esakal | ढिंग टांग : संसर्ग!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

जय महाराष्ट्र! शिवजयंतीच्या पवित्र दिवशी रोजनिशी लिहिण्याचा संकल्प सोडला आहे. तो तडीस जाईल ही तो श्रींची इच्छा. रोजनिशी याने की डायरी लिहिणे सोपे नाही. एकंदरितच काहीही लिहिणे खचितच सोपे नाही. परंतु महाराष्ट्राच्या कारभाऱ्याची चाकरी स्वीकारण्याआधी बरीच वर्षे मी एका वृत्तपत्राचा संपादक होतो, अशी आठवण मला करून देण्यात आली. सबब, डायरी लिहिण्याचे शिवधनुष्य आता पेलणार आहे.

ढिंग टांग : संसर्ग!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

जय महाराष्ट्र! शिवजयंतीच्या पवित्र दिवशी रोजनिशी लिहिण्याचा संकल्प सोडला आहे. तो तडीस जाईल ही तो श्रींची इच्छा. रोजनिशी याने की डायरी लिहिणे सोपे नाही. एकंदरितच काहीही लिहिणे खचितच सोपे नाही. परंतु महाराष्ट्राच्या कारभाऱ्याची चाकरी स्वीकारण्याआधी बरीच वर्षे मी एका वृत्तपत्राचा संपादक होतो, अशी आठवण मला करून देण्यात आली. सबब, डायरी लिहिण्याचे शिवधनुष्य आता पेलणार आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्याचे दिवस राजकीयदृष्ट्या निचिंतीचे आहेत. आमचे सरकार पाडण्यासाठी ना कुणाला सवड, ना कुणाला उत्साह. त्यामुळे तसा आराम आहे! परंतु महाराष्ट्र आज कोरोना विषाणूशी झुंज देण्यासाठी उभा ठाकत आहे. अर्थात, असल्या विषाणूंना आम्ही घाबरत-बिबरत नाही. ज्याने साक्षात कमळाबाईला धूळ चारली, त्याला या य:कश्‍चित विषाणूचे काय भय? आम्ही मर्द मावळ्यांनी ठरवले तर कोरोनाची गच्छंती करणे अवघड नाही. महाराष्ट्राच्या रयतेला माझा हाच संदेश आहे. 

तूर्त मंत्रालयात सर्वसामान्य माणसांना मज्जाव करण्याच्या आज्ञा मी दिल्या आहेत. एकही सर्वसामान्य माणूस त्या इमारतीत शिरता कामा नये, असे मी बजावले आहे. बहुतेक माणसे मास्क लावून हिंडताना दिसतात. परवा सहाव्या मजल्यावर मी काही संशयितांना पाहिले!! पोलिसांना बोलावणार होतो, पण पोलिस ओळखता येईनात! कारण त्यांनीही मास्क लावलेला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्री देशमुखसाहेबांच्या कानावर घातले. म्हणालो, ‘‘अहो, मास्क लावून आलेल्यांपैकी काही सरकारविरोधात कारवाया करणारे विरोधी पक्षातले नाहीत, याची खात्री कोण करणार?’’ त्यावर ते काही बोलले नाहीत. ‘‘सांगा, सांगा ना!’’ मी म्हणालो.

‘‘साहेब, मी देसाई आहे हो! उद्योग खात्याबद्दल विचारा!’’ ते चाचरत म्हणाले. चूक त्यांची नव्हती. त्यांच्या तोंडावर मास्क असल्यामुळे माझाच ‘राँग नंबर’ लागला होता. परवाच्या दिवशी एका पोलिस अधिकाऱ्याने काहीही कारण नसताना आमच्या खासगीकडचे पीए मिलिंदोजी यांच्याकडेच ब्रीफिंग केले! सगळे नीट ऐकून मग आमच्या पीएने ‘तो मी नव्हेच’ टाइप घोषणा करून सदर अधिकाऱ्याला माझ्याकडे पाठवले. मास्कधारक व्यक्‍ती न ओळखता हे पोलिस अधिकारी कोणालाही ब्रीफिंग करायला लागले तर महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेचे कसे होणार? आज सकाळी मा. दादासाहेब बारामतीकरांनीही ‘अधिवेशन गुंडाळायला सांगितलंय, सीएमसाहेबांनी!’ असे मलाच डाफरून सांगितले. त्यांची चूक नव्हतीच. मास्क माझ्या तोंडाला होता. ते कसे ओळखणार? जाऊ दे, झाले.

अशाने मंत्रिमंडळाच्या बैठकीतसुद्धा कोणीही येऊन बसले तरी कळणार नाही. म्हणूनच सध्या काही दिवसांसाठी आम्ही लोकांना मज्जाव केलेला आहे. 

परवाचीच गोष्ट! मंत्रालयात जात होतो, तेव्हा लिफ्टमध्ये एक गृहस्थ उभे होते. माझ्याकडे टक लावून बघून मान हलवत राहिले. मी ओळख न दाखवता बघत राहिलो.
‘‘अहो, मी हसून ऱ्हायलोय की!,’’ ते म्हणाले. आवाजावरून ओळखले. ते आमचे जुने मित्र मा. फडणवीसनाना होते. 

‘‘कशावरून तुम्ही... तुम्हीच आहा?’’ माझा विश्‍वास बसत नव्हता. शेवटी त्यांनी तीन सेकंदांसाठी मास्क काढला. झटकन परत लावला. एकंदरित, या करोना विषाणूने उच्छाद मांडला आहे. जेवढ्या लौकर ही बला टळेल तितकी बरी!! 

भलत्या राजकारणाचा संसर्ग त्याहूनही बेकार! तो टाळण्यासाठी सध्या बांदऱ्याहूनच कामकाज पाहण्याचा निर्णय घेतला आहे. बघू या कसे काय जमते ते!! पुन्हा एकदा जय महाराष्ट्र.
(वि. सू. : सदर डायरीचे फाडलेले पान आम्हाला बांदऱ्याच्या सिग्नलपाशीच आढळून आले! मास्क आणि अक्षर लावून लावून वाचताना जीव अर्धा झाला!! ते कोणी लिहिलेले असेल, ते सुज्ञांनी ओळखावे!!)