esakal | ढिंग टांग : कॉन्फरन्स कॉल!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आम्ही इथे ब्रेक करीत आहोत! ज्यांच्या मिठ्या, हस्तांदोलने आणि गाठीभेटींमुळे साऱ्या जगाचा कारभार चालतो, अशा तिघा दिग्गज, जागतिक आणि अत्युच्च नेत्यांची नुकतीच एका अज्ञात ठिकाणी गोलमेज परिषद पार पडली. ही परिषद फोनवरील परिषदसंपर्काच्या (पक्षी : कॉन्फरन्स कॉल) माध्यमातून झाली की प्रत्यक्ष याबाबत खात्रीलायक माहिती नाही.

ढिंग टांग : कॉन्फरन्स कॉल!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आम्ही इथे ब्रेक करीत आहोत! ज्यांच्या मिठ्या, हस्तांदोलने आणि गाठीभेटींमुळे साऱ्या जगाचा कारभार चालतो, अशा तिघा दिग्गज, जागतिक आणि अत्युच्च नेत्यांची नुकतीच एका अज्ञात ठिकाणी गोलमेज परिषद पार पडली. ही परिषद फोनवरील परिषदसंपर्काच्या (पक्षी : कॉन्फरन्स कॉल) माध्यमातून झाली की प्रत्यक्ष याबाबत खात्रीलायक माहिती नाही. परंतु, हे तिघे एकमेकांशी बोलले व त्यातून जगासमोरील भयंकर संकटातून मानवजातीने वाट कशी काढावी, याचे धोरण ठरले, असे खात्रीलायक ‘सूत्रां’नी सांगितले. कोण बरे हे तीन दिग्गज, जागतिक आणि अत्युच्च नेते? तर त्यांची नावे अशी : चीनचे महामहीम च्यारमान शी जिनपिंग, विश्‍वसम्राट कॅप्टन डोलांड ट्रम्पतात्या आणि वंदनीय श्रीमान नमोजी!! या तिघांच्या परिषदेची ऑडिओ क्‍लिप आमच्या हाती लागली आहे. त्याचे शब्दरुपांतर आम्ही येथे देऊन ऱ्हायले आहो! वाचा-
डोलांडभाई : (अघळपघळपणे) हे देअर..! हौडी!! 
शी जिनपिंग : (दिलखुलासपणे) हुंफ!!
श्रीमान नमोजी : (धावत पुढे येत) माय फ्रॅंड डोलांडभाई!! केम छो!! बध्दा सारु छे ने?
डोलांडभाई : (मागे पळत) सोशल डिस्टन्सिंग! सोशल डिस्टन्सिंग!! डोण्ट कम निअर!! 
श्रीमान नमोजी : (ओशाळून) शी बाबा, काय हे?
शी जिनपिंग : (चमकून) हुंफ?
डोलांडभाई : (टाळी वाजवत) हाहा! तुम्ही शी बाबा म्हणालात, या जिनपिंगसाहेबांना वाटलं की तुम्ही त्यांनाच हाक मारताय!! अशी गंमत!!
श्रीमान नमोजी : (गंभीरपणे) ताली मत बजाव! लोकडाऊनच्या काळामधी टाळी पण वाजवायची नसते! एका हातावरचा कोरोना दुसऱ्या हातावर ट्रान्स्फर झाला तर? क्‍यों शीभाई, बराबर छे ने?
शी जिनपिंग : (अनुमोदन देत) हुंफ!
डोलांडभाई : (वैतागून) जगभर इतका मोठा प्रलय आलाय, पण हे गृहस्थ एक शब्द बोलायला तयार नाहीत! शी:!!
शी जिनपिंग : (चमकून) हुंफ?
श्रीमान नमोजी : (एकाच हाताने टाळी वाजवत) हाहा! माझ्याजेवाच झ्याला!! तेंना वाटला का तमे एने माटेज बुमाबोम पाडे छे!! 
डोलांडभाई : (टेबल वाजवत) याच चायना मालवाल्यांनी जगाचा सत्यनाश केला! मी आधीपासूनच सांगत होतो, या चिन्यांना आवरा! पण तुम्ही लोक यांना झोपाळ्यावर घेऊन बसता! आता यांनी व्हायरसचा धंदा सुरू केला! धिस इज नॉट फेअर मि. जिनपिंग!...(आवाज खाली आणत नमोजींच्या कानात) या माणसाला नावानं हाक मारणं मुश्‍किल आहे, ब्रो! 
श्रीमान नमोजी : (स्वत:ची पाठ थोपटून घेत) मी झोपाळ्यावर बसूनशी वीजनेसची वार्ता करतो! शूं कहे छे शीभाई?
शी जिनपिंग : (झोपाळ्यावर झुलल्यागत) हुंफ!
डोलांडभाई : (केसाची झुलपं सावरत) या महामारीच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा! हे चायनीज लोक आजारी पडले आणि बरेसुध्दा झाले! आम्ही बसलोय इथे शंख करत! 
श्रीमान नमोजी : (हुशारीने) आय हॅव ॲन आयडिया! मी हा कोरोनाच्या प्रोब्लेम यूं सॉल्व करून देणार!
शी जिनपिंग : (संशयानं) हुंफ!?
डोलांडभाई : (च्याट पडत) कमॉन! कांट वेट...जस्ट टेल मी लग्गेच! आमचे लोक माझे चौकाचौकांत पुतळे उभे करायला लागले आहेत! काही दिवसांनी माझं अमेरिकेत फिरणं मुश्‍किल होईल! सांगून टाका!
श्रीमान नमोजी : (शंभर नंबरी कल्पना सांगून टाकत) पूरा विश्‍व अने आपडी सूर्यमालिका लोकडाऊन करून टाकायची!! कोणी जायच्या नाय, यायच्या नाय!! कशी वाटली आयडिया?