esakal | ढिंग टांग : उपदेश : एक दंडुका!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : उपदेश : एक दंडुका!

माझ्या तमाम पोलिस बांधवांनो आणि भगिनीन्नो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे, चोर कसा पकडावा? विद्यार्थ्यांनो, चोर पकडणे हे पोलिसांचे प्रमुख काम असते. सर्वांनाच चोर पकडणे जमतेच असे नाही. कारण ते कौशल्याचे काम आहे. चोर पकडण्यासाठी पोलिसांना अतिशय दक्ष राहावे लागते.

ढिंग टांग : उपदेश : एक दंडुका!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : पोलिस मुख्यालय, मुंबई.
निमित्त : वरिष्ठ पो. अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद.
विषय : गोष्टी सांगेन युक्‍तीच्या चार!
प्रसंग : मा. मु. उधोजीमास्तर यांचा तास!
...........................................
माझ्या तमाम पोलिस बांधवांनो आणि भगिनीन्नो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे, चोर कसा पकडावा? विद्यार्थ्यांनो, चोर पकडणे हे पोलिसांचे प्रमुख काम असते. सर्वांनाच चोर पकडणे जमतेच असे नाही. कारण ते कौशल्याचे काम आहे. चोर पकडण्यासाठी पोलिसांना अतिशय दक्ष राहावे लागते. डोळ्यांत तेल घालून पहारा द्यावा लागतो. तरीही काही चोर पोलिसांचा डोळा चुकवून चोऱ्या करतातच. चोर लेकाचे! म्हणून पोलिसांनी कसे दक्ष राहावे, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यांनी देवासारखे गुपचूप बसावे आणि माझे म्हणणे नीट ऐकून घ्यावे. कोणीही चोरून मोबाइल फोन काढून टाइमपास करू नये!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुम्ही सारे शूरवीर आहात! तुम्हाला बघून गुन्हेगार चळाचळा कापतात, असे मला कोणीतरी सांगितले. किती छान!! तुमच्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत सुरळीत चालू राहाते व राजकारणाचे काम व्यवस्थित पार पडते. तथापि, काही गोष्टी तुम्हाला शिकवण्याची गरज आहे, म्हणून आज मी हा तास घेतो आहे...

चोर पकडणे हे पोलिसांचे एक काम आहे, पण तेवढेच काम पोलिसांना नसते. त्याहून खूप काही जास्त असते. किंबहुना, चोर चोऱ्या करूच शकणार नाहीत, असे काम पोलिसांना करावे लागते. त्यासाठी चोर चोऱ्या नेमक्‍या कशा करतात? हे पोलिसांनी आधी माहीत करून घ्यावे. त्याला गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी असे म्हणतात. प्रत्येक गुन्हेगाराची मोडस ऑपरेंडी वेगळाली असते. त्यावरून गुन्हेगार हुडकणे सोपे जाते. पण पोलिसांनी त्याचा गृहपाठ केला पाहिजे. अनेकदा असे दिसून येते की चोर पोलिसांच्या एक पाऊल पुढेच असतात!! 

गुन्हेगारांच्या तंत्राचा आणि मानसिकतेचा व्यवस्थित अभ्यास करून पोलिस जय्यत तयार असले, की चोरांची आणि गुन्हेगारांची पंचाईत होईल. नाही का? असा पूर्ण अभ्यास केलेला पोलिस अधिकारी प्रसंगी गुन्हा घडण्याआधीच गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन उभा राहील. चोराला चोरीच करता येणार नाही. कल्पना करा : चोर चोरी करायला रात्री अडीच वाजता एका घरात खिडकीतून शिरला! आणि खोलीत तुम्ही त्याच्या स्वागताला रेडी!! कसा होईल त्याचा चेहरा? तुमच्याकडून माझी ही अपेक्षा आहे... कराल ना ती पूर्ण?

गुन्हेगार आपले तंत्र बदलत असतात. पोलिसांनीही आपले तपासाचे तंत्र बदलायला हवे ! उदाहरणार्थ, खोटे बोलणे हा गुन्हा आहे. जाहीर खोटे बोलणे हादेखील गुन्हा असला, तरी बंद खोलीत खोटे बोलणे हा फारच गंभीर गुन्हा आहे. अशा बंद खोलीत खोटे बोलणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन व्हायला हवे. हो की नाही? 

दिलेला शब्द फिरवणे ही तर सरळसरळ चारसोबीसी आहे. पण गुन्हेगारांनी शब्दच फिरवू नये, म्हणून आपण काही कायदे करायला हवेत! असे कितीतरी नवीन गुन्हे आढळून आले आहेत. पोलिसांनी त्याचा अभ्यास करायला हवा. त्यासाठी तुम्ही काही गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्हाला मी एक जालीम मंत्र देतो, तो रोज एकशेपाच वेळा लिहून ठेवा. तोंडपाठ करा आणि त्याप्रमाणे वागा! यश तुमचंच आहे... घ्या लिहून!

...चोराच्या वाटा चोराला माहीत ही म्हण चुकीची आहे! चोराच्या वाटा पोलिसांनादेखील माहीत हव्यात! काय कळले? जय महाराष्ट्र.