ढिंग टांग : बजेट फिजेट!

ब्रिटिश नंदी 
Wednesday, 3 February 2021

अर्थतज्ञ असलो तरी आम्ही मनीमाइंडेडदेखील नाही. तरीही लोक आग्रह करतातच. यंदाच्या बजेटसंदर्भात फोनवरुनच मुलाखत देता का? अशी विचारणा आम्हाला (फोनवरुनच) झाली. पुढे- ‘‘इनकमिंग फ्री आहे…बोला!’’  

आम्ही एक सराईत आणि नामचीन अर्थतज्ञ आहो, हे काही आताशा लपून राहिलेले नाही. अर्थशास्त्रातील किचकट आणि क्लिष्ट संज्ञाची फोड करुन अर्थसंकल्पाचे साध्या सोप्या आणि सुबोध भाषेत विश्लेषण करावे, असा आग्रह आम्हाला नेहमीच होत असतो. देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल आम्ही काही मार्गदर्शन करावे, गेलाबाजार भाष्य तरी करावे, अशी गळ आम्हाला घातली जाते. इतकेच नव्हे, तर एखादे स्टेडियम अथवा सभागार राखीव ठेवून तेथेच आमचे अर्थसंकल्पविषयक व्याख्यान ठेवावे, असेही काही जणांनी सुचवून पाहिले. आम्ही नम्र नकार दिला. एक तर आम्ही प्रसिध्दीचे भुकेले नाही, आणि सतत पैशाची भाषा बोलावी, असेही आम्हाला वाटत नाही. अर्थतज्ञ असलो तरी आम्ही मनीमाइंडेडदेखील नाही. तरीही लोक आग्रह करतातच. यंदाच्या बजेटसंदर्भात फोनवरुनच मुलाखत देता का? अशी विचारणा आम्हाला (फोनवरुनच) झाली. पुढे- ‘‘इनकमिंग फ्री आहे…बोला!’’  

आम्ही. ‘‘मा. अर्थमंत्र्यांनी सादर केलेलं बजेट तुम्ही टीव्हीवर बघितलं असेलच!,’’ प्रश्नवजा स्टेटमेंट. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘नाही. सकाळी अकराला आमच्याकडे ग्यासवर कुकर चढतो. तीन शिट्या द्याव्या लागतात! बजेटफिजेटसाठी वेळ कोणाला आहे?,’’ आमचा स्टेटमेंटवजा प्रश्न. ‘‘तरी थोडंफार बघितलं असेलच नं!’’ चिवट उपप्रश्न.

‘‘नाही. नंतर कुकरचं झाकण पडल्यावर थेट जेवायलाच बसलो!’’ आमचं धुवट उपउत्तर. ‘‘यंदाचं बजेट हे आत्मनिर्भर भारताचं आत्मविश्वासाने भरलेलं बजेट आहे, असं काही लोक म्हणतात. तुमचं मत काय?’’ पोलिटिकल प्रश्न.

‘‘काही लोक म्हंजे कमळ पार्टीचे ना?’’ आमचा पोलिटिकल प्रतिप्रश्न.

‘‘उत्तर द्या!’’ उध्दट प्रश्न.

‘‘ माझ्या मते हे बजेट आत्मविश्वासपूर्ण भारताचं आत्मनिर्भर बजेट आहे!’’ आमचं नम्र उत्तर.

‘‘‘आत्मनिर्भर’ या शब्दाची तुमची अर्थशास्त्रीय व्याख्या काय?’’ अवघड अर्थशास्त्रीय प्रश्न.

‘‘जो माणूस कडकीतही हसतमुख असतो, उधारी परत मागितल्यावरही खिक्कन हसतो, एकदा घेतलेले उसने पैसे कधीही परत करत नाही, त्याला आत्मनिर्भर असे म्हणतात,’’ आम्ही हसत हसत दिलेले उत्तर.

‘‘यंदाचं बजेट हे श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारं आणि गरीबांना आणखी गरीब करणारं बजेट आहे, असं काही लोक म्हणतात. तुमचं मत काय?’’ आणखी एक पोलिटिकल प्रश्न.

‘‘इथं काही लोक म्हंजे काँग्रेसवाले ना?’’ आमचा आणखी एक पोलिटिकल प्रतिप्रश्न.‘‘ पुढल्या प्रश्नाकडे वळू!’’ प्रश्नवजा सूचना.

‘‘ वळू कोणाला म्हणता?’’ सूचनावजा प्रश्न.

‘‘यंदा आरोग्यासाठी दोन लाख चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ती पुरेशी वाटते का?’’ आणखी एक अर्थशास्त्रीय प्रश्न. ‘‘ पुरेशी वाटावी! कारण माझी तब्बेत तूर्त साडेचार वर्षे वय असलेल्या वळूसारखी टणक आहे, असं घरचे म्हणतात!’’ आमचे निरर्थक उत्तर.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘सामान्य माणसाला तुम्ही बजेटबद्दल थोडक्यात काय सांगाल,?’’ एक ढिसाळ प्रश्न. ‘‘ काही नाही…मा. निर्मलाआंटी या स्वभावाने खूप चांगल्या आहेत. त्यांच्या हातातली बजेटची लाल वही छान होती! त्यांनी शेरोशायरीऐवजी दाक्षिणात्य भाषेतल्या कवितेच्या ओळीबिळी ऐकवल्या! तीनेक तास सतत लाखो कोटींचे आकडे कानावर पडले की जिवाला उगीचच बरं वाटतं! सारांश : बजेट टॉप होतं!’’ आमचं अत्यंत प्रामाणिक अर्थशास्त्रीय विश्लेषण.

‘‘ या बजेटमुळे आपल्या आयुष्यात काय फरक पडेल?’’ अखेरचा प्रश्न.

‘‘कुठल्याच बजेटमुळे आपल्या आयुष्यात फरक पडत नाही! तसा कुठे पुरावा नाही! झालाच तर टाइमपास होतो, टाइमपास! तेवढाच फरक…,’’ आमचं अखेरचं उत्तर. असो!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article union budget