ढिंग टांग : अर्धीमुर्धी रात्र!

ढिंग टांग : अर्धीमुर्धी रात्र!

अर्धपोटी, भुकेली मध्यरात्र
शोधीत असते लेकुरवाळा फूटपाथ,
कण्हत असते बीमारीने
दिवसभराच्या पायपीटीने
भेगाळलेल्या टाचांचे भेदाभेद
कुर्वाळत बसून राहाते
कुठल्यातरी निर्मम खांबापाशी.

या महानगराच्या अप्पलपोट्या
धावपळीचे जिवट कौतुक
विरळ होत जाते तिन्हीसांजेला.
आळोखे पिळोखे देत पलंगावरच
बसून राहाते लाल वस्ती.
रंगरंगोटी करुन खिडकीत येऊन
शुकशुकणारा उलटा प्रहर 
रांगत, रेंगत चढतो आणि उतरतो
निमुळते, मळकट जिने.

श्रमिकांचे जीवित बरेचसे बुडते
काळोखात, उरलेले तरंगते
लबडबणाऱ्या डबकेसदृश
काळ्या पाण्याच्या पृष्ठभागी.
धुवट जिवीताची तुटत जाते नाळ
उरलेल्या रातीचा सांडता प्रहरदेखील
शांतपणे निघून जातो
गस्तीवरल्या पोलिस व्हॅनसारखा.
हमरस्त्यावरील भरधाव वाहने
वेगाने सुसाटत जातात.
टायरखाली न येतादेखील
कुचलली जाते अर्धीमुर्धी रात्र,
विनातक्रार. विनाअट. विनापाश.
तेव्हा होर्डिंगवरला फिल्मी सितारा
पाहात राहातो प्रेषिताच्या नजरेने
आणि ईश्‍वरी आवाजात पुकारतो :
‘‘जा, एक दिन जी ले और...
ए दिन जी ले और...’’

नॅशनलच्या तिठ्यावर लॅम्पपोस्टपाशी
अस्लमच्या चरचरणाऱ्या तव्यावर
भुर्जीपाव, आमलेटचे अन्नछत्र
होत जाते तुरळक. मंदावतो  
भरभरणारा स्टोव्ह, जसा 
मावळावा मळकट चंद्र
स्टॉक एक्‍चेंजच्या इमारतीआड.
जीपीओसमोर जगनच्या ठेल्यावर
थांबते वर्दळ... तव्याखाली
पडलेले उरलेसुरले अन्न
गोळा करुन जगन ठेवतो
तिष्ठलेल्या अर्धपोटी रात्रीच्या पुढ्यात.
रे रोडवरल्या ‘तलेली मुर्गी’ आणि 
‘पायापाव’चे मुर्गसत्र थबकते काहीसे.
शाहीनच्या गल्ल्यावरचा उस्मानशेठ
अर्धे शटर करतो डाऊन, आणि
तरीही देतो प्लेटभर चिकनरस्सा
भाजक्‍या रोटीसकट..अडलेल्या,
नडलेल्या, झिंगलेल्या, भिंगलेल्यालाही.

सायकलच्या दुतर्फा कॉफीचे
अगडबंब थर्मास लावून
मुरुगन निघतो धंद्याला.
ओततो गिऱ्हाइकाबरहुकूम
चिमुकल्या कपात घोटघोटभर रात्र.
मर्झबान बेकरीचे धुरांडे 
धुधुकते उत्तररात्री, भाजून निघतो
उगवणारा ताजा दिवस
खमंग वासाने दर्वळतो 
आसमंत... अर्ध्या रात्री.

पावभाजीच्या तव्यावरल्या अठरापगड
भाज्या, देठतुकड्यांना चिरडत, चेंदत
कैलास करतो खणखणाट कालथ्याचा
विजयी मुद्रेने पिटवतो डिंडिम
रात्रीचे प्रहर संपुष्टात आल्याचा.

उत्तररात्रीच्या ऐन प्रहरात
सुटते पहिली लोकल,
आणि रात्रीच्या उजेडातली
जगण्याची धडपड 
हळहळू काबीज करत जातो
दिवसाचा काळोख.

...पाय ओढत गर्दीत हरवून
जाणारी अर्धीमुर्धी, भुकेली रात्र
पचकन थुंकते आणि पुटपुटते :
‘‘च्यामारी, तुमच्या
 नाइट लाइफच्या!’’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com