esakal | ढिंग टांग : टेस्ट इज बेस्ट! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : टेस्ट इज बेस्ट! 

काही लोकांना आख्खा देश लॉकडाउन करायला आवडतो! हे लोकशाहीविरोधी आहेच, पण मी त्याबद्दल नंतर कधीतरी बोलेन! लॉकडाउन हा काही"कोरोना'च्या साथीवर उपाय होऊ शकत नाही!

ढिंग टांग : टेस्ट इज बेस्ट! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

बेटा : (नेहमीप्रमाणे झक्‍कास एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक! 

मम्मामॅडम : (पुस्तक वाचण्यात दंग...) हं! 

बेटा : (थोडा वेळ वाट पाहून पुन्हा ) मम्मा, आयॅम फायनली बॅक, आय सेड! मम्मामॅडम : (वाचनात मग्न) हं हं! 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बेटा : (वैतागून) इतक्‍या दिवसांनंतर आलो, तरी तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आश्‍चर्य आहे! 

मम्मामॅडम : (भानावर येत) ओह, आलास? ये! कुठे होतास इतके दिवस? 

बेटा : (उजळ चेहऱ्याने) सोशल डिस्टन्सिंग पाळत होतो! अजूनही पाळतोय! पण त्याला काही विशेष अर्थ नाही माझ्यामते!! 

मम्मामॅडम : (काही न सुचून) तुला भूक लागली आहे का? 

बेटा : (राग गिळून) सकाळीच मी माझ्या हातानं ब्रेकफास्ट तयार केला आणि

खाल्लासुद्धा मम्मा! हातासरशी लागलीच प्लेटसुद्धा धुऊन टाकली! हल्ली मी सगळं स्वावलंबनानं करतो! 

मम्मामॅडम : (अभिमानानं) व्हेरी गुड! लॉकडाउनमुळे लोकांना खूप चांगल्या सवयी लागल्या आहेत...नाही म्हटलं तरी! 

बेटा : (नापसंतीनं) लॉकडाउन? हुं:!! 

मम्मामॅडम : (समजूत घालत) लॉकडाउनची का कोणाला हौस असते बेटा? पण काय करणार? दिवसच असे आले आहेत!! 

बेटा : (कुत्सितपणे) काही लोकांना आख्खा देश लॉकडाउन करायला आवडतो! हे लोकशाहीविरोधी आहेच, पण मी त्याबद्दल नंतर कधीतरी बोलेन! लॉकडाउन हा काही "कोरोना'च्या साथीवर उपाय होऊ शकत नाही! हे मोदीजी आणि त्यांचं सरकार सुरवातीला झोपून राहिलं! मी फेब्रुवारीपासून सारखा सांगतोय की अरे बाबांनो, इकडे लक्ष द्या! भयंकर मोठं संकट येणार आहे! पण ऐकतो कोण? 

मम्मामॅडम : (समंजसपणे) ते मान्य आहे, पण- 

बेटा : (तावातावाने) नोप! कोणालाही मान्य नाही! माझं तेव्हाच ऐकलं असतं, तर आज आपण सेफ झालो असतो! 

मम्मामॅडम : (संयमाने) असल्या आरोप-प्रत्यारोपांची ही वेळ नाही बेटा! 

बेटा : (हातावर मूठ हापटत) मीसुद्धा तेच म्हणतोय! लॉकडाउनमुळे आपण फक्‍त पॉजचं बटण दाबतोय! तो काही "कोरोना'च्या साथीवर उपाय नाही! (संशयानं) तू माझी व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्स बघितली नाहीस का? 

मम्मामॅडम : (जपूनच) बघितली ना! 

बेटा : (पोक्‍तपणे) त्यात मी "कोरोना'ची लढाई कशी लढावी लागेल, त्याचा डिटेल प्लान दिला आहे! लॉकडाउन हा काही उपाय नव्हे! 

मम्मामॅडम : (थंडपणाने) हळू बोल! आपल्याच पक्षाच्या राज्य सरकारांनी सगळ्यांच्या आधी लॉकडाउन वाढवलाय! 

बेटा : (खांदे उडवत) व्हॉटेव्हर! लॉकडाउन इज जस्ट नॉट डन! 

मम्मामॅडम : (शांतपणे) तुझ्याकडे काही उपाय आहे का? 

बेटा : (आत्मविश्‍वासाने) अफकोर्स! इस्ट ऑर वेस्ट, टेस्ट इज द बेस्ट! हा खरा मंत्र आहे! 

मम्मामॅडम : (गोंधळून) हे बघ, तू असं काही बोलतोस त्यामुळे क्‍नफ्युजन वाढतं आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये! त्यांनी नेमकं करायचं तरी काय? 

बेटा : (दुर्लक्ष करत) टेस्टिंग वाढवा, टेस्टिंग वाढवा, असं सांगतोय मी लोकांना! हीच खरी स्ट्रॅटेजी आहे!! 

मम्मामॅडम : (गंभीरपणे) इतकं सोपं का आहे ते? की घातला चाट मसाला आणि केलं टेस्टिंग? स्ट्रॅटेजी म्हंजे नेमकं काय करायचंय ते सांग ना? 

बेटा : (खांदे उडवत) सो सिंपल...स्ट्रॅटेजी म्हणजे...म्हणजे...टेस्ट! एनिथिंग इज बेटर, दॅट टेस्ट्‌स बेटर! यु गॉट माय पॉइण्ट ना?