esakal | ढिंग टांग : लॉकडाउन लोभ! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : लॉकडाउन लोभ! 

आज महाराष्ट्र डब्बल कुलपात बंदिस्त आहे. महाराष्ट्ररुपी लॉकरची एक चावी तुमच्या हातात, दुसरी दिल्लीला आमच्या प. पू. श्रीश्रीनमोजी (नमो नम: नमो नम:!) यांच्या हाती!! चालायचेच. 

ढिंग टांग : लॉकडाउन लोभ! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम. खूप दिवस झाले आपली गाठभेट नाही. मी नागपुरात अडकून पडलो आहे आणि तुम्ही बांदऱ्यात. "मी पुन्हा येईन', असे सांगून मी मुंबईतून गेलो, पण...पण नियतीने (आणि तुम्ही) मला काही पुन्हा येऊ दिले नाही. सध्या तर "दोन ध्रुवांवर दोघे आपण, तू तिकडे अन्‌ मी इकडे' अशी आपली अवस्था झाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

...आज महाराष्ट्र डब्बल कुलपात बंदिस्त आहे. महाराष्ट्ररुपी लॉकरची एक चावी तुमच्या हातात, दुसरी दिल्लीला आमच्या प. पू. श्रीश्रीनमोजी (नमो नम: नमो नम:!) यांच्या हाती!! चालायचेच. विषाणूने केलेला हा अन्याय काही काळ तरी सहन करणे भाग आहे. 

सध्या आपली गाठभेट होत नसली, तरी दर दो-चौ दिवसांनी आपण टीव्हीवर दिसता. बरे वाटते! परवा प. पू. श्रीश्रीनमोजी यांच्यासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये तुम्हीही होता. मास्क लावलेल्या अवस्थेतही मी तुम्हाला अचूक ओळखले! (पू. नमोजींनीही बहुधा ओळखले असेलच!) व्हिडिओ कान्फरन्सिंगचे सोडा, महाराष्ट्राच्या रयतेला धीर देण्यासाठी तुम्ही "फेसबुक लाइव्ह' करता, टीव्हीवरही येता!! चार-सहा महिन्यांपूर्वी सारे काही ठीक झाले असते, तर आज मी "फेसबुक लाइव्ह' करत असतो, टीव्हीवर दिसलो असतो! अहह!! 

तुम्ही टीव्हीवर आलात की मी ज्याम सोफ्यावरची जागा सोडत नाही. टीव्हीच्या दुनियेत ( "रामायणा'च्या खालोखाल) हाय्येस्ट टीआर्पी तुम्हालाच असणार, हे मी खात्रीने सांगू शकतो! तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आता घरगुती मास्क वापरतो आहे. "छानपैकी स्वच्छ कापडाचा मास्क तयार करा आणि छानपैकी धुऊन पुन्हा वापरा', अशी सूचना तुम्ही केली होती. तसा धुतलेला मास्क मी वापरतो आहे. (पहिल्यांदा चुकून ओलाच मास्क वापरला. कारण "धुऊन वाळवा,' असे तुम्ही सांगायला विसरला होता! असो!!) "फ्रीजमधली गार पाण्याची बाटली भस्सकन काढून धस्सकन तोंडाला लावू नका', असेही तुम्ही सांगितले होते. तुम्ही हे टीव्हीवर सांगत होता, तेव्हा आमच्या घरच्या मंडळींनी जळजळीत नजरेने आमच्याकडे बघितले! जाऊ दे! 

घरात रहा आणि सुरक्षित रहा! हे तुमचे वाक्‍य विरोधकांना (पक्षी : आम्हाला) उद्देशून नाही ना, अशी शंका आमच्यापैकी काहीजणांना आली. मी त्यांच्या शंकेचे निरसन केले आहे. म्हटले, "आमचे उधोजी असे नाहीत! ते काळजीपोटीच सांगत आहेत! अशा परिस्थितीत विरोधकांना बाहेर पडू नका, असे कोण बरे सांगेल?' असो. ही राजकारणाची वेळ नाही. संकटाच्या काळात राजकारण करण्याइतका मी काही "हे' नाही! सारांश, तुमच्या सोज्वळ वाणीतून मिळालेल्या सूचनांचे आम्ही सारे जण तंतोतंत पालन करीत आहो, हे सांगण्यासाठीच मी पत्र लिहीत आहे. जणू काही आपला थोरला भाऊच सल्ला देत आहे, असे फीलिंग येत्ये! "तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो', हे तुमचे वाक्‍य ऐकून तर अंगावर काटा आला! अतिशयोक्‍ती वाटेल, पण मला सुभाषबाबूंच्या "तुम मुझे खून्दो, मै तुम्हे आजा दीदूंगा', हे लहानपणापासून पाठ केलेले वाक्‍य आठवले!! माझीही जबाबदारी तुम्ही घ्या! घ्याल ना? 

खरे सांगतो, तुम्हाला (टीव्हीवर) पाहून भरून येते. संकटाच्या या घडीला आपण आम्हा सर्वांना केवढा दिलासा देत आहात! आपण आवाहन केले तर मी स्वत: एक सोडून दोन दोन मेणबत्त्या पेटवीन!! पाच मिनिटे शंखदेखील वाजवण्याची माझी तयारी आहे!! वाजवू का? कळावे. 

आपला. नाना.