esakal | ढिंग टांग : मॅरेथॉन मुलाखत : फॉलआउट!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

महाराष्ट्राचे मा. मु. उधोजीसाहेब यांची म्यारेथॉन मुलाखत गाजली. अशी मुलाखत गेल्या दहा हजार वर्षांत ना कुणी दिली, ना वाचली आणि ना कुणी घेतली! सदर मुलाखतीमुळे महाराष्ट्रच नव्हे, तर दिल्लीचे तख्त हादरले, हे सर्वांना ठाऊक आहेच.

ढिंग टांग : मॅरेथॉन मुलाखत : फॉलआउट!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

महाराष्ट्राचे मा. मु. उधोजीसाहेब यांची म्यारेथॉन मुलाखत गाजली. अशी मुलाखत गेल्या दहा हजार वर्षांत ना कुणी दिली, ना वाचली आणि ना कुणी घेतली! सदर मुलाखतीमुळे महाराष्ट्रच नव्हे, तर दिल्लीचे तख्त हादरले, हे सर्वांना ठाऊक आहेच.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ही मुलाखत अनेकांच्या पायाखालील वाळू सर्कवणारी ठरली. तसे घडणारच होते. कारण या मुलाखतीत म. मा. मु. उधोजीसाहेब यांनी नागरिकत्व कायद्याला काहीसा पाठिंबा दिला आणि एनार्सीला काहीसा विरोध केला. साहजिकच जे वादळ उठणार होते, त्याचे भूकंपात रूपांतर झाले. या मुलाखतीसंदर्भात आम्ही महाराष्ट्रातील काही नामचीन नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यातल्या निवडक येथे प्रसिद्ध करत आहोत.

मा. मु. नानासाहेब फडणवीस : मी एरवी ते वृत्तपत्र वाचत नाही! या वेळीसुद्धा वाचले नाही, पण टीव्हीवर थोडीशी मुलाखत पाहिली. अशा प्रकारच्या मुलाखती समाजात वाढल्या पाहिजेत. मुलाखत घेणारे आणि देणारे या दोघांमध्ये साधा चहाचा कप दिसला नाही, याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले पाहिजे. एकमेकांना चहासुद्धा न विचारणारे हे लोक तीनचाकी सरकार कसे चालवणार? तेव्हा हे सरकार टिकणार नाही. ते गेले की आमचे येईल! ते आले की मीसुद्धा अशी तीन दिवस चालणारी मुलाखत कुणाला तरी देणार आहे. गेल्या टर्ममध्ये ही एक गोष्ट राहून गेली..!! मी पुन्हा येईन आणि म्यारेथॉन मुलाखत देईन!!

उ. मु. दादासाहेब बारामतीकर : हे बघा, कोण कोणाला मुलाखती देतो आणि काय बोलतो, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना मुलाखती देण्याचा अधिकार आहे. पण असल्या मुलाखती वाचायला आणि बघायला आम्हाला वेळ नाही. आम्हाला कामं अस्तात! आणि तुम्ही कशाला आमच्यात काड्या घालताय? निघा!!
आशुक्राव चव्हाणसाहेब : खरं तर अशा मुलाखती देणार नाही, असं लिहून घ्यायचं ठरलं होतं. आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा हा भाग नाही. तेव्हा अशा मुलाखती आणि वक्‍तव्ये टाळायला हवीत. मी मुलाखतीच्या पेपर कटिंग काढून दिल्लीला हायकमांडकडे पाठवल्या होत्या. पण त्यांच्याकडे त्या आधीच पोचल्या होत्या असे कळले. मुलाखतीत काय आहे, हे मी वाचलेले किंवा पाहिलेले नाही, पण ते टाळायला हवे होते, एवढेच.  
बाळासाहेब थोरात : मा. चव्हाणसाहेबांनी नेमकी कुठली प्रतिक्रिया दिली, हे मला ठाऊक नाही. पण त्या मुलाखतीची कात्रणे मी आधीच दिल्लीला पाठवून दिली होती.

माझ्याआधीच मा. पृथ्वीबाबाजी चव्हाणसाहेबांनी दहा-दहा कॉप्या पाठवून दिल्याचे समजले. हायकमांडकडे जाम रद्दी झाली!! असे चालू राहिले तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.

पृथ्वीबाबाजी चव्हाणसाहेब : त्या मुलाखतीची कात्रणे पुढले काही दिवस रोज दिल्लीला पाठवणार आहे. हे सरकार टिकेल, असा विश्‍वास त्यात व्यक्‍त करण्यात आला आहे. तेवढ्यावर आम्ही सध्या समाधानी आहोत. म्यारेथॉन मुलाखतच घ्यायची तर ती आमच्या हायकमांडची घ्यावी लागेल! बाकी कोण काय बोलतंय, याला फारसं महत्त्व आम्ही देत नाही. 

चुलतराजसाहेब ठाकरे : हातात मुखपत्र असलं की कोणीही असल्या मुलाखती देईल! मी मुलाखती घेणारा आहे, देणारा नाही! महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या लोकांच्या म्यारेथॉन मुलाखती मी घेतल्या आहेत. एकदा हातात राज्य देऊन बघा, मी कशा मुलाखती घेतो ते! जय महाराष्ट्र.