esakal | ढिंग टांग : वायफाय पे चर्चा!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

बेटा : (नेहमीप्रमाणे जबर्दस्त एण्ट्री घेत) ढॅणडढॅऽऽण...  मम्मा, आयम बॅक! 
(मम्मामॅडमचं बिलकुल लक्ष नाही. त्या वेगळ्याच कामात गर्क आहेत. तोंडानं काहीतरी पुटपुटत आहेत...किती तळतळाट घ्याल गरिबांचे? हे कसलं सरकार? साधं तिकीट काढून देता येत नाही? विमानं कसली पाठवताय? वगैरे वगैरे.) मम्मा, आय सेड, आयम बॅक!!

ढिंग टांग : वायफाय पे चर्चा!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

बेटा : (नेहमीप्रमाणे जबर्दस्त एण्ट्री घेत) ढॅणडढॅऽऽण...  मम्मा, आयम बॅक! 
(मम्मामॅडमचं बिलकुल लक्ष नाही. त्या वेगळ्याच कामात गर्क आहेत. तोंडानं काहीतरी पुटपुटत आहेत...किती तळतळाट घ्याल गरिबांचे? हे कसलं सरकार? साधं तिकीट काढून देता येत नाही? विमानं कसली पाठवताय? वगैरे वगैरे.) मम्मा, आय सेड, आयम बॅक!! 
मम्मामॅडम : (रेल्वेच्याच सुरात तंद्रीमध्ये) पॅण्ट्री कार बंद है! सिर्फ चाय मिलेगी!! (रेल्वे तिकिटांचा हिशेब करत स्वत:शीच).. स्लीपर कोच दहा लाख, जनरल बोगी वीस लाख, आरएसी पस्तीस लाख, वेटिंग लिस्ट दोन कोटी... ओह गॉड, हे कसं मॅनेज करणार?... 
बेटा : (चकित होत्साते) वायफाय असेल तर सगळे प्रश्न सुटतात, असं माझं मत झालं आहे! हल्ली मी सगळ्या गोष्टी वायफायवरच करतो! 
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) गरिबांना कसलं आलंय तुझ्या वायफायचं कौतुक? त्यांना फक्त आपल्या गावी जायचं आहे!! बिचाऱ्या स्थलांतरित मजुरांचा कोणीही वाली नाही, याचं भारी वाईट वाटतं! 
बेटा : (शक्कल सुचवत) मला वाटतं, तू ऑनलाइन बुकिंग घ्यावंस!! 
मम्मामॅडम : (दु:खी स्वरात) ठिकठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागताहेत! आपल्या पक्षानं त्यांना तिकिटं काढून द्यावीत, असं मी ठरवलं आहे! पण- 
बेटा : (अत्यंत इंटलेक्‍चुअल चेहरा करत) फिकीर नॉट! हल्ली मी आपली अर्थव्यवस्था कशी रुळावर आणायची, त्याचा अभ्यास करतोय! हे रेल्वेचं प्रकरण त्याच्यापुढे काहीच नाही!.. हल्ली मी कोणाकोणाशी बोलत असतो ठाऊक आहे ना? जगातले सर्वात मोठे अर्थतज्ज्ञ माझं मत विचारायला लागले आहेत आता! 
मम्मामॅडम : जगातले सर्वात मोठे अर्थतज्ज्ञ म्हंजे आपले मनमोहनअंकलच ना? ते तर काहीच बोलत नाहीत! 
बेटा : मी नोबेल विनर अभिजित बॅनर्जीबद्दल बोलतोय! 
मम्मामॅडम : (आनंदानं) खरंच? काय म्हणाले ते? 
बेटा : (मान डोलावत) ते म्हणाले की यु आर जस्ट ऑन द राइट ट्रॅक! मी त्यांना म्हटलं, की आयम टॉकिंग अबौट इकॉनमी, नॉट रेल्वे! हाहा!! 
मम्मामॅडम : (गडबडून) या घटकेला रेल्वेचाच ट्रॅक सगळ्यात महत्त्वाचा आहे...कळलं? 
बेटा : (सपशेल दुर्लक्ष करत) बॅनर्जीसाहेब आणि रघुराम राजनसाहेब या दोघांनीही माझ्याकडून थोडं थोडं मार्गदर्शन मागितलं! मी म्हणालो, नथिंग डुइंग! तुमचा अभ्यास तुम्ही करा, मी माझा करतो! मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, तुम्हाला त्यातच उत्तरं सापडून जातील! आहे काय नि नाही काय! मग वायफाय चालू करून मी त्यांच्या मुलाखती घेतल्या! त्यांना प्रश्न विचारले! त्यांना उत्तरं मिळाल्यानं ‘थॅंक्‍यू’ म्हणून ते लॉगआऊट झाले!! 
मम्मामॅडम : ( अजूनही रेल्वेच्या तिकिटांमध्येच गुंग...) एवढी तिकिटं काढायची म्हंजेऽऽ... 
बेटा : (बिनधास्तपणे) किती सोप्पंय! खरं तर आपण इतका विचार करण्याचं कारणच नाही! 
मम्मामॅडम : (तावातावाने) आपण गरीब, किसान , मजदूरांचा विचार नाही करायचा, तर कोणी करायचा? 
बेटा : सगळी गंमतच आहे!.. तू रेल्वेची तिकिटं काढण्यासाठी धडपडते आहेस, मी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न करतोय! पण ज्यांनी हे करायला पाहिजे, ते सत्तेत आरामात बसले आहेत!! 
मम्मामॅडम : (हताश होत) हेच तर आपल्या महान लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे बेटा! लोकांच्या कामाची जबाबदारी विरोधकांनाच वाहावी लागते!.. आपणही एकेकाळी सत्तेत होतोच ना?