esakal | ढिंग टांग : तो योग खरा हठयोग! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : तो योग खरा हठयोग! 

देहाची विलक्षण गठडी वळलेल्या अवस्थेत श्रीश्रीनमोजी ध्यानमग्न बसले होते.येक्‍या हाताने दुज्या पायाचा अंगठा पकडून उर्वरित पाय स्वत:च्याच स्कंधावर टाकून देहाची एक वक्र कमान टाकून गृहस्थ ध्यानात गेलेले!!

ढिंग टांग : तो योग खरा हठयोग! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घेणे, हादेखील उदाहरणार्थ एक हठयोगाचाच प्रकार आहे. त्याला उष्ट्रपुच्छचुंबनासन असे म्हणतात. बऱ्याच लोकांना हे विशिष्ट योगासन झक्क जमते. -काहींना नाही जमत! ज्यांना जमते, त्यांना आमचे वंदन असो!! कां की या उष्ट्रपुच्छचुंबनासनासाठी प्रचंड योगाभ्यास लागतो. हा योगाचा अडव्हान्स टाइपचा कोर्स आहे. "बेसिक योगा' झाल्यानंतरची ही अवघड अशी स्टेप आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच ते करावे! त्यासाठी साधक बराच "पोचलेला' लागतो. याच योगासनाला "उष्ट्रासन' म्हणत असावेत, असा आमचा (उगीचच) बरीच वर्षे ग्रह होता. परंतु, सुविख्यात हठयोगी पू. बाबा बामदेव यांच्यामुळे तो दूर झाला. पू. बाबाजी यांस आमचे वंदन असो! कां की, त्यांनी योगाभ्यासाची गोडी लावली नसती, तर आम्ही आज श्रेष्ठ योगी म्हणून मिरवू शकलो नसतो. होय, या क्षेत्रात आमचा बऱ्यापैकी नावलौकिक आहे, हे आम्ही येथे नम्रतापूर्वक नमूद करू. राजधानी दिल्ली येथे "7, लोककल्याण मार्ग' येथील पर्णकुटीत कायम योगसाधनेत गढलेले एक नाणावलेले योगसाधक श्रीमान श्रीश्री नमोजी हे आमच्याच शिष्योत्तमांपैकी एक, येवढे सांगितले तरी पुरे!! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

खरा योगी तो, जो पोटाची खोळ खळाखळा हलवून टाळ्या काढू शकतो. मयूरासनात तासंतास तरंगू शकतो आणि भुजंगासनात निद्राधीन होऊ शकतो. आम्ही हे सारे लीलया करतो! पोटाची खोळ हलविण्याचे प्रकरण तर आम्ही इतक्‍या सराइतपणे करतो की, हल्ली "आम्हाला भूक लागली आहे' असे आम्ही तोंडाने ओर्डून सांगतच नाही. पोट हलवले की झाले!! असो! 

इतकेच नव्हे तर (आताशा) शीर्षासनात उभे राहून आम्ही अन्य योगीपुरुषांशी वार्तालापदेखील करू लागलो आहो. शीर्षासनात उभे (पक्षी : उलटे उभे हं!) राहून गप्पा मारल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता कमी असते, असेही आमचे एक बहुमोल निरीक्षण आहे. शीर्षासनात बोलताना आपापत: "दो गज की दूरी' पाळली जाते, हे त्याचे प्रमुख कारण! उल्टा उभा मनुष्यप्राणी तोल जाऊन आपल्या अंगावर कोसळेल, अशी भीती मनात असते. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवूनच शीर्षासनात उभ्याने गप्पा मारणे शक्‍य होते. तथापि, परवाच्या "इंटरनॅशनल योगा डे'च्या शुभदिनी "योगा ऍट होम, योगा विद फ्यामिली' असे टास्क हठयोगसाधक पू. नमोजी यांनी संपूर्ण राष्ट्राला दिले होते. घरात बसूनच टाळ्या-थाळ्या वाजवणे किंवा पणत्या पेटवणे, यापेक्षा हे टास्क भारी होते, कोणीही कबूल करेल! परंतु, योगासने नेहमी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावीत, असा शास्त्राग्रह असल्याने त्या शुभदिनी आम्ही थेट श्रीमान श्रीश्रीनमोजी यांच्या "7, लोककल्याण मार्ग' येथील पर्णकुटीत जाऊन योगा डे साजरा करावयाचे ठरवले. त्यांच्यासमवेत योगासने करण्याने अननुभूत आनंदाची व आरोग्याची प्राप्ती होते, असा आमचा पूर्वानुभव आहे. तेथे गेलो तर पाहतो तो काय... 

देहाची विलक्षण गठडी वळलेल्या अवस्थेत श्रीश्रीनमोजी ध्यानमग्न बसले होते. येक्‍या हाताने दुज्या पायाचा अंगठा पकडून उर्वरित पाय स्वत:च्याच स्कंधावर टाकून देहाची एक वक्र कमान टाकून गृहस्थ ध्यानात गेलेले!! आम्ही च्याटंच्याट पडलो! हे आता कुठले नवे योगासन? 

अर्धवट घुसमटलेल्या आवाजात श्रीश्री नमोजींनीच त्याचा खुलासा केला. म्हणाले : "त्या कांग्रेसवाल्यांनी लडाखच्या भानगडीत पैज लावून उष्ट्रपुच्छचुंबनासन करून दाखवा, असे सांगितले. त्या भानगडीत हे कुठले तरी नवेच योगासन होऊन बसले आहे... हवे शुं करवानुं?'