esakal | ढिंग टांग : स्फोटक कहाणी! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : स्फोटक कहाणी! 

नागपूरच्या माणसांनी तर मुळीच ठेवू नये.एक घाव, दोन तुकडे हा आपला खाक्‍या असतो.उगाच मुंबई-पुण्यासारखा गुळमटपणा आपल्या स्वभावात नाही."वेळ येईल तेव्हा सगळे सांगीन',असे मी सहा महिन्यांपूर्वीच म्हटले होते.

ढिंग टांग : स्फोटक कहाणी! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : प्रमादीनाम संवत्सर श्रीशके 1942 आषाढ शु. तृतीया. 
आजचा वार : गौप्यस्फोटवार! 
आजचा सुविचार : जागो सोनेवालोऽऽ...सुनोऽऽ मेरीऽऽ कहानीऽऽ...टाडाडॅडा डाडा डिडा डांग! 
..................................... 
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) माणसाने मनात काही ठेवू नये. आम्हा नागपूरच्या माणसांनी तर मुळीच ठेवू नये. एक घाव, दोन तुकडे हा आपला खाक्‍या असतो. उगाच मुंबई-पुण्यासारखा गुळमटपणा आपल्या स्वभावात नाही. "वेळ येईल तेव्हा सगळे सांगीन', असे मी सहा महिन्यांपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार वेळ आल्याचे महाराष्ट्राच्या जनतेला आता कळले असेल! 

आमच्या मित्र पक्षाशी नेमके कुठे बिनसले? पहाटे पहाटे शपथविधी कां केला? "मी पुन्हा येईन' हे मी कशाच्या जोरावर म्हणत होतो? (पण) नेमकी कुठे माशी शिंकली? असे सारे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होते. त्या सगळ्यांची उत्तरे माहीत असलेला एकटा मी होतो आणि आहे. अजून रिलीज न झालेल्या सिनेमाचे टीझर दाखवतात, तसा एक टीझर परवा मी सोडून दिला आहे. आता हळूहळू मस्त पब्लिसिटी होईल. हल्ली वेबसीरिजमध्ये असलेच काहीतरी असते. माझ्या कहाणीत असला मालमसाला ठासून भरलेला आहे, हे टिझरवरून लोकांच्या लक्षात आले असेलच. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पहाटेचा शपथविधी आमच्या माननीय मोटाभाईंच्या सांगण्यावरूनच झाला होता, हे गुपित फोडून मी मोकळा झालो! त्या रात्री मा. मोटाभाईंनी मला मोजून सात वेळा फोन करून पहाटे उठवले होते. पहाटे उठल्यावर दिवस लौकर सुरू झाल्याने शपथविधीही पहाटेच झाला. 

गौप्यस्फोट झाल्या झाल्या थोड्या वेळाने खुद्द मोटाभाईंचाच फोन आला. "तुम्ही पत्रकारांना आणखी काही सांगितले नाही ना?' एवढा एकच प्रश्‍न त्यांनी खोल आवाजात विचारला. मी म्हटले, "छे, अजिबात नाही. "मातोश्री'वर बंद खोलीत तुम्ही जे काही म्हणालात, त्यापैकी एकही शब्द मी सांगितलेला नाही!' त्यावर त्यांनी काहीतरी पुटपुटत फोन ठेवून दिला. 

त्यांनी फोन ठेवताक्षणी दुसरा फोन आला थेट "मातोश्री'वरूनच! हा मात्र आश्‍चर्याचा धक्काच होता. स्वत: मा. उधोजीसाहेब लाइनवर होते. 

""हे काय बोलिलात?'' त्यांनी सवाल केला. 

""कुठे काय!'' 

""तुमचे फोन घेतले नाहीत, असं म्हणालाय तुम्ही!'' उधोजीसाहेब गरम झाले होते. बराच वेळ शांत राहून ते पुढे म्हणाले, ""तेव्हा माझ्या फोनची बॅटरी चार्ज नव्हती. फोन चार्जरला होता. चार्ज झाल्याबरोब्बर आम्ही तुम्हाला कॉलबॅक केला होता. तेव्हा तुम्ही कुठे उचललात फोन?'' 

""तेव्हा माझ्या फोनची बॅटरी डाऊन होती हो!'' मी म्हणालो. पुढल्या वेळेला हे जाहीर मुलाखतीत सांगण्याचे आश्वासन मी त्यांना दिले. त्यांनीही काहीतरी पुटपुटत फोन ठेवला. 

तेवढ्यात घाईघाईने स्पायडरमॅनच्या वेषात एक गृहस्थ घरात शिरले. "कोण आहे?' असे मी दर्डावून विचारले. त्यांनी मुखवटा काढला. आमचेच मा. चंदूदादा कोल्हापूरकर होते. आल्या आल्या ते टेबलाखाली दडून बसले. कुजबुजत म्हणाले, ""तुम्ही केलेल्या गौप्यस्फोटाचे खुलासे मला करावे लागणार आहेत. पत्रकार मागे लागले आहेत, म्हणून इथं दडून बसलोय. तुम्हीही काही दिवस दडून बसा!'' 

...हा मजकूर मेजाखाली बसूनच लिहिला आहे. बाकी सारा सविस्तर गौप्यस्फोट पुस्तक लिहून करीन असे आत्ताच जाहीर केले आहे. पुस्तक आणि वेबसीरिज दोन्ही बेस्टसेलर आणि ब्लॉकबस्टर ठरणार, यात आता शंका ती काय? नमो नम:!!