esakal | ढिंग टांग : मन का लॉकडाउन ! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : मन का लॉकडाउन ! 

अजून अठरा दिवस तुला मोरीत गळका नळ फडक्‍यात गुंडाळून धरून बसायचे आहे, बा मना! बसशील ना? ऐकशील ना? यालाच लॉकडाउन म्हणतात, वेड्या मना, यालाच लॉकडाउन म्हणतात...

ढिंग टांग : मन का लॉकडाउन ! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

खाली दिन औ खाली रात 
खाली आठौ पहर 
ससुरी दाढी बढै बढै 
क्‍या बाहर, क्‍या अंदर? 

कल करै सो आज न कर 
कुछ न कर परसों 
लाकडाउन के काल में 
क्‍या परसो नरसों? 

-संतकवी कुलुपदास 
हरि ॐ!मित्रोंऽऽ...लॉकडाउन दाढीसारखा वाढतोच आहे. स्थळकाळाचे भान हरपत चालले आहे. प्राचीन काळी तपश्‍चर्या करणाऱ्या ऋषीमुनींना वारुळात असेच वाटत असेल्का? कां की क्‍यालिंडर पार विसरायला झाले आहे. आज किती तारीख? आठवत नाही. वार कुठला? कुणास ठाऊक! आंघोळ काल केली होती की परवा? नाही रे माहीत...एकाच जागी बसून बसून बिछान्यावर खोलगट खड्डा पडला आहे. सोफ्याची एक बाजू तिरकी झाली आहे. उशीवरचा तेलकट्ट डाग दिवसेंदिवस गडद होत चालला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशा उन्मनी, एकाकी अवस्थेत योगाभ्यास करणे इष्ट. बा मना, हो तयार. चटई पसर. पसरलीस? शाबास. अंहं! लॉकडाउन योगाची सुरवात नेहमीप्रमाणे शवासनाने नाही हं करायची! शवासनामुळे घोरायला होते. बेसावधपणे डोळा लागतो. वेड्या मना, चटईवर बस आणि पद्मासन घालायचा आटोकाट प्रयत्न कर. चढव टाचा...हुं...कर प्रयत्न. जमेल जमेल! हिकडची टांच तिकडे, तिकडची टांच हिकडे! नाही जमत? हॅत तुझी? बा मना, किती रे तू फद्या!! 

काय म्हणालास? स्वत:लाच मांडीवर घेण्याचा उद्योग म्हंजे पद्मासन? हाहाहा!! स्वत:लाच मांडीवर कुणी घेते का बा मना? खुळा कुठला. अरे, पद्मासन जमले की सारे काही जमले. पण जाऊ दे आता. तू नुसती साधी मांडी घाल बघू. ध्यानस्थ बस. डोळे मिट. दोन्ही भुवयांमध्ये एकाग्र हो... 

...समोरच्या ग्यालरीत कपडे वाळत घालायला आलेल्या वैनी. 

...उजवीकडच्या ग्यालरीत केस विंचरत उभी असणारी शेजारील सान्यांची सुमन. 

....वरच्या मजल्यावरच्या आब्या सोमणाकडे रोज इतके काय कुटत असतात कुणास ठाऊक. 

...खालच्या मजल्यावर पाणी आलेय की काय?... 

अरेरे, मना मना, कुठे कुठे भटकत असतोस? पोलिसासारखा रट्टा देऊ का तुझ्या पार्श्‍वभागावर? एका जागी नीट बस. एक दीर्घ श्‍वास घे!! तो सोड! पुन्हा घे...पुन्हा सोड. बघ, ठस्का लागला ना? दिवसभर विड्या कोण फुंकेल? आता भोग कर्माची फळे! श्‍वास पूर्ण आत ओढला की आपले दोंद फुग्यासारखे बाहेर का येत्ये? असे कोडे तुला पडले ना? पडणारच. फुफ्फुसे छातीत असतात की पोटात, अशी शंका आली ना? येणारच. 

आता पाय सरळ कर आणि ओणवा होऊन पायाचे अंगठे पकड. बघ, मना ही सत्वपरीक्षा आहे. स्वत:चेच पाय धरायची ही शिक्षा आहे. पायाचे अंगठे पकडल्यावर ओठाच्या कडांमधून हवा बाहेर येऊ पाहील. पण जिद्द ठेव. वायसर गेलेल्या नळाच्या तोटीतून उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यावर हात बांधून काही काळ मोरीत बसावे लागतेच ना? तसेच आहे. जीवन म्हंजे मोरी आहे, बा मना! निव्वळ मोरी! मोरीत नळ आहे आणि नळाचा वायसर बोंबलला आहे. मग काय करणार? तोटीला फडके बांधावे लागते. तसेच आपल्या तोंडाला फडके बांध! मोरी जितकी कोरडी, तितकी तुंबण्याची शक्‍यता कमी! जीवन तुंबता कामा नये! ओक्‍के? 

अजून अठरा दिवस तुला मोरीत गळका नळ फडक्‍यात गुंडाळून धरून बसायचे आहे, बा मना! बसशील ना? ऐकशील ना? यालाच लॉकडाउन म्हणतात, वेड्या मना, यालाच लॉकडाउन म्हणतात... 

‌-ब्रिटिश नंदी