ढिंग टांग : अभिनंदन सोप्या भाषेत!

Dhing-Tang
Dhing-Tang

आदरणीय प्रिय मा. फडणवीस सर यांसी, सादर सप्रेम प्रणाम. कालचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झक्‍क झाला. तुमचे ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक प्रकाशित झाले, याचा महाराष्ट्रात खूप लोकांना आनंद झाला आहे. तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला जमलेली गर्दी बघून च्याटंच्याट पडलो. कोण म्हणतो मराठी पुस्तके खपत नाहीत म्हणून? स्वत: अर्थमंत्री मा. दादासाहेबांनी डझनभर पुस्तके खपवलीन!! मला अर्थशास्त्रातले ओ की ठो कळत नाही, हे मी जाहीरपणे सांगितले आहे. त्यात लपवण्यासारखे काय आहे? मला फोटोग्राफीतले कळते. त्याची दोन-तीन पुस्तके मी प्रसिद्ध केली आहेत. तुमचेही पुस्तक आले, तुम्ही आता सर्टिफाइड (पक्षी : दाखलेबाज) लेखक झालात! खूप खूप अभिनंदन! मराठी भाषेत ज्ञानाधिष्ठित साहित्य प्रसिद्ध होत नाही, हीच तर मराठीची रडकथा असल्याचे मला सांगण्यात आले. मला ज्ञानाधिष्ठित साहित्यातलेही काही कळत नाही, हेदेखील मी जाहीरपणे सांगितले आहे. त्या. ल. का. आ.? असो.

‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे तुमच्या पुस्तकाचे टायटल मला भयंकर आवडले. मी लागलीच पुस्तक वाचायलाच घेणार होतो. पण मनात म्हटले की रात्री जेवणबिवण झाल्यावर बडिशेप चघळत पुस्तक वाचायला मजा येईल. चि. आदित्यला मी तसे बोलूनही दाखवले. पण तो म्हणाला, ‘‘बॅब्स, हे काही थ्रिलर नाहीए! साधं इकोचं पुस्तक आहे, तुम्ही बोअर व्हाल!’ मी त्याला दटावले. ‘इको म्हंजे इकॉनॉमिक्‍स’ असे चि. आदित्य म्हणाला. या विषयात खूप विद्यार्थी गचके खातात, असेही जनरल नॉलेज त्याने दिले. त्याच्या बोलण्याकडे मी साफ दुर्लक्ष केले.

...रात्री झोपण्यापूर्वी मी पुस्तक उघडले. पहिले पान जेमतेम उलटले, तेवढ्यात प्रगाढ झोपच लागली! हल्ली माझे हे असे होते! दिवसभर कामाने खूप दमायला होते. फायली (सॉरी, नस्ती! सरकारी शब्द!!) वाचून जीव अगदी विटून जातो. आता मी फायलींवर दिसेल न दिसेल असा कावळा काढायलाही शिकलो आहे!! कावळा काढणे म्हणजे सही करणे, हेसुद्धा मी आत्ता आत्ताच शिकलो.

...बाकी तुमचे पुस्तक अतिशय अप्रतिम आहे. त्यात सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगितला आहे. तुम्हाला हल्ली (माझ्यामुळे) खूप रिकामा वेळ मिळू लागला आहे. या रिकाम्या वेळाचा सदुपयोग करा! आणखी अशीच अर्धा डझन पुस्तके लिहा. ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ नंतर ‘नगर विकास सोप्या भाषेत’, ‘मेट्रो प्रकल्प सोप्या भाषेत’, ‘समृद्धी महामार्ग सोप्या भाषेत’, ‘बुलेट ट्रेन सोप्या भाषेत’ अशी किती तरी पुस्तके तुम्हाला लिहिता येतील. तुमच्या लिखाणाला छानदार शैली आहे. जणू काही आपला पंचवीस वर्षाचा जुना मित्रच आपल्याशी गुजगोष्टी करीत आहे, असे वाचताना वाटते!! तुम्ही पुस्तके लिहिण्यात गर्क राहिलात की, महाराष्ट्राचेसुद्धा आपोआप भले होईल! राज्य कारभार सुरळीत चालू राहील, आणि डोक्‍याला ताप राहणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी एवढे कृपया कराच!!

पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर मी पुस्तकाची प्रत घेऊन स्टेजवरून उतरत होतो. तेव्हा माजी अर्थमंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार भेटले. त्यांना मी पुस्तकाची प्रत दाखवली. म्हणालो, ‘‘बघा, बघा! नाही तर तुम्ही! खाते तुमचे, पुस्तक दुसरेच लिहून गेले...तुम्हीही काहीतरी लिहा की!’’

त्यावर मा. मुनगंटीवारजी म्हणाले, ‘‘हे पुस्तक मीच लिहून दिलंय, असं समजा!’’ हे खरे आहे का फडणवीस सर? पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार. कळावे. आपला. उधोजीसाहेब सीएम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com