ढिंग टांग : कमल चिंतन!

Dhing-Tang
Dhing-Tang

दिल्लीतल्या निवडणुकीनंतर आमच्यात आमूलाग्र बदल झाल्यासारखे काही लोकांना वाटेल. पण तसे नाही दिल्लीतील निवडणूक आणि आमच्या व्यक्‍तिमत्त्वातील बदल हा एक निव्वळ योगायोग आहे. निकालानंतर आम्ही रात्रभर चिंतन केले व पहाटे पहाटे कधीतरी आमचा डोळा लागला. तेव्हाच आम्हाला अचानक दृष्टांत होऊन पुढील मार्ग दिसू लागला. ही प्रभू श्रीरामाची कृपाच आहे, असे आम्ही समजतो.

साथीयों, राजकारण हे पवित्र कार्य आहे व आपण सारे जनतेचे सेवक आहोत. राजकारणात राहून जनतेची सेवा करणे, हे आपले व्रत आहे. किंवा जनतेची सेवा करत करत राजकारण करणेही चालू शकते. परंतु, राजकारण करताना जनसेवेचे भान सुटता कामा नये, ही पूर्वअट आहे. पूर्वी जनसेवा करता करता आमचे राजकारणातले भान बटण तुटलेल्या पाटलोणीप्रमाणे सुटत होते. असे अपघात वारंवार होत राहिले व राज्या मागोमाग राज्ये पराभव पदरी पडत राहिला. दिल्लीत तर त्याचा कहर झाला! 

दिल्लीतील आपल्या बड्या नेत्यांनी डोळे गरागरा फिरवीत, बोटे रोखीत, शिव्याशापांच्या लाखोलीचे पाट मुखातून वाहात आक्रमक प्रचार केला. पण घडले काय? काहीच नाही! पिंजऱ्यातील वाघाने कितीही डरकाळ्या मारल्या, तरी प्राणिसंग्रहालय बघायला आलेल्या बाळगोपाळांची करमणूकच होते. कोणीही घाबरत नाही! तद्वत घडले. आपल्या पक्षनेत्यांच्या डरकाळ्यांना दिल्लीकरांनी हिंग लावून विचारले नाही. परिणामी, विजय दुसऱ्याचाच झाला! 

आपल्या प्रिय कमळ पक्षाच्या चिंतन शिबिरात चिक्‍कार चिंतन झाल्यावर असा निष्कर्ष निघाला आहे, की तिरस्काराची भाषा आपल्या पक्षाला नडली व पराभव पदरात पडला. त्यामुळे आता आपल्याला स्ट्रॅटेजी म्हणून सोज्वळतेचा अवलंब करावा लागणार आहे. त्यासाठी पक्षकार्यकर्त्यांसाठी नवी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. त्यातील ठळक सूचना पुढीलप्रमाणे -
१. यापुढे राजकारण करताना आपले चारित्र्य अत्यंत निष्कलंक, आणि जिव्हा अत्यंत निर्मळ ठेवावी. 

२. कार्यकर्त्याने (भर सभेत) वाईट कधी बोलू नये. वाईट कधी ऐकू नये. वाईट काही पाहू नये. आणि (टीव्हीवाल्यांना) वाईट बाईट देऊ नये.

३. टीव्हीचा क्‍यामेरा दिसला की आपल्या काही ज्येष्ठ नेत्यांना इसाळ येतो. भिवया ताणून, दातओठ खात ते काहीबाही बोलतात. त्याचा मतदारांवर विपरीत परिणाम होतो, असे निदर्शनास आले आहे.

४. प्रत्येक शिवी व लाखोली इज इक्‍वल टु दहा हजार मते असा साधारणत: रेट पडतो. म्हंजेच एक शिवी हाणली की दहा हजार मते जातात! भलभलता आरोप केला तर साधारणत: पंचेचाळीस हजार मते खड्ड्यात जातात, असेही निदर्शनास आले आहे.

५. निवडणुकीत हारजीत होत असते. कधी कधी जीत होते, बऱ्याचदा हार होते! पण तरीही आपला तोल जाऊ देऊ नये.

६. ‘करंट लगना चाहिए’, ‘गोली मारो!’, ‘देश के गद्दार’, असले अपशब्द चुक्‍कूनही वापरू नयेत. अशा प्रकारची भाषा वापरणे हा हिंस्त्रपणा आहे. यापुढे सात्त्विकतेला प्राधान्य दिले जाईल, याची कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी.

७. तिरस्काराचे राजकारण अंगलट येते. प्रेमाचे राजकारणही अंगलटच येते. (खुलासा : प्रेमाचे राजकारण अंगलट येते, याचा शब्दश: घेऊ नये! व्हालेंटाइन डे नुकताच पार पडल्यामुळे हा खुलासा करावा लागत आहे.) म्हणून जिभेवर सदोदित दोनच शब्द नाचवत ठेवावेत.- सबका विकास, सबका विश्‍वास!

८. विरोधकांनी आरोप केल्यास अथवा शिवीगाळ केल्यास मंद हांसून त्यांस ‘शत शत धन्यवाद’ असे उत्तर द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com