esakal | ढिंग टांग! :  लॉक...डाऊन आणि अप! 
sakal

बोलून बातमी शोधा

dhing-tang-article

""या समाजकंटकांना गोळ्या घातल्या पाहिजेत!'' गरगरा डोळे फिरवीत साहेब कडाडले.त्यांनी गरागरा डोळे फिरवले असावेत,ही आपली आमची समजूत! कां की आम्ही पाठमोरेच होतो...असो.

ढिंग टांग! :  लॉक...डाऊन आणि अप! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

""अयाईग्गंऽऽऽ...'' शिवाजी पार्काडाच्या निर्मनुष्य मुलखात एक गगनभेदी किंकाळी घुमली, आणि येवढी बोलघेवडी माणसे एकदम गेली कुठे?या विचाराने गोंधळलेली पाखरे (पक्षी : कबुतरे!) अस्मानात भर्रदिशी उडून पुन्हा आपापल्या जागी बसली. सारे काही पुन्हा निर्मनुष्य आणि शांत जाहले. 

चूक आमचीच होती. अभावितपणे किंकाळी मुखातून गेल्यामुळे हे असले मौननाट्य घडले! 

""बोल! पुन्हा शिंकरशील नाक चार्चौघात? बोल! पुन्हा शिंकशील ठोंब्यासारखा चार्चौघात? बोल, पुन्हा राहशील उभा भिंतीशी...,'' हातातील पायताण उगारीत साक्षात राजेसाहेबांनी आमचे टाळके सडकण्याचे सत्र सुरु केले होते. किंकाळी जाणे, स्वाभाविक होते. आमचा गुन्हा येवढाच की आम्हांस सर्दी जाहली होती. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

""या समाजकंटकांना गोळ्या घातल्या पाहिजेत!'' गरगरा डोळे फिरवीत साहेब कडाडले. त्यांनी गरागरा डोळे फिरवले असावेत, ही आपली आमची समजूत! कां की आम्ही पाठमोरेच होतो...असो. 

""या नतद्रष्टांना लॉकडाऊनचा अर्थ कळत नाही अजुनी!,'' साहेब पुन्हा डरकाळले. यावेळी त्यांनी ओठांचा चंबू करुन भिवया वक्र केल्या असणार हे आम्ही पाठमोऱ्यावस्थेत ताडिले. पुन्हा असो. 

""भाज्या...भाज्या आणायला इतकी गर्दी करता? काय मराल काय पंधरा दिवस भाज्या खाल्ल्या नाहीत तर...आँ?,'' एक दणका देत साहेबांनी दातओठ खात विचारले. 

""एकवीस...एकवीस दिवस हो,!'' मनाचा हिय्या करोन आम्ही म्हणालो. त्यासरशी आणखी येक हृदयद्रावक किंकाळी आमच्या मुखातून गेली. त्यांच्या हातातील पायताण आमच्या टाळक्‍यापर्यंत पुन्हा येकदा आले होते, पण आम्ही ते शिताफीने हुकवले. 

""काय भयानक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नोटांना थुंक्‍या काय लावताहेत, नाके काय शिंकरताहेत! वेडेवाकडे चाळे काय करताहेत!! एकेकाला फोडलं पाहिजेलाय!,'' साहेब भडकले की कोणाला जाम ऐक्‍कत नाहीत. आता आम्हाला सर्दी झाली होती, हा गुन्हा कबूल आहे. सर्दी झालेली असताना आम्ही भाजी मार्केटात घुसण्याचा यत्न केला, हेदेखील कबूल आहे. मार्केटात घुसतानाच आम्हाला मुद्‌देमालासकट उचलण्यात आले, हेदेखील शंभर हिश्‍शांनी खरे आहे. पण आम्ही व्हिडिओ काही कुठे टाकलेला नाही. 

...अचानक आमच्या डोळ्यांसमोर "लाव रे तो व्हिडिओ' मोहीम उभी राहिली. असेच काही निवडक व्हिडिओ हुडकून साहेबांनी महाराष्ट्र ढवळोन काढिला होता. अहाहा! किती किती मनोहारी दिवस होते ते!! 

""मी तर म्हणतो, या लोकांना एका मैदानात कोंडा, आणि त्यांना उपचारसुध्दा देऊ नका!,'' साहेब चेवात म्हणाले. भाजी मार्केटात सर्दी झालेला इसम घुसणे हे सध्याच्या दिवसात भयंकर दुर्घटना मानली जाते, हे आम्ही थोडेसे विस्मरलो होतो, हे कबूल केले पाहिजे. पण त्यासाठी येवढी मोठी शिक्षा? आम्ही उगेमुगे राहिलो. 

""लॉकअप बंद करा या सगळ्या नतद्रष्टांना!,'' एक अंगुली रोखून साहेब गरजले. 

""साहेब, येक डाव माफी करा!'' आम्ही सपशेल लोटांगण घातले. 

""कोरोनाचे विष पसरवणाऱ्या समाजकंटकांनो, ही जीवघेणी साथ एकदा आटोपू दे, मग बघतो तुमच्या एकेकाकडे! नाही तुमचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राला वारंवार दाखवले, तर नाव लावणार नाही!'' संतप्त साहेबांनी घनघोर प्रतिज्ञा केल्याने आमचा निरुपायच जाहला. 

""स...स...साहेब! लॉकडाऊननंतर एकदम लॉकअप नको हो! महाराष्ट्राचा बदलॉकिक नाही का होणार?,'' आम्ही पायाशी लोळण घेत अभय मागितले. साहेब विचारात पडले. 

थोड्यावेळाने म्हणाले- 

""अरे, तू म्हणतोस ते ठीकच. लॉकडाऊन काय, आणि लॉकअप काय, दोन्हीत फारसा काय फरक आहे? थोडे आत, थोडे बाहेर...इतकंच!''