esakal | ढिंग टांग : व्हेअर इज हू? (अर्थात एक पत्रापत्री!..)
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

टु हूम सो एव्हर इट मे कन्सर्न- 
या पत्राद्वारे प्रमाणित करणेत येत आहे की श्री. शी जिनपिंग या सद्‌गृहस्थांची प्रकृती आता सुधारत असून त्यांना प्रवास करणेची मुभा देणेत कोठलीही वैद्यकीय हरकत नाही. तसेच सदर प्रमाणित व्यक्ती चारित्र्याने निष्कलंक असून सज्जन व सद्‌गुणी लोकांबरोबर (झोपाळ्यावर) उठबस करणारी आहे.

ढिंग टांग : व्हेअर इज हू? (अर्थात एक पत्रापत्री!..)

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

टु हूम सो एव्हर इट मे कन्सर्न- 
या पत्राद्वारे प्रमाणित करणेत येत आहे की श्री. शी जिनपिंग या सद्‌गृहस्थांची प्रकृती आता सुधारत असून त्यांना प्रवास करणेची मुभा देणेत कोठलीही वैद्यकीय हरकत नाही. तसेच सदर प्रमाणित व्यक्ती चारित्र्याने निष्कलंक असून सज्जन व सद्‌गुणी लोकांबरोबर (झोपाळ्यावर) उठबस करणारी आहे. सदर प्रमाणित व्यक्तीच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू सुटला, असा आरोप करणाऱ्यास सूचित करणेत येते की, तसा कोठलाही पुरावा अद्याप हाती लागलेला नसून सदर प्रमाणित व्यक्तीबद्दल कोठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद झालेला नाही, तसेच कोठलीही केस चालू नाही. 
कळावे.
डब्ल्यू. एच. ओ.(हू.) 
वि. सू : याबाबत कोठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही. हलगर्जीपणाचा आरोप करून पेशंटच्या नातलगांनी डॉक्‍टरांना मारहाण केल्याच्या घटना परिचित आहेत. डब्ल्यूएचओचे नेमके अस्सेच झाले आहे...हू:!! 

टु हू (डब्ल्यू. एच. ओ.) ऑर व्हाटेव्हर... 
कोरोनाचा विषाणू चायनामधूनच निसटला! निसटला! निसटला!! त्या तुमच्या शी जिनपिंग की जो कुणी असेल त्याने तो मुद्दाम निसटू दिला, आणि महान अमेरिकेच्या अंगावर सोडला! आणि तुम्ही त्यांना मोकळे सोडलेत! हु आर यु टु गिव देम फिटनेस सर्टिफिकीऽऽऽट? तुम्ही जारी केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राला आम्ही बर्गर खाऊन हात पुसतो! चायनावाल्यांच्या विरोधात सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. आमच्या खुफिया जासूस लोकांनी सगळी माहिती गोळा करत आणली आहे. हूज हू पण आम्ही शोधून काढू! पेशंट नसलेल्याला खोटी सर्टिफिकिटं देण्याचा उद्योग बंद करा! अन्यथा तुमचे लायसन जप्त करणेत येईल! 
वुहान येथील प्रयोगशाळेत विषाणू ठेवलेल्या फ्रीजचे दार बिघडले होते व त्याला फट होती. त्या फटीतून कोरोना निसटला, अशी आम्हाला बालंबाल खातरी आहे. चिनी माणसे वटवाघळे खातात म्हणून आम्ही घाबरणार नाही. तुम्ही वटवाघळे खाल, तर आम्ही हॉट डॉग खाऊ!! पण सोडणार नाही! 
शी जिनपिंग असे नाव धारण करणारे हे गृहस्थ खरेच खरे आहेत की आपले नुसतेच गंमतीशीर नाव, हेच आम्हाला बरेच दिवस कळले नव्हते. पण आता कळले! बघून घेईन! ‘हू’ला आम्ही हाड करतो!! 
तुमचा कधीच नसलेला तात्या. 
 
प्लेसिडेंट डोनाल्डतात्या, 
आशा आहे की हे पत्ल तुम्हास मिळेल, तेव्हा तुमची प्लक्‍लुती ठीक असेल. (आमच्या चिनी भाषेत ‘ल’चा उच्चाल ‘ल’ असा होतो, याची क्‍लुपया नोंद घ्यावी!) कोलोना विषाणू आमच्या प्लयोगशालेतून निसटला, व ही साथ आम्ही लपविली असा तुमचा आलोप आहे. तो चुकीचा आणि अन्यायकालक आहे. तुमच्याकले काही पुलावा आहे का? (खुलासा : पुलावा इंडियामध्ये खाल्ला जाणारा पदाल्थ आहे. पण तो पुलावा हा नव्हे!) 

वुहानमधल्या आमच्या प्लयोगशाळेतला फ्लीज बिघडलेला नाही. आम्ही त्यातच वटवाघळे वगैले ठेवतो. पंधला दिवस छान ताजी लाहतात! वटवाघळाचे कबाब तुम्ही कधी खाल्ले आहेत का? प्लीज एकदा ट्‌लाय कला!! 

बाय द वे, डब्ल्यूएचोचा आणि आमचा काहीही संबंध नाही. आम्ही डॉक्‍टलांना मालहाण कलत नाही. आम्ही फक्त व्यापालात मालहाण (इथे ‘ल’ खलाखुला ‘ल’ आहे.) कलतो. तेव्हा लागावू नका! आपला क्षी जिनपिंग (माझे नाव क्षी आहे, क्‍लुपया इथे तली ‘शी’ कलू नये!!) हूहूहूहू!!