esakal | ढिंग टांग : मास्कटदाबी!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

लॉकडाउनपर्वाच्या उत्तरकाळातील तो एक दिवस होता. रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. काही चुकार चिटपाखरे लंगडत, पार्श्वभाग चोळत घराकडे परतत होती. दांडकेधारी पहारेकरी चौकाचौकांत उभे होते. या दंडेलीचा धिक्कार असो! मास्कटदाबी मुर्दाबाद. क्षणाक्षणाला राजियांची मुद्रा आधी तप्त, मग संतप्त होत गेली. ते विचारात गढले.

ढिंग टांग : मास्कटदाबी!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

लॉकडाउनपर्वाच्या उत्तरकाळातील तो एक दिवस होता. रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. काही चुकार चिटपाखरे लंगडत, पार्श्वभाग चोळत घराकडे परतत होती. दांडकेधारी पहारेकरी चौकाचौकांत उभे होते. या दंडेलीचा धिक्कार असो! मास्कटदाबी मुर्दाबाद. क्षणाक्षणाला राजियांची मुद्रा आधी तप्त, मग संतप्त होत गेली. ते विचारात गढले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विनामास्क स्थितीत राजे अंत:पुरात येरझारा घालत होते. विमनस्क स्थितीत येरझारा काय, कोणीही घालील!  पण राजियांचे तत्त्वचि वेगळे!! खोलीतल्या खोलीत अशा येरझारा घालणे सोपे नाही. या भिंतीकडून त्या भिंतीकडे जाताना योग्यवेळी अबौट टर्न करण्याचे भान हवे!! अन्यथा म्हंटात ना, नजर हटी, दुर्घटना घटी!!

बराच वेळ येरझारा घालून झाल्यावर राजियांनी घड्याळात पाहिले. बरोब्बर अठरा मिनिटे येरझारावॉक झाला होता. -म्हंजे शिवाजी पार्काला एक कंप्लिट फेरीच झाली की! दमगीर होवोन त्यांनी हाक मारिली, ‘‘कोण आहे रे तिकडे? पप्याऽऽ’’ इथून पुढे चक्रे भराभरा फिरली.

कदीम फर्जंदाकरवी राजियांनी आपल्या सवंगड्यांना सांगावा धाडिला. ‘‘जल्द अज जल्द मोहीमशीर होणे आहे. तडक फडक निघोन येणे. हयगय न करणें.’’ तदनुसार आम्ही सारे नवनिर्माणाचे पाईक गडावर जमा झालो. राजे तयार होत होते. ‘जगदंब जगदंब’ असे पुटपुटत राजियांनी तीन वेळा (चहाचे) आचमन केले. कृष्णकुंजगडाचें पायथ्याशी घोडी तयार होती. जागच्या जागी फुर्फुरत होती. आम्ही काळजीपोटी त्यांस विनंती केली. ‘राजे, सील करा तोंडाला!’
‘राजं, मपलर तरी गुंडाळा, तोंडास्नी!’
‘करफू फास काहाडला का?’
‘मला वाटतं, थेट पीपीइ किट परिधान करून मगच जावं. कशाला रिस्क घ्या?’
‘छे, पीपीइ किटमध्ये मरणाचा घाम फुटतो! त्यापेक्षा नुसतं ते पलाष्टिकचं शिप्तर घाला. भागतंय त्याच्यानं!’

एक ना दोन डझनावारी सूचना आल्या. पण राजियांनी हरेक सूचनेकडे दुर्लक्ष केले. आम्ही पुढे केलेला मास्क (एन ९५ हं!) त्यांनी मळके ओलकच्च फडके असल्यागत पकडला आणि दूर फेकून दिला. पीपीइ किट पुढे करणाऱ्या सैनिकाला निव्वळ नजरेने जाळून भस्म केले आणि शिप्तर आणून देणाऱ्याचे टाळके तेथल्या तेथे सडकले!अत्यंत निधड्या छातीने हा नवनिर्माणाचा संस्थापक मोहिमेवर निघाला, पाठोपाठ आम्ही!! भरधाव मंत्रालयी पोचला. अन्य दलांतील म्होरकेदेखील डेरेदाखल होत होते.

महाराष्ट्राचे माजी कारभारी मा. नानासाहेब फडणवीसदेखील आले. त्यांनी राजियांना अदबीने नमस्कार केला.- हसलेही असावेत!! त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. मास्क लावल्यावर हंसले काय, किंवा तोंड वांकडे केले काय, कसे कळणार? तेथे आलेल्या सर्वच शिलेदारांनी मास्क परिधान केला होता. राजियांना ही पर्दादारी मुळीच आवडली नाही. माणसाने कसे पारदर्शक असावे! जसे की आमचे राजे!!

सर्वपक्षीय बैठकीच्या दरबारात चार गोष्टी सुनावून उजळ चेहऱ्याने राजे बाहेर आले. मास्कधारी पत्रकारड्यांनी नेहमीप्रमाणे त्यांस गराडा घातला. राजियांनी अत्यंत मुद्देसूद उत्तरे दिली. 

येका पत्रकाराने छेडलेच, ‘‘राजे, मास्क राहिला!’’ त्यावर राजियांनी सूचक हास्य केले. हॉहॉहॉहॉ’ असे!! त्यांना असे दिलखुलास हंसताना कुणी पाहिले होते? नाही!! 

‘‘तुम्ही सर्वांनी मास्क लावल्यावर आम्हाला लावायची काय गरज?’’ ऐसे अत्यंत चतुर उत्तर देत राजियांनी साऱ्यांनाच निरुत्तर केले. हे बाकी खरे होते.  मुखवट्यांच्या बैठकीत एकतरी खराखुरा चेहरा दिसणे म्हंजे जणू वाळवंटात ओआसिस! मराठवाड्यात चोवीस तास पाणी आणि बरंच काही!
आम्ही अभिमानाने हसऱ्या राजियांचे डोळे भरून दर्शन घेतले आणि धन्य धन्य जाहलो. इति.