ढिंग टांग : हिटलर आणि मराठी साहित्य!

ब्रिटिश नंदी
Tuesday, 14 January 2020

उद्या, जावळीच्या खोऱ्यात येऊन थडकलेल्या अफझुल खानामुळे मराठी भाषेचे अतोनात नुकसान झाले, असे म्हणाल! तेव्हा तात्पर्य येवढेच, की अफझुल्ल्या किंवा हिटलर अशा जुन्या मंडळींशी आत्ताच्या मराठीचा काही संबंध नाही.

भारतात सध्या हिटलरशाही आहे की नाही? हा मराठी सारस्वतापुढे पडलेला एक गहन प्रश्‍न आहे. ज्या अर्थी भारतात हिटलरशाही आहे, त्याअर्थी ती मराठी साहित्यातही असणार, या जाणिवेने आम्ही कामाला लागलो. तथापि, या संदर्भात काही टिप्पणी करण्यापूर्वी ‘हिटलरशाही म्हणजे नेमके काय’, हे आधी वाचकांना समजावून सांगणे हे लेखक म्हणून आमचे प्रथम कर्तव्य ठरते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिटलरशाही हा शब्द शुद्ध एतद्देशीय असून तो स्त्रीलिंगी आहे. व्युत्पत्तिकोशात या शब्दास अजून स्थान मिळाले नसले, तरी मराठी सारस्वताच्या व्यासपीठावर मात्र हा शब्द एव्हाना रुळला आहे. हिटलर या जर्मनीतील नाझी हुकूमशहाशी संबंधित हा शब्द असावा, असा आमचा आधी गैरसमज होता. पण नाही! नाझी जर्मनीतील हिटलरचा आणि भारतातील किंवा मराठी साहित्यातील हिटलरचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही...नसावा! कारण तो जो कोणीएक हिटलर होऊन गेला, त्याचा इसवीसन १९४५ मध्ये एका बंकरमध्ये अंत झाला. (त्याने मराठी बुके वांचून आत्महत्या केली, असा एक प्रवाद मराठी साहित्यात आढळतो.) साठोत्तरी काळात मराठी साहित्य बदलले, हे सारेच जाणतात. आता साठ सालानंतर झालेल्या बदलाशी १९४५ मध्ये चचलेल्या व्यक्‍तीचा संबंध कसा? असा आमचा मार्मिक सवाल आहे. उद्या, जावळीच्या खोऱ्यात येऊन थडकलेल्या अफझुल खानामुळे मराठी भाषेचे अतोनात नुकसान झाले, असे म्हणाल! तेव्हा तात्पर्य येवढेच, की अफझुल्ल्या किंवा हिटलर अशा जुन्या मंडळींशी आत्ताच्या मराठीचा काही संबंध नाही. पहा! नाझी हिटलरशी मराठी साहित्याशी काहीही संबंध नाही, हे आम्ही सोदाहरण सिद्ध करुन दाखवू शकलो.

साहित्यातील हिटलरशाहीचा निषेध करणे हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे (९३वे...मिष्टर आहात कुठे!) कर्तव्यच होते व आहे. तसा ठराव आणण्यासाठी काहींनी युद्धाचा पवित्राही घेतला. परंतु, काही साहित्यिकांनी हिटरलशाही ‘आहे’ असे प्रतिपादन केले, तर काहींनी हिटलरशाही ‘नाही’ असे विधान केले. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ गटातील वर्गसंघर्ष म्हंटात तो हाच असावा!! 

हिटलर या शब्दात ‘हिट’ आहे आणि ‘शाही’देखील आहे. ज्या शब्दात आधीच हिट असते, तो शब्द हिट होणारच! तद्वत मराठी साहित्याच्या व्यासपीठावर हा शब्द हिट झाला. ज्या शब्दात ‘शाही’ आहे, तो शब्द टीकेचा धनीदेखील होणारच! मराठी साहित्याच्या व्यासपीठावर तेही घडले!!  भारतात व पर्यायाने मराठी साहित्यात सध्या हिटलरशाही आहे की नाही? या प्रश्‍नाचे वस्तुनिष्ठ उत्तर शोधण्यासाठी आम्ही मुंबईतून उठून उस्मानाबादेत गेलो व महाराष्ट्राच्या तमाम साहित्यिकांचे फादर याने की पितृतुल्य असे जे संमेलनाध्यक्ष फा. दिब्रिटो यांना त्यांचे मत नम्रपणे विचारायचा बेत रचला. पण तेथे गेल्यावर ते मुंबईला गेल्याचे कळले! माजी संमेलनाध्यक्षा मा. अरुणाताई तिथे एकट्याच उभ्या होत्या. त्यांना विचारले. तर त्या म्हणाल्या, ‘‘आपण गाढव आहोत का? हिटलर कसा सहन करु आपण? काहीत्तरीच तुमचं!’’ या ‘नाही रे’ गटाच्या प्रतिनिधी!

पुन्हा मुंबईला आलो. फादरना आम्ही त्यांचे मत (नम्रपणे) विचारले. ते म्हणाले, ‘‘आहे रे...आहे! हिटलरशाही आहे यात शंका नाही.’’ हा हिटलर मराठी साहित्यिकांनी तात्काळ गाडणे गरजेचे आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. हे ‘आहे रे’ गटाचे प्रतिनिधी!!

...एकुणात मराठी साहित्यात हिटलर असला तरी म्हणावा तितका नाही आणि नसला तरी अगदीच नाही असे नाही, असा निष्कर्ष काढून आम्ही पुन्हा झोपी गेलो. इत्यलम.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article marathi literature