esakal | ढिंग टांग : कुलूप
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

उधोजीसाहेब - (प्रयत्नांची शर्थ करत) छे, इतकी धडपड करतो आहे, पण दार उघडेल तर... तुम्ही काहीतरी करा ना, नमोजीभाई!
नमोजीभाई - (खांदे उडवत निर्विकार आवाजात) हुं शुं करुं? घर तुमच्या, ताला तुमच्या, अने चाबी पण तुमच्याच!

ढिंग टांग : कुलूप

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

(बंद दरवाजाला गलेलठ्ठ कुलूप लागले आहे. कमरेचा चाव्यांचा जुडगा काढून भाडेकरू उधोजीसाहेब कुलूप उघडू पाहताहेत! एक चावी लागेल तर शपथ! शेजारी भिंतीला टेकून चाळमालक नमोजीभाई हाताची घडी घालून शांतपणे उभे आहेत. अब आगे...)

उधोजीसाहेब - (प्रयत्नांची शर्थ करत) छे, इतकी धडपड करतो आहे, पण दार उघडेल तर... तुम्ही काहीतरी करा ना, नमोजीभाई!
नमोजीभाई - (खांदे उडवत निर्विकार आवाजात) हुं शुं करुं? घर तुमच्या, ताला तुमच्या, अने चाबी पण तुमच्याच!

उधोजीसाहेब - (संतापून) होऽऽ होऽऽ  आमच्याच आहे, पण कुलुप तुम्ही घातलंत ना?
नमोजीभाई - (इमोशनल चेहरा करत) नाविलाज नो  शुं विलाज? चाळीच्या सुरक्षामाहे मला ताला ठोकावा लागला. 

उधोजीसाहेब - (नेमकी चावी शोधत) यातली कुठली चावी लागेल कुलपाला? छे, नसता घोळ झालाय! आता घरात जाणार कसं? आणि घरातली माणसं बाहेर येणार कशी? 
नमोजीभाई - (हळवेपणाने) लोकडाउनमधी असाच होतो... सांभळ्यो? समद्या भाडेकरुंची एमने एमज हालत झाली आहे! पण मी काय सांगतो, तुम्ही घराच्या अंदर कशाला ज्याते? जिन्यामंदी बैसीने रमी रमो ने!! टाइमपास होऊन ज्याणार!!

उधोजीसाहेब - (वैतागून) रमी रमो काय, रमी रमो! इथे नळाला पाणी आलं की ते भरणार कोण? गॅस चालू राहिला असेल तर? महिनाभर नुसता जिन्यात राहतोय! माणसाला आंघोळ-बिंघोळ काही आहे की नाही? 
नमोजीभाई - (समजूत घालत) धीरज राखो नान्हाभाई, धीरज राखो! आ पण दिवस ज्याणार! टेन्शन घेऊ नका!!

उधोजीसाहेब - (आणखी वैतागून) तुम्हाला काय जातं कोरडा उपदेश करायला? ज्याचं जळतं, त्याला कळतं! हे आमचं घर आहे आणि वाटेल तेव्हा कुलूप उघडून आत जाण्याचा आम्हाला अधिकार आहे!!
नमोजीभाई - (हाताची घडी...) चाळ आमची हाय ने!

उधोजीसाहेब - (सर्द होत) कुलूप तुम्ही घातलंत, त्याअर्थी कुलपाची चावी तुमच्याकडेच असणार! ती एकदाची आमच्या हवाली करा आणि कृपा करून आम्हाला उघडू द्या हे वैतागवाणं कुलूप!! जीव विटलाय नुसता!!
नमोजीभाई - (खिसे उलटे करत) चाबी मारी पासे नथी! तुमच्या घराची चाबी मी कशाला घेऊ? 

उधोजीसाहेब - (हताश होऊन चाव्यांचा जुडगा तपासत) यातल्या निम्म्या चाव्या वाकलेल्या आहेत! उरलेल्या लागत नाहीत! कोपऱ्यावरच्या ‘शहा लॉकरमास्टर’कडून डुप्लिकेट चावी बनवून आणावी लागणार! 
नमोजीभाई - (थंडपणे) शहा चाबीवाला येणार नाय! एवन पण लोकडाउन मां बिझी छे!!

उधोजीसाहेब - (मटकन दारासमोर बैठक मारत) हरे राम! आता काय करू? 
नमोजीभाई - (आध्यात्मिक पवित्र्यात) थोडू विचार  करजो! सब्रना फल मीठा होता है! कुठ लोग हेअरपिनसे भी ताला खोल लेते है!!

उधोजीसाहेब - (दात ओठ खात) मी घरफोडीचे उद्योग करत नाही, मिस्टर! आमच्या घराची चावी ताबडतोब आमच्या हवाली करा! 
नमोजाभाई - (एक चावी काढून देत) आ लैं लो!! पण ताला उघडणार नाय.

उधोजीसाहेब - (गोंधळून) का? चावी याच कुलपाची असेल, तर उघडलंच पाहिजे!!
नमोजीभाई - (शांतपणे डोळे मिटून) तमारे घरने द्वारपर ताला तो छे, पण ... पण आख्या होल इंडियात या ताल्याची चाबीच नाय हाय! कछु सांभळ्यो? जे श्री कृष्ण!!