esakal | ढिंग टांग : मुंबई आय : एक अनुभव!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : मुंबई आय : एक अनुभव!

सध्या सोलापुरात गड्ड्याची जत्रा चालू आहे तिथं जरा नेट प्रॅक्‍टिस करून तरी यायचं होतंस. पण राहू दे आता... हा पहा, आलाच आपला वरळी-वांद्रे सी-लिंक!... आणि बने, हाच तो ‘मुंबई आय’चा पाळणा! 

ढिंग टांग : मुंबई आय : एक अनुभव!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

बने, बने...ये, अशी इथं ये! आज किनई मी तुला अवघ्या मुंबापुरीचं विहंगम दृश्‍य दाखवणार आहे. तू कधी जत्रेला गेली आहेस का? गरगर फिरणाऱ्या चक्रात बसले की किती मजा येते ना?.. काय म्हणालीस? पाळण्यात बसून तुला मळमळतं आणि गरगरतं? काय हे? सध्या सोलापुरात गड्ड्याची जत्रा चालू आहे तिथं जरा नेट प्रॅक्‍टिस करून तरी यायचं होतंस. पण राहू दे आता... हा पहा, आलाच आपला वरळी-वांद्रे सी-लिंक!... आणि बने, हाच तो ‘मुंबई आय’चा पाळणा! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अबबब! केवढी ही उंची! केवढे हे पाळणे!! खालून बघितलं तरी इतकी नजर गरगरते, मग वरून बघताना काय होईल, कल्पनाच केलेली बरी! नुसता हा पाळणा बघूनच लोक ‘आय आय’ करायला लागतात. म्हणून त्याला ‘मुंबई आय’ म्हणतात. ‘आय’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत बने! आय म्हणजे मराठीत आई!! हा पाळणा बघून अनेकांना ‘आय’ आठवते. काय? वेडी आहेस्का बने! हे काही ‘मुंबई हाय’ नाही काही... मुंबई आय आहे! हाहा!! ‘मुंबई हाय’ इथून पावणेदोनशे किलोमीटर दूर समुद्रात आहे. हा आहे मुंबई आय!! आय म्हंजे ‘मी’ आणि डोळा!

चल, आता आपण वर जाऊ या! आपण वर गेलो... म्हंजे पाळण्यातून वर हं...की दूरवर समुद्रच समुद्र दिसेल. इथे उजव्या अंगाला बघितलंस तर चर्चगेट दिसेल! त्या तिथे दूर समुद्रात छत्रपतींचं स्मारक उभं करण्याची योजना आहे. पण ते स्मारक होण्यापूर्वी हा ‘मुंबई आय’ उभा करण्यात आला! स्मारक होईल तेव्हा होईल! त्याचं काय एवढं?

...काय दाखवते आहेस बने? समोर हा अथांग पसरलेला निळा दर्या... अगं, बने दर्या इथं या अंगाला आहे. मुंबईचा समुद्र निळा नाही काही... गढूळ आहे! हा निळा दर्या म्हंजे दुसरं तिसरं काहीही नसून आमची धारावी आहे! इथल्या घरांवर निळी मेणकापडं घातलेली बघून तुला दर्या वाटला ना? वेडी कुठली!

...समोर बघ! त्या सुंदर वस्तीकडे! त्या वस्तीला कलानगर म्हणतात. तिथं पोलिस दिसले का तुला? बरोब्बर... ते आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे पर्मनंट निवासस्थान! किंवा महाराष्ट्राच्या पर्मनंट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हटलंस तरी चालेल!! बंगल्याच्या आवारात एक ऐटबाज तीन-चाकी रिक्षा पार्क केलेली दिसली का तुला? दिसली ना! शाब्बास!! डाव्या अंगाला जी टेकडी दिसते, तिथं मलबार हिल्ल आहे. आधीचे सगळे टेंपरवारी मुख्यमंत्री तिथं राहायचे. हे पर्मनंट आहेत, म्हणून ते इथं राहतात! 

...दुर्बिणीतून बघ, बंगल्यावरची ‘मातोश्री’ ही अक्षरं तुला दिसली का? दिसली ना?... काय म्हणालीस? दुर्बिणीशिवाय तिथल्या माणसांचे चेहरेसुद्धा दिसताहेत का तुला? कमाल झाली! तुझी नजर जबरदस्त आहे हं बने!... तो उंचपुरा रखवालदार पाहिलास? बापरे, कुणाला तरी तो दारावरूनच फुटवतो आहे... जाऊ दे. बंगल्याच्या बागेत गर्दी आहे. ती कार्यकर्त्यांचीच आहे, पण शिवसेनेच्या नव्हे! हल्ली तिथे स्वपक्षीयांपेक्षा कांग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचीच गर्दी अधिक दिसते.

‘मुंबई आय’चा हा प्रयोग यशस्वी झाला की त्याच धर्तीवर ‘पुणे आय’, ‘औरंगाबाद आय’, नाशिक आय’ अशी खूप निरीक्षण चक्रं उभी करण्याची योजना आहे.... काय म्हणालीस? नाही... नाही...‘नागपूर आय’ इतक्‍यात विचाराधीन नाही. तो विषयसुद्धा काढू नकोस बने! 

‘मुंबई आय’ हा मुंबईकरांच्या जीवनाचा वेध घेणारा डोळा आहे, डोळा!

...अगं, अगं अगं! बने, एकदम मळमळायला लागलं का तुला? थांब थांब, तुला आलंलिंबू देऊ का चोखायला?