ढिंग टांग : खुर्च्या!

ब्रिटिश नंदी
Wednesday, 15 January 2020

तुला काहीही माहिती नसते हल्ली! सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी सगळे पक्ष एकत्र येणार आहेत! या मोदी सरकारला आता इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही!

बेटा : ढॅणटढॅऽऽऽण! मम्मा, आयम बॅक!!

मम्मामॅडम : (खुर्च्यांची मांडामांड करत) हं... बरं झालं आलास! माझ्या मदतीला ये!

बेटा : (कमरेवर हात ठेवून) हे काय चाललंय? कुणी मला सांगेल का?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मम्मामॅडम : (एकावर एक खुर्च्या उपसत) तुला माहीत नाही? आपण आज सर्वपक्षीय मीटिंग बोलावली आहे!

बेटा : (आठ्या घालत) सर्वपक्षीय मीटिंग? कशासाठी?

मम्मामॅडम : (खुर्च्या मांडत) येस! सगळे येणार आहेत! तुला काहीही माहिती नसते हल्ली! सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी सगळे पक्ष एकत्र येणार आहेत! या मोदी सरकारला आता इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही! हुकूमशाही वृत्तीचे! जुलमी!! समाजात दुही पसरविणारे!!

बेटा : (थंडपणे) ते सगळं ठीक आहे, पण... कोण कोण येणार आहे?

मम्मामॅडम : सगळे येणार आहेत... झाडून सगळे! त्या कमळवाल्यांच्या विरोधात आता देश एकवटला आहे! 

बेटा : (एका खुर्चीत दाणकन बसत) कधी आहे मीटिंग?

मम्मामॅडम : (मागल्या खुर्च्यांची रांग मांडत) ही काय आत्ताच! लोक येतीलच इतक्‍यात!! (किंचाळत) त्या खुर्चीवर बसू नकोस! ती आपल्या  ममतादीदींसाठी राखीव खुर्ची आहे! 

बेटा : कोण? त्या कलकत्त्याच्या ममतादीदी?

मम्मामॅडम : (निक्षून सांगत) दुसरं कोण आहे या देशात ममतादीदी नावाचं? सीएए आणि एनार्सीला कडवा विरोध चालवलाय त्यांनी!

बेटा : (दुसऱ्या खुर्चीत बसत) नहीं आनेवाली वो! तुम देख लेना!! आपण बंगालमध्ये कम्युनिस्टांबरोबर हातमिळवणी केली, म्हणून त्या रागावल्या आहेत!

मम्मामॅडम : (पुन्हा ओरडत) त्या खुर्चीतून आधी उठ! 

बेटा : (अनिच्छेने उठत)...पण काऽऽऽ?

मम्मामॅडम : (हातातली नावांची यादी तपासत) ती खुर्ची मायावती बेहेनजींची आहे!

बेटा : (अजिबात न उठता) त्यासुद्धा येणार नाहीत! बघशील तू!! प्रियांकादीदीनं यूपीत धमाल उडवल्याने त्यासुद्धा वैतागल्या आहेत!

मम्मामॅडम : (खुर्च्यांचा हिशेब लावत) इथं केजरीवालजी...

बेटा : (आरामशीर बसत) तेसुद्धा येणार नाहीत! दिल्लीच्या इलेक्‍शनमध्ये आपण विरोधात लढतो आहोत!...

मम्मामॅडम : (दुर्लक्ष करत) इथं अखिलेशजी... इथं बारा नंबरची खुर्ची बारामतीकर अंकलची!... इथं... इथून तीन-चार खुर्च्या डाव्या पक्षांसाठी राखीव आहेत!

बेटा : (कुत्सितपणे) डाव्यांसाठी तीन-चार खुर्च्या? तेवढ्यात त्यांचा आख्खा पक्ष मावेल! हाहा!!

मम्मामॅडम : (स्वत:शीच) ही खुर्ची इथं ठेवावी की न ठेवावी? विचार करतेय...

बेटा : कुणासाठी मांडणार आहेस ही खुर्ची?

मम्मामॅडम : (मनातल्या मनात राजकीय आडाखे बांधत) तशी मागल्या रांगेतच आहे म्हणा! दाराशेजारीसुद्धा आहे! फारशी अडचण व्हायची नाही!... पण मांडायची का ही खुर्ची? काय करावं? अहमदअंकल म्हंटात मांडून ठेवा, बाकीचे म्हणतात काही नको ही खुर्ची!

बेटा : (गालातल्या गालात हसत) शिवसेनेसाठी खुर्ची मांडतेयस ना?

मम्मामॅडम : (खुदकन हसत) हुशार आहेस! कसं ओळखलंस?

बेटा : (पोक्‍तपणे) उचलून ठेव ती खुर्ची! ते येणार नाहीत! त्यांना निमंत्रणच नाही!!

मम्मामॅडम : (उसळून) मघापास्नं ऐकतीये! हे येणार नाहीत, ते येणार नाहीत!! चांगल्या कामाला अशी नकारघंटा वाजवू नये!! सगळ्यांनी सीएए आणि एनार्सीला विरोध केलाय! एकत्र येऊन तोच विरोध जाहीर करायला काय हरकत आहे?

बेटा : (नव्या राजकारणाचा धडा देत) मम्मा, प्लीज नोट! या सगळ्या पक्षांना एकत्र येण्याचं कारण एकच आहे-सीएए! पण एकमेकांच्या बहिष्काराची कारणं डझनभर आहेत! कैसी होगी सर्वपक्षीय बैठक? उचल त्या खुर्च्या!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article NRC CAA Anti-Forum