ढिंग टांग : अजून आहे बरेच बाकी...!

ब्रिटिश नंदी
Saturday, 16 May 2020

बरेच गेले वाहुन तरीही
अजून आहे बरेच बाकी
या मुलखाच्या पल्याड आहे,
राजस दुनिया सुवर्णवर्खी 

बरेच गेले वाहुन तरीही
अजून आहे बरेच बाकी
या मुलखाच्या पल्याड आहे,
राजस दुनिया सुवर्णवर्खी 

या वाटेवर वळण भयानक
खडे बोचरे अन्‌ काटे
आणि विषाच्या चुळा टाकितो
सर्प बिळातचि फुंफाटे

सहस्त्र कोडी टाकुनि जाती
सटवाईची विधिलिखिते
उडवुनि लावा तारेवरची
अमंगळाची दिवाभीते

हजार जिव्हा लवलवती
अन्‌ हजार येती प्रश्न इथे
त्या सगळ्याला एकच उत्तर
शुभंकराची शुभगीते

पांघरुणी तो देह कोंबुनी
कशास कुढसी फुकाफुकी
दे फेकून ते मळके अस्तर
पहा नीट ही रहाटकी
अजूनही फुलतात बागिचे
अजुनि केवडा घमघमतो
रातराणीला वेड लागते
पारिजातही फुलारतो

आभाळाच्या भाळावरती
झनन झांजरे खुळेच मेघ
नि:शब्दाच्या क्षितीजावरती
बगळ्यांची अन्‌ सुरेख रेघ

अजून पाणवठ्यावर ओला,
मस्त नाहातो उन्हात घाट
अजून आहे आतुरलेली
रंगफुलांची पाऊलवाट

पानावळीच्या आडोश्‍याला
अजून असते मंजुळ गान
घरट्यामधल्या संसाराला
किनखापाचे पिंपळपान
पहा, मृगांचा कळप निघाला
ओलांडुनिया तुझीच वाट
पहा, रानभर मोरपिसारा
फुलुनि दावितो जुनाच घाट

थेंब टपोरे वळवाचे अन्‌
तुझ्या टपकती भाळावर
नभातले ते देणे सुंदर
आले तुझिया दारावर

अजूनही मोहरते अंबर
अंग भुईचे शहारते
कूस वळवुनी सैल मनाने 
अंग टाकुनि थर्थरते

पथदीपांच्या रांगेमध्ये
श्वास सोडते सडक अकेली
वाट पाहते आतुरतेने
रहदारीची ती अलबेली

बंद दुकाने बंद जीविते
बंद माणसे, बंद मने
बंदिस्तांच्या बंदिगृहातच
मौनाची ही विशेषणे

परंतु, असल्या बंदीगृहातच
मुक्त उसळते काहीतरी
पल्याडचा तो मुलुख सख्या रे
बोलवितो तुज पहा तरी

म्हणून म्हणतो
 कशास आता
काळोखाचे उगाच कीर्तन
क्षितिजावरती 
आणि उद्याच्या
दीपोत्सव चाले रात्रंदिन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dhing tang

Tags
टॉपिकस
Topic Tags: