esakal | ढिंग टांग : नको रे..!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
कळेना उद्या कोण रांगेत आहे
एकेक मोती गळाले गळाले
तरी श्रीहरि अल्पधारिष्ट पाहे

ढिंग टांग : नको रे..!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
कळेना उद्या कोण रांगेत आहे
एकेक मोती गळाले गळाले
तरी श्रीहरि अल्पधारिष्ट पाहे

नको रे असा देऊ अम्हा अंतराय
नको रे विठो, जाऊ सोडोनि ठाय
नको रे नको रे नको रे नको रे
नको रे भयाने जीव करपोनि जाय

दणाणून गेले दिशाकोन सारे
आटे हा दधिची, सुकले किनारे
फुंफाटिला येथ वैशाख वणवा
जळाया निघाले तुझे विश्व का रे?

पहावे तिथे मृत्यूचा मत्त नाच
थिजे अश्रू डोळ्यांत,
उरे फक्त खाच
निर्जीव नेत्रांमध्ये आमुच्या बा
लल्लाटीचा लेख नि:शब्द वाच

ओसाड गावे, उद्ध्‌वस्त वाडे
निष्पर्ण वृक्षावरी बा गिधाडे
निर्जीव निष्प्राण सृष्टीमध्ये या
कसे गाऊ दैवा तुझे मी पवाडे
कितीएक होते, निमाले निमाले
कितीएक खांद्यावरोनीच गेले
कितीएक रांगेत तिष्ठले वा क्रमाने
कितीएक भीतीभयानेच मेले

कशापायी केला सृष्टीचा हा पसारा
कशाला हवा भक्तीचा अन उबारा
दुश्वार दुनियेत या नश्वरांच्या
कशाला हवा बेगडी तो निवारा

जिथे जन्मली गा विज्ञानवाचा
जिथे शास्त्रशस्त्रे अन्‌ खाचखोचा
जिथे अंतराळी याने उडाली, 
तिथे वाढिला वंश हा दुर्बळांचा?

जणू जाय बर्फात गोठून काळ
जणू ठाणिला वाहता तो खळाळ
जणू काय उदरात उद्रेक झाला,
गर्भाशयाआत तुटलीच नाळ 
नको देवराया, नको पाहू अंत
म्हणावे तुला ईश की मृत्यूदूत
स्मरणात राहो तुझ्या अन सदैव
तुझ्या भूमिकेचाच अन्वय नि अर्थ

जयाच्या मुळाशी स्वयं मृत्यू राहे
जयाच्या बीजामाजी मृत्यूच आहे
चढे मांडवावेरी ही विषवल्ली
विषाचे घडे तेथ रे लोंबताहे

अनंता, तुला काय मागू मी माझे
कसे वाहू हे प्रार्थनेचेच ओझे
अम्हा मर्त्य जीवांस काही नको रे
करी सिद्ध आता अस्तित्त्व तूझे

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
कळेना उद्या कोण रांगेत आहे
एकेक मोती गळाले गळाले
तरी श्रीहरि अल्पधारिष्ट पाहे