुज पडशे, डोनल्डभाई! शुं करवानुं? इलेक्‍सनमाटे तुम्हाला अमेरिकेमधी माझ्यासारखा केंम्पेन करावा लागणार! ॲज इफ यू आर अमेरिकन मोदी!! अने हुं अहियां इंडिया मां डोनल्डभाई जेवा वागणार!...आपला डील तो हाच आहे ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article donald trump Narendra modi