esakal | ढिंग टांग : याचसाठी केला होता अट्टाहास!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. 
काळ : सोकावलेला! वेळ : खेचून आणलेली! 
प्रसंग : कोरोनेशन इन कोरोना टाइम! 
पात्रे : नेहमीचीच...रुबाबदार आणि यशस्वी! 

ढिंग टांग : याचसाठी केला होता अट्टाहास!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. 
काळ : सोकावलेला! वेळ : खेचून आणलेली! 
प्रसंग : कोरोनेशन इन कोरोना टाइम! 
पात्रे : नेहमीचीच...रुबाबदार आणि यशस्वी! 

विक्रमादित्य : (दार ढकलून खोलीत शिरत) हे देअर, बॅब्स!...मे आय कम इन? 
उधोजीसाहेब : (दबक्‍या आवाजात) ऑफ..धी...मॉफ..क...घॉल...फ्रीस..फ्रे!! 
विक्रमादित्य : (गोंधळून) कॅय? 
उधोजीसाहेब : (तोंडावरचा मास्क वर करत) आधी मास्क घालून ये, असं सांगत होतो! या शिंच्या मास्कची मुस्कटदाबी कधी संपणार कुणास ठाऊक! अर्थात हे फार काळ मी चालू देणार नाही! मराठी माणसाचा आवाज बंद करणं आजवर कुणालाही शक्‍य झालेलं नाही!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

विक्रमादित्य : (खांदे उडवत) मास्कची मुस्कटदाबी संपवणं, तुमच्याच हातात आहे, बॅब्स! तुम्ही जाहीर करा, आख्खा महाराष्ट्र त्याक्षणी तोंडाला बांधलेले रुमाल काढून अस्मानात फेकेल की नाही ते बघा! 
उधोजीसाहेब : (अत्यंत कठोरपणे) भलती सूट देणार नाही म्हंजे नाही! मास्क कंपलसरी आहे म्हंजे आहेच! मी तर पुढली पाचेक वर्षं सर्वांना मास्क कंपल्सरी करणार आहे! होय, करणार आहे मी मास्क कंपल्सरी!! 
विक्रमादित्य : (खेळीमेळीने चेष्टा करत) आता काय बोआ, एका माणसाची मजा आहे! पाच वर्षं बघायला नको! कालपर्यंत पंधरा- पंधरा दिवसांचे लॉकडाउन होते, आता एकदम पाच वर्षं की काय!! आँ? 
उधोजीसाहेब : चहाटळपणा पुरे! या संकटाच्या दिवसात माणसानं कसं गंभीर रहायला हवं! मी अत्यंत गांभीर्यानं ही जबाबदारी स्वीकारली आहे, हे लक्षात ठेवा! 
विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) बाकी झालं ते बेस्ट काम झालं! आता पाचेक वर्षं डोक्‍याला तकतक नाही! त्या कमळाबाईच्या नाकावर टिच्चून खुर्चीही मिळवली, आमदारकीचंसुद्धा फायनल काम झालं! आपण दोघेही आमदार आणि दोघेही मंत्री! महाराष्ट्रासाठी हा सोनेरी दिवस आहे! हो की नाही? द्या टाळी! 
उधोजीसाहेब : (भान हरपून अभंग गुणगुणत) याचसाठी केऽऽलाऽऽ होता अट्टाहाऽऽस...! 
विक्रमादित्य : (खुशीखुशीत...) पार्टी तो बनती है, बॅब्स! ही लॉकडाउनची भानगड नसती तर महाराष्ट्रातल्या सर्व मराठी घरांमध्ये आज दिवाळी साजरी झाली असती, दिवाळी! शाखाशाखांमधून फटाके फुटले असते! पुष्पगुच्छ आणि पेढ्यांचे पुडे घेऊन लाखो मावळे आपल्या दारात हजर झाले असते! शिवाजी पार्कावर विशाल सभा पार पडली असती! विचारांचं सोनंबिनं लुटलं असतं...(हताशपणे सुस्कारा सोडत) मगर ये हो न सका! 
उधोजीसाहेब : (समजूतदारपणे) हे लढाईचे दिवस आहेत! लढाईत मेजवान्यांची स्वप्नं बघायची नसतात! 
विक्रमादित्य : (नाराजीने) किमान महाराष्ट्रात चॉकलेटं तरी वाटायची! 
उधोजीसाहेब : (निक्षून नकार देत) नोप! याला तीन कारणं आहेत! एक, चॉकलेटं सुरक्षित आहेत की नाही, याची मला खात्री नाही! दोन, ती काही जीवनावश्‍यक वस्तू नाही! आणि तीन, दुकानं बंद आहेत! 
विक्रमादित्य : (ऐटदारपणे हात पुढे करत) ओके! तरीही आमदार झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! या दिवशी महाराष्ट्रासाठी तुमचा काय मेसेज आहे? 
उधोजीसाहेब : (चक्रावून) मेसेज? 
विक्रमादित्य : (पोक्तपणे) येस, मेसेज!! 
उधोजीसाहेब : (‘फेसबुक लाइव्ह’ केल्यागत हात जोडून) काय बोलू? धन्यवाद! सामाजिक अंतर ठेवा! घरी रहा, सुरक्षित रहा!!! घरात राहूनही आपल्या जीवनातलं ईप्सित साध्य करता येतं! कळलं? जय महाराष्ट्र!