ढिंग टांग : द झू कीपर्स!

ब्रिटिश नंदी
बुधवार, 29 जानेवारी 2020

स्थळ : वीरमाता जिजामाता उद्यान, भायखळा, बॉम्बे.
वेळ : साधारण सकाळ किंवा दुपार्ची! प्रसंग : थरारक!
पात्रे : मा. मु. उधोजीसाहेब आणि पर्यावरणतज्ज्ञ ना. चि. विक्रमादित्य.

स्थळ : वीरमाता जिजामाता उद्यान, भायखळा, बॉम्बे.
वेळ : साधारण सकाळ किंवा दुपार्ची! प्रसंग : थरारक!
पात्रे : मा. मु. उधोजीसाहेब आणि पर्यावरणतज्ज्ञ ना. चि. विक्रमादित्य.
......................
उधोजीसाहेब : (हातातला क्‍यामेरा सांभाळत) किती हिंडवणारेस अजून! पायाचे तुकडे पडले रे!!
चि. विक्रमादित्य : (उत्साहात) आणखी थोडंच चालायचंय! इथून पुढे गेलं की आपले पेंग्विन बघता येतात!
उधोजीसाहेब : (कंटाळून) नको रे आता तुझे पेंग्विन! कंटाळा आला!!
चि. विक्रमादित्य : (विजयी मुद्रेने) कोण जातंय पेंग्विनकडे आत्ता! मी सध्या नवीन प्राणी आणले आहेत! ते दाखवायचे आहेत तुम्हाला!
उधोजीसाहेब : (निरुत्साहाने) लौकर आटप! मला हल्ली कामं असतात!!
चि. विक्रमादित्य : (एका नव्या पिंजऱ्यासमोर येत) ढॅणटढॅण! बॅब्स...आता आपण हैना बघणार आहोत!
उधोजीसाहेब : हैना? मैना म्हणायचं आहे का तुला?
चि. विक्रमादित्य : (हबकून) हैनाच! हैना म्हंजे तरस! तरसाचा पिंजरा आहे हा!!
उधोजीसाहेब : आधी लांब उभा राहा बघू पिंजऱ्यापासून! 
चि. विक्रमादित्य : (दिलासा देत) त्यांच्या आणि आपल्यामध्ये काच आहे बॅब्स! 
उधोजीसाहेब : (अविश्‍वासाने) असू देत! तरस फार धोकादायक असतं, असं मी डिस्कवरी च्यानलवर पाहिलंय! या बाजूच्या पिंजऱ्यात कुत्री का ठेवली आहेत? 
चि. विक्रमादित्य : (संयमाने) कोल्हा आहे तो!
उधोजीसाहेब : (मान हलवत) लबाड कुठला! मला फसवतोस? कुत्राच आहे तो!
चि. विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) आता आपण आलो आहोत, मुक्‍त पक्षी विहारात!...हे इथलं खास आकर्षण आहे! इथं तुम्ही तऱ्हेतऱ्हेचे पाणपक्षी जवळून पाहू शकता!
उधोजीसाहेब : (लांबूनच) केवढी ती चोच त्याची! छे, जवळून कशाला?
चि. विक्रमादित्य : (कसलेल्या तज्ज्ञाप्रमाणे माहिती देत) फोक्‍स! हे आहे आपलं नवं उद्यान आणि प्राणिसंग्रहालय! पूर्वी इथे लोक दुपारची झोप घ्यायला किंवा टाइमपास करायला येत असत! कुत्री, कबुतरे वगैरे सोडली तर या प्राणीसंग्रहालयात प्राणीच नव्हते! पण आता इथं पेलिकन्स, स्टॉर्क, सारस, वेगवेगळ्या जातीची बदकं, राजहंस...असे पाणपक्षी मुक्‍तपणे राहतात! 
उधोजीसाहेब : (नवलाईने) उडून गेले तर?
चि. विक्रमादित्य : (फुशारकीने) वर बघा! पाच मजली पिंजरा आहे हा! आपण पिंजऱ्यात आहोत, हेच मुळी या पक्ष्यांना ठाऊक नाही! 
उधोजीसाहेब : (कौतुकानं) आपल्या पेंग्विंन्सना तरी कुठे अजून कळलंय की ते भायखळ्यात आहेत? त्यांना वाटत असेल की ते अजूनही कोरियातच आहेत! हाहा!! 
चि. विक्रमादित्य : (झूच्या गाइडप्रमाणे) शंभराहून अधिक जातीचे पक्षी इथं एकाच ठिकाणी मुक्‍तविहार करतात! इथंच त्यांची घरटी बांधली आहेत! हा पहा त्यांच्यासाठी खास वाहणारा झरा आणि छोटासा धबधबा!! आहे की नाही गंमत?
उधोजीसाहेब : (घाई करत) मला मंत्रालयात जायचंय! चला निघूया!!
चि. विक्रमादित्य : (पुढे चालत येत) हा आहे आपल्या बिबट्याचा पिंजरा!
उधोजीसाहेब : (तोंड वाकडं करत) तो पिंजऱ्यात कशाला? आपल्या बोरिवलीत काय कमी आहेत?
चि. विक्रमादित्य : (खट्‌टू आवाजात) बॅब्स..एवढं सगळं असून या उद्यानात वाघ नाही हो!! तो आणा ना!!
उधोजीसाहेब : (हवालदिल होत) आता मी कुठून आणू? वाघ काय भायखळ्याच्या मार्केटात मिळतो का?
चि. विक्रमादित्य : (बालहट्टानं) एकच!...प्लीऽऽज!!
उधोजीसाहेब : (खोल आवाजात) वाघ पिंजऱ्यातच आहे बेटा! पण त्याचा पिंजरा दिसत नाहीए, इतकंच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dhing tang