ढिंग टांग : केवढे हे क्रौर्य?

ब्रिटिश नंदी
Wednesday, 4 March 2020

अंत:करण जड जड झाले आहे. मन विदीर्ण का काय म्हंटात तसे झाले आहे. एक प्रकारची अनामिक उदासी दाटून आली आहे. गेली कित्येक वर्षे गजबजून गेलेल्या सोशल मीडियाच्या विश्‍वात रमून गेलो होतो, ते विश्‍व आता सोडून जात आहे. यापुढे आपण फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्रामादी ठिकाणी भेटणार नाही. कां काय विचारतां (दांताड वेंगाडुनी)? अहो, ज्या विश्‍वात आमचे परमप्रिय, परमकारुणिक श्रीमान नमोजीनायक नाहीत, तिथं आम्ही कशाला राहू? आणि काय करु? 

अंत:करण जड जड झाले आहे. मन विदीर्ण का काय म्हंटात तसे झाले आहे. एक प्रकारची अनामिक उदासी दाटून आली आहे. गेली कित्येक वर्षे गजबजून गेलेल्या सोशल मीडियाच्या विश्‍वात रमून गेलो होतो, ते विश्‍व आता सोडून जात आहे. यापुढे आपण फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्रामादी ठिकाणी भेटणार नाही. कां काय विचारतां (दांताड वेंगाडुनी)? अहो, ज्या विश्‍वात आमचे परमप्रिय, परमकारुणिक श्रीमान नमोजीनायक नाहीत, तिथं आम्ही कशाला राहू? आणि काय करु? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आता कैंचे येणेजाणे आणि आता कैंचे फॉलो करणे? आता कैंचे लाइक करणे आणि आता कैंचे ट्रोल करणे? सारेच संपले!! आयुष्याची दोरी अचानक तुटावी, तैसेचि घडले. आपला शेर संपला... संपलाच.
दुखी मन मेरे, सुन मेरा कहना, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहनाऽऽऽ...अहह! उहु, उहु, उहू...हाऽऽऽ...

...सॉरी, हुंदका काढायला गेलो आणि चुकून हंबरडाच फुटला!! सोशल मीडियाचा हा परिणाम आहे बरं!! जिथे काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही, पराचा कावळा व्हायला विलंब लागत नाही आणि राईचा पर्वत व्हायला उशीर लागत नाही. सोशल मीडियाचा महिमाच असा! याच... याच मीडियामुळे नव्हत्याचे होते झाले.

कालपरवापर्यंत नाक्‍यावर टाइमपास करणारा गल्लीतला पोरगा चक्‍क पुढारी होऊन उद्‌घाटनांच्या फिती कापायला लागला. कालपरवापर्यंत ज्याला शुद्धलेखन कशाशी खातात हे माहीत नव्हते, तो मान्यवर कवी आणि लेखक झाला. कालपरवापर्यंत ज्याच्या मताला घरातदेखील कुणी हिंग लावून विचारत नव्हते, तो आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भाष्यकार ठरला. कालपरवापर्यंत कडकीपायी उधारउसनवारी करुन नंतर फूटपाथ बदलणारे महाभाग हा हा म्हणता नामांकित अर्थतज्ज्ञ आणि विश्‍लेषक झाले... एवढे सारे सोशल मीडियापोटी घडले!!

...पण आता तिथे आमचे परमप्रिय, परमकारुणिक श्रीमान नमोजीनायक नाहीत. सोशल मीडियामधून अंतर्धान पावण्याची भयंकर घनघोर प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. मंगळवारी रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी ‘मी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करतो आहे. बाकी तपशील नंतर कळवतो,’ असा त्यांचा संदेश मिळाला. पोटात खड्डाच पडला. पोटात बर्फाची लादी बसावी तस्से झाले. (खुलासा : रात्री आठ त्रेपन्नच्या सुमाराला बर्फाची लादी नाही तर, बर्फाचे खडे कधी कधी बसतात!! असो.) ब्रह्मांड आठवले.

‘क्‍काय?‘’ मोबाइलच्या फोनच्या पडद्याकडे पाहत आम्ही किंचाळलोच. असे कसे हुईल? हसे असे कुईल? कसे हसे उईल? साक्षात नमोजी फेसबुकातून गायब होणार? हे म्हंजे खुद्द मार्क झुकेरबर्गने ‘‘मी यापुढे पेन्सिलीने डायरी लिहीन’’ असे जाहीर करण्यापैकी आहे! आता इन्स्टाग्रामवर आम्ही फोटो कोणाचे बघायचे? लाइकचे आंगठे कुठे उमटवायचे? यू-ट्यूबवर कुणाचे दर्शन घ्यायचे?

ब्याटरी डाऊन झाल्यावर आणि (छोट्या पिनेचा) चार्जर हरवल्यावर जसा जीवनावरला विश्‍वास उडतो, त्याला आठाने गुणले, तर जेवढे दु:ख होईल, तेवढे आम्हाला या घटकेला होत आहे.
...ते पहा! ते ट्‌विटरचे निळे पाखरु कसे दु:खातिरेकाने निपचित पडले आहे!!
‘‘मातीत ते पसरले अतिरम्य पंख
केले वरी उदर पांडुर निष्कलंक
चंचू तशीच उघडी पद लांबवीले
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!
...ही रे. टिळकांची अजरामर कविता (फारा दिसांनी) आमच्या ओठीं आली आहे.
...दोन्ही हात (पंख नव्हे!) पसरुन आम्ही श्रीमान नमोजीनायक यांची आळवणी करीत आहो : नका, नका हो, असे निष्ठुर होऊ! तुम्हावर केहेली ही मरजी बहाऽऽल, नका सोडुनि जाऊ रंगमहाऽऽल!
(ताजा कलमः केवळ महिलादिनानिमित्त नमोजीनायकांनी समाजमाध्यमांचे दान केले असले तरी एक दिवसाचा विरहदेखील आम्हाला सहन होणार नाही.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dhing tang