esakal | ढिंग टांग : सच्चाई!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे.
वेळ : सक्‍काळची. काळ : न्याहारीसाठी खोळंबलेला.
प्रसंग : ‘दूध का दूध..!’ छापाचा.
पात्रे : महाराष्ट्राच्या दौलतीचे नवे कारभारी मा. उधोजीमहाराज आणि सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई (आता विभक्‍त).

ढिंग टांग : सच्चाई!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे.
वेळ : सक्‍काळची. काळ : न्याहारीसाठी खोळंबलेला.
प्रसंग : ‘दूध का दूध..!’ छापाचा.
पात्रे : महाराष्ट्राच्या दौलतीचे नवे कारभारी मा. उधोजीमहाराज आणि सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई (आता विभक्‍त).

(लोकहो! आता दृश्‍य बदलले आहे. अंत:पुरात उधोजीसाहेब येरझारा घालीत असून, दाराची कडी सौ. कमळाबाई वाजवीत आहेत. एरवी चित्र उलटे असायचे. अब आगे...)
कमळाबाई : (कडी वाजवत) कडी काढता ना गडे!
उधोजीसाहेब : (दचकून) आँ? क...क...कोण...कोणॅय?
कमळाबाई : (दबक्‍या आवाजात) इश्‍श! मी तुमची लाडकी कमळा!!
उधोजीसाहेब : (आणखी हादरून) आमची कोणीही कमळा नाही नि लाडकी तर मुळीच नाही!
कमळाबाई : (लाडीक आवाजात) काढता ना कडी? की असंच दार लावून बोलत राहायचंय?
उधोजीसाहेब : (निर्धाराने) ती वेळ गेली कधीच! आता कडी काढणे नाही आणि घालणे नाही! आम्हांस खोट्यात पाडून तेव्हा तुम्ही तोंड काळे केलेत, आता कड्या वाजवून काय उपेग?
कमळाबाई : (अप्राधी सुरात) चुकलं ना गडे आमचं! आपल्या माण्साच्या चुका आप्ल्या माण्सानं पोटात नै घ्यायच्या तर कुणी घ्यायच्या? काढता ना कडी?
उधोजीसाहेब : (बंद दाराकडे पाठ फिरवून) नाही, नाही, त्रिवार नाही! 
कमळाबाई : (मखलाशी करत) इतकी नाटकं बरी नव्हेत! शेवटी आपलं माणूस कोण हे कळलं पाहिजे हं! पुरे झाला आता तमाशा! दार उघडा कसे?
उधोजीसाहेब : (खिडकीसुद्धा घट्ट लावून घेत) तू इथून चालती हो कमळे! तुझा माझा काहीही संबंध नाही आता!
कमळाबाई : (मुसमुसत) चुकले, चुकले, चुकले! एका छोट्याशा चुकीची किती शिक्षा द्याल?
उधोजीसाहेब : (संतापातिरेकाने) छोटीशी चूक? छो-टी-शी? कमळे, तुझ्या या छोट्याशा चुकीमुळे महाराष्ट्राचं विधिलिखित बदललं!! 
कमळाबाई : (खाल मानेनं) हो, मी फसवलं! फसवलं! फसवलं! आख्ख्या जगाला ओरडून सांगितलं की मी फसवलं! आणखी काय हवं! चुकीची अशी जाहीर कबुली देऊनदिखील तुम्ही कडी काढत नाही, याला काय म्हणायचं?
उधोजीसाहेब : (विजयी मुद्रेने) हेच आम्ही पहिल्या दिवसापासून ओरडत होतो की बंद खोलीत जे काही बोलणं झालं, ते बाहेर येऊ द्या! शंभर दिवस उलटून गेल्यावर तुम्हाला अचानक सच्चाईचा पुळका आला होय! (किशोरकुमारचं गाणं गुणगुणत) 
सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसुलोंसे,
के खुशबू आऽऽ नहीं सकती कागज के फूलोंसे...
कमळाबाई : (कानात बोटं घालून) नको गं बाई नको!!
उधोजीसाहेब : (चेवात येत) का? आता का? खरं ओठांवर आलं तर इतकं का झोंबायला लागलं कानाला?
कमळाबाई : (कानातली बोटं काढत थंडपणे) मी तुमच्या गाण्याबद्दल बोलत होते!! काहीही बोला, पण गाणं म्हणू नका...येवढंच! आमच्या सुधीर्जी मुनगंटीवारांनी तोंड उघडलंन, म्हणून आल्ये!! खरं तर त्यांना अशी कबुली देण्याची काही जरुरी नव्हती! पण म्हंटात ना, सत्य कितीही लपवलं तरी एक ना एक दिवस तरंगतंच!! झालं गेलं विसरून आपण पुन्हा एकत्र येऊ या गडे! आम्हाला चूक सुधारण्याची संधी द्या ना गडे!! 
उधोजीसाहेब : (समाधानानं खुर्चीत बसत)...सत्यमेव जयते! माझी बाजू सच्चाईची होती, हे सिद्ध झालं! बास, आता मला काही नको!
कमळाबाई : (चाणाक्षपणे) मग?..काढता ना कडी?