esakal | ढिंग टांग : टास्क देता का, टास्क? 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : टास्क देता का, टास्क? 

थाळ्या-टाळ्या वाजवून झाल्या.मेणबत्त्या लावून झाल्या,पण आता दिवस फार ओकेबोके जात आहेत.असले काही टास्क असले की तीन-चार दिवस फार चांगले जातात.आपण काहीतरी जबरदस्त काम करून ऱ्हायलो आहोत, असे फीलिंग येते.

ढिंग टांग : टास्क देता का, टास्क? 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

मु. म. रा. यांसी एका सामान्य (घरात बसून) लढणाऱ्या लढवय्याचा मानाचा मु. विनंती वि. साहेब, आपल्या आदेशानुसार आम्ही गेले काही दिवस शर्थीने घरात बसून आहोत आणि निकराची लढाई देत आहोत. पूर्वीच्या काळी घोड्यावर बसून युद्ध करीत असत, आम्ही पलंगावर बसून लढत आहो! 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पूर्वीच्या काळी आव्हानाच्या आरोळ्यांनी रणांगणे दुमदुमत असत. आम्ही जांभयांनी घर दुमदुमून टाकीत आहो! 

वेळ जाता जात नाही. फावल्या वेळात करायचे उद्योग, फुलटाइम करायची वेळ आली आहे. काय करावे? असा विचार चालू असतानाच, आपल्याला पत्र लिहावे, असा उपविचार मनात आला. आपण अधूनमधून टीव्हीवर येता आणि आम्हाला धीर देता. तुमचे मार्गदर्शन संपले की खरोखर धीर येतो. जबाबदारीची भावना जागी होते आणि घराच्या दारे-खिडक्‍यांच्या कड्या आम्ही आणखीनच घट्ट लावून ठेवतो. "घरात रहा, सुरक्षित रहा' हा आपला सल्ला आम्ही शिरोधार्य मानला आहे. गेल्या आठ दिवसांत अंडी आणायलासुद्धा जिना उतरलेलो नाही. आठ दिवसांपूर्वी बाहेर पडलो होतो, तेव्हा नाक्‍यावर पोलिसाने हटकले. ""कुठे चाल्ले योद्धे?'' त्याने नम्रपणे हातातले दांडके पेलत विचारले. ""अंडी आणायला'' मी खरे ते उत्तर दिले. अंडी आणायला भांडे कशाला लपवायचे. अंडी म्हंजे का ताक आहे. असो. 

""अंडी? कशाला?,'' त्याने पुन्हा दांडके पेलले. मी सर्द झालो. काय उत्तर देणार? अंडी कशाला हवीत? या प्रश्‍नाला उत्तर काय असू शकते? सध्याच्या काळात कोणी घरी नेऊन उबवीतही असेल, परंतु मला आमलेटासाठी हवी होती. तसे मी त्या पोलिसाला नम्रपणे सांगितले. गरम पाण्याची पिशवी कमरेशी घेऊन गेले आठ दिवस शेकतो आहे. पुन्हा असो. 

हल्ली मी पोळ्या लाटायला शिकतो आहे. तीनातली एक गोल येऊ लागली आहे. खरे तर तिन्ही गोल करू शकीन! पण तसा शोध लागल्यास हे काम कायमस्वरुपी गळ्यात पडेल, अशी भीती असल्याने मुद्दाम काही पोळ्यांचा आकार बिघडवून ठेवत आहे. काळजी नसावी! 

वास्तविक पत्र थेट आदरणीय श्री नमोजींना लिहायचे ठरवले होते. पण तुम्ही अधिक जवळचे! तुमची त्यांच्याशी ओळखदेखील आहे. त्यांचे तुम्ही नान्हा भाई आहात! तेव्हा तुमचा वशिला वापरू न काही साध्य करता येईल, असे वाटले... 

साहेब, श्री नमोजी टीव्हीवर आले की पोटात गोळा येतो. तुम्ही आलात की धीर येतो! हा तुम्हा दोघांमधला मुख्य फरक आहे. "ही लढाई आपण जिंकू...जिंकू म्हंजे काय, जिंकणारच' असे तुम्ही मूठ उगारून म्हटले की आम्हाला प्रचंड स्फुरण येते. गेल्या दोन टायमाला श्रीश्रीनमोजीसाहेबांनी नाही म्हटले तरी विरस केला. तुम्ही हल्ली वारंवार टीव्हीवर येत असता. त्यांना विचारून तुम्हीच आता पुढाकार घ्यावा आणि आम्हाला काही तरी घरबसल्या टास्क द्यावे, ही कळकळीची विनंती आहे... 

थाळ्या-टाळ्या वाजवून झाल्या. मेणबत्त्या लावून झाल्या, पण आता दिवस फार ओकेबोके जात आहेत. असले काही टास्क असले की तीन-चार दिवस फार चांगले जातात. आपण काहीतरी जबरदस्त काम करून ऱ्हायलो आहोत, असे फीलिंग येते. हल्ली तुम्ही दोघेही काहीही टास्क देत नाही, अशी आमची प्रेमाची तक्रार आहे. अधूनमधून टास्क देत जावा, असले छप्पन लॉकडाऊन आम्ही पचवू! आणि अर्थात ही लढाई जिंकू! जिंकू म्हंजे काय...जिंकणारच! कळावे.
आपला आज्ञाधारक,