esakal | ढिंग टांग : पाचावर धारण!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : पाचावर धारण!

 पाच दिवसांचा आठवडा सरकारने आमच्यासाठीच केलाय, अशी लोकांची समजूत झालेली दिसते. सरकारने विजेची, पाण्याची बचत करण्यासाठी पाच दिवसांचा आठवडा केला आहे, हे कोणी समजून घेणारे का? कर्मचारी कामावर असले की हपिसात दिवसभर एसी किंवा कूलर किंवा पंखा चालू राहातो.

ढिंग टांग : पाचावर धारण!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

हल्ली प्रचंड काम पडते. घरी परतल्यावर काहीही करावेसे वाटत नाही. पत्नी विचारते, ‘‘काही होतंय का?’’ काय सांगू? ‘‘हपिसात कामाचा ताण असह्य झालाय’’ असे सांगितले, तर छद्मी हसून ‘ऐकेल कुणी!’’ असा शेरा ऐकून घ्यावा लागतो. म्हणून मी काहीही बोलत नाही. अत्यंत निरीच्छेने मी पुढ्यात आलेली बटाटेपोह्यांची बशी कशीबशी संपवतो. चहा पिऊन थोडा लवंडतो. असा थोडासा आराम केल्यावर रात्रीच्या जेवणाचीच वेळ होते. मग थोडेफार जेवून कधी एकदा बिछान्यावर आडवा होतो, असे वाटत असते. सकाळी उठून पुन्हा कामावर जायचे असते. रोज मरे त्याला कोण रडे?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हल्ली कामाच्या बोज्याखाली दबून गेल्यासारखे झाले आहे. केवढे लोड वाढले आहे!!

सरकारी नोकरी म्हणजे लोकांना ‘आराम का मामला’ वाटतो. पण तसे नाही. शनिवारी-रविवारी कुठे बाहेर फिरणे नको वाटते. ‘‘काय मॅग? चॅंगळ आहे हो एका माणसाची! फायू डे वीक काय, सुट्या काय...मजाय! आता तर काय रिटायरमेंट साठीला होणार!’’ असे टोमणे परिचितांकडूनच ऐकावे लागतात. सरकारी कर्मचाऱ्याची व्यथा या प्रायवेटवाल्या लोकांना काय कळणार?  पाच दिवसांचा आठवडा सरकारने आमच्यासाठीच केलाय, अशी लोकांची समजूत झालेली दिसते. सरकारने विजेची, पाण्याची बचत करण्यासाठी पाच दिवसांचा आठवडा केला आहे, हे कोणी समजून घेणारे का? कर्मचारी कामावर असले की हपिसात दिवसभर एसी किंवा कूलर किंवा पंखा चालू राहातो. ट्यूबलाइट, फॅक्‍स यंत्र, कांप्युटर इत्यादी गोष्टी चालू राहतात. कागदाचा खर्च वेगळा! क्‍यांटिनचा खर्च आणखी वेगळा!! कामाला लागलेला माणूस दिवसभरात दहा-वीस वेळा तरी चहा पितोच ना? त्यामुळे तब्बेतीचीही हानी होते. हे सगळे टाळण्यासाठी शनिवारी-रविवारी सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. आमच्या आरामाचा याच्याशी काहीही संबंध नाही. आरामशीर सरकारी कर्मचारी एरव्हीही आराम करून घेतोच.- त्याच्यासाठी सुट्या वाढवण्याची काय गरज? पण हे लक्षात कोण घेतो? जाऊ दे! 

कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या चेहऱ्याकडे बघा, त्यावरची अवकळा कुठल्याही संवेदनशील माणसाच्या मनाला घरे पाडील! तुटपुंजा पगार, कामाचा प्रचंड बोजा आणि पब्लिकचा त्रास, यामुळे सर्कारी कर्मचाऱ्याचे जीवन दुष्कर झाले आहे. पाच दिवसांचा आठवडा अक्षरश: अंगावर येतो.

...पूर्वी ठीक होते. सहा दिवसांचा आठवडा होता. त्यामुळे आरामात कामाचा निपटारा करणे शक्‍य व्हायचे. आता पाच दिवसात आठवडा गुंडाळावा लागतो. दर शुक्रवारी पब्लिकला ‘सोमवारी या’ असे सांगताना आवंढा गिळावा लागतो. मागल्या शुक्रवारी असेच झाले! एका सामान्यजनाची नस्ती अडकली होती. सही करून डीओसाहेबांकडे पाठवावी, असा तगादा लावणे चालू होते. त्याला म्हटले, ‘‘सोमवारी या’ तर अस्सा भडकला! पुढला आठवडाभर मला सिक नोट टाकावी लागली!! दाढ दुखत होती आणि उजवा हातही पिरगळल्यासारखा झाला होता. तरी बरे, इतर माणसे मध्ये पडली!! असो. पब्लिकचे प्रेशर हे असे असते. 

पाच दिवसांचा आठवडा झाल्यापासून लोक आमच्याकडे असूयेने बघायला लागली आहेत. त्यांना माझे आवाहन आहे की एकदा आमच्या बुटात पाय घालून बघा! जळामधी मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे! असे संतांनी म्हटलेच आहे. एकदा सर्कारी कर्मचारी होऊन बघा म्हणावे! पाच दिवसांच्या आठवड्यामुळे आमची पाचावर धारण बसली आहे!! असो.

...दर महिन्याचा दुसरा आणि चौथा शुक्रवार हाफ डे होईल का? मागणी केली पाहिजे!!

(एका सर्कारी कर्मचाऱ्याची कैफियत)