ढिंग टांग : टाळ्या आणि थाळ्या!

Dhing-Tang
Dhing-Tang

अंग हुळहुळते आहे, घराचे दार बंद आहे आणि आम्ही क्‍वारंटाइनमध्ये आहो! होम क्‍वारंटाइनचे तीन उपप्रकार असतात. एक, खोली क्‍वारंटाइन : ज्यामध्ये खोलीत कोंडून ठेवण्यात येते. दोन, न्हाणीघर क्‍वारंटाइन : ज्यामध्ये अर्थातच न्हाणीघरात कोंडण्यात येते आणि तिसरा प्रकार हा फार भयंकर आहे. त्याला बाह्य क्‍वारंटाइन असे म्हणतात. यामध्ये घरामधील त्रासदायक व्यक्‍तीस घराबाहेर काढून कोरोनाच्या हाती बहाल केले जाते.

आम्ही तिसऱ्या प्रकारातील क्‍वारंटाइनमध्ये आहो!
त्याचे घडले असे, की आइतवारी सायंकाळी पाच वाजता पाच मिनिटे टाळ्या आणि थाळ्यांचा निनाद करण्याची ‘वरून’ आर्डर आल्यामुळे आम्ही जय्यत तयारीत बसून बरोब्बर पाच वाजता कल्लोळ केला. शेजारील नानू बर्वा चेवात होता. त्याने आख्खी परात दारात आणून त्यावर घण घालून मोठा आवाज केला. त्यामुळे आम्हाला इसाळ आला. परिणामी, घरातील अनेक भांडीकुंडी कामी आली. टाळ्या आणि थाळ्यांची आर्डर आम्ही जरा ज्यास्तच मनावर घेतली हे आम्ही कबूल करू. सभोवतालच्या जल्लोषात आपल्या थाळीचा स्वर हा सर्वाधिक असावा, असे कोणाला बरे वाटले नसेल? आमच्या अंगात आलेला उत्साह ओसरावयास बराच कालावधी लागला. असो.

सकाळी आमचेसमोर आमटीचे पातेले आदळण्यात आले, तेव्हा आम्ही सर्द झालो! काय त्या भांड्याची अवस्था!! पंधरा ठिकाणी वांकलेल्या त्या बिचाऱ्या पातेल्याने आपल्या अंतरंगात कशीबशी आमटी धरून ठेविली होती. 

‘‘हे कोठले पातेले?’’ आम्ही चेपलेल्या वाटीतून कसाबसा भुर्का मारीत विचारणा केली.
‘‘पातेलं नाही, काल तुम्ही वाजवलेलं ताट आहे ते!’’ भांड्याकुंड्यांचा पुन्हा एकवार दणदणाट करीत कुटुंबाने खुलासा केला. आम्ही घाईघाईने खिडकी लावून घेतली. बारकाईने बघितले असता दिसले की, पाच चमच्यांची तोंडे उलटी झाली आहेत. झारा आणि कालथा ही दोन्ही आयुधे माना वाकड्या करून पडली आहेत. ‘‘ही ताटली अशी वाकवली कोणी?’’ आम्ही शंका येऊन विचारले.

‘ताटली? ती सरळ झालेली कढई आहे!,’’ कुुटुंबीयांनी माहिती पुरविली. कोपऱ्यातील चौकोनी चेपट्या डब्याबद्दल आम्ही काही विचारले नाही. याच ठिकाणी पूर्वी गोल पिंप होते, हे आम्हाला वेळीच आठवले!

‘नानू बरव्याने मस्तक फिरवलेन! त्याने ग्यासचा सिलिंडर उचलून आणल्यावर मजला पिंप नेणे भाग होते!’’ आम्ही आमच्या कृतीचे थोडके समर्थन केले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परिणामी, आमची रवानगी बाह्य क्‍वारंटाइनमध्ये झाली.
बाह्य क्‍वारंटाइन ही सर्वांत कडक शिक्षा मानावी लागेल. कां की, या स्थितीत माणसास कोरोना विषाणूच्या जवळपास हवाली केले जाते. माणसाला घरात घेतले जात नाही. इस्पितळात जाण्याचा प्रश्‍नच नाही आणि रस्त्यात पोलिस उभे राहू देत नाहीत.

बाह्य क्‍वारंटाइन कालावधीचा सदुपयोग करावा म्हणून आम्ही रस्त्यावर आलो. पाहतो तो काय! हीऽऽ गर्दी!! कोरोना साथ संपुष्टात आली असून, विषाणूविरुद्ध पुकारलेले युद्ध संपले आहे, असेच आम्हाला वाटले. या लढाईत आपण भांड्याकुंड्यांनिशी तुफ्फान लढल्याचे स्मरण होऊन विलक्षण समाधान वाटले. आपण हलकल्लोळ केला नसता, तर आज हा विषाणू तोंड काळे करता ना!!...

छाती काढून आम्ही पुढे सरकलो असता पोलिसांनी हटकले. न घाबरता आम्ही त्यास वाइच चैतन्यचूर्ण मागितले असता, गडी खवळला!!

...अवघा देह हुळहुळतो आहे. घराचे दार बंद आहे आणि आम्ही क्‍वारंटाइनमध्ये आहो! काय करावे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com