esakal | ढिंग टांग : बचाव, बचाव!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : बचाव, बचाव!

आजची तिथी : प्रमादीनाम संवत्सरे श्रीशके १९४२ वैशाख कृ. द्वादशी.  आजचा वार : ट्यूसडेवार! 
आजचा सुविचार : हाजमोला खाव, कुछ भी पचाव। काम ना बचा तो महाराष्ट्र बचाव!! 

ढिंग टांग : बचाव, बचाव!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : प्रमादीनाम संवत्सरे श्रीशके १९४२ वैशाख कृ. द्वादशी.  आजचा वार : ट्यूसडेवार! 
आजचा सुविचार : हाजमोला खाव, कुछ भी पचाव। काम ना बचा तो महाराष्ट्र बचाव!! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: ( १०८ वेळा लिहिणे) लॉकडाउन एके लॉकडाउन, लॉकडाउन दुणे लॉकडाउन, लॉकडाउन त्रिक लॉकडाउन आणि लॉकडाउन चोक लॉकडाउन...हा पाढा कधी थांबणार..अं? 
लॉकडाउनच्या या पाढ्यात दिवस फुकट जात आहेत. घरात बसून बसून विश्वव्यापी कंटाळा आला आहे. अशावेळी काय करावे? कॅक्रावे? 

...आम्ही एक ब्रह्मांडदर्शक विशाल जांभई दिली. समोरच्या इसमानेही तेव्हाच, तश्‍शीच कडकडीत जांभई दिली. जांभई हे एक संसर्गजन्य प्रकरण असते. एकाला आली, की समोरच्याला येत्येच! आम्ही त्याच्याकडे पाहून भिवया उडवल्या. त्यानेही उडवल्या! आम्ही चिडून दोन्ही भिवया उडवल्या. आश्‍चर्य म्हंजे त्यानेही तश्‍शाच उडवल्यान! आम्ही नाक फेंदारून ओठ वाकडे करून संतप्त नजरेने त्याच्याकडे कटाक्ष टाकला. माणसे काय उर्मट असतात! त्यानेही तश्‍शाच नजरेने पाहिलेन! कोण हा उपटसुंभ? 

मग लक्षात आले की आम्ही आरशासमोरच बसलो आहो! छे!!...हा कंटाळा घालवण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे. काही करायला गेले की लोक म्हणतात, राजकारण करू नका! परवा नुसता राजभवनाच्या कार्यालयात चहा प्यायला गेलो, तर पत्रकार विचारू लागले, ‘‘क्‍या पॉलिटिक्‍स है?’’ अरेच्चा, ही तर कमाल झाली! माणसाने करायचे तरी काय? 

मारुतीच्या शेपटासारखे हे लॉकडाउनचे शेपूट लांबत चालले आहे. त्यात गेल्या अनेक दिवसांत प्रार्थनीय नमोजींनी काही टास्कदेखील दिलेले नाही. माणसाने टास्कशिवाय (लॉकडाउनमध्ये) जगावे कसे? टास्क असले की कसा रिकामा वेळ भरून निघतो. टाळ्या-थाळ्या वाजवणे, मेणबत्त्या पेटवणे, असल्या कामात नाही म्हटले तरी दोन-तीन दिवस चांगले जातात. पण हल्ली प्रत्येक दिवस कसा पहाडासारखा वाटतो. लोटून लोटून किती लोटणार? त्यात आमचे परममित्र श्रीमान उधोजीसाहेब लॉकडाउनचा पाढा संपवायला तयार नाहीत. 

सहा वर्षांची आमदारकी मिळवल्याबद्दल त्यांना अभिनंदनाचा फोन केला. ते ‘‘डब्बल थॅंक्‍यू’’ म्हणाले. मी म्हटले की ‘‘साहेब, तुमचं काही लक्ष आहे की नाही? दिवसेंदिवस रुग्ण वाढतायत!’’ तर ते म्हणाले, ‘‘ माझं लक्ष आहे, खाटा वाढवतोय!’’ 

‘शेतकरी हवालदिल झाले आहेत, मजूर हैराण आहेत!,’’ मी पुढला पाढा सुरू केला. आम्ही (कमळवाले)ही हवालदिल आणि हैराण आहो, हे अर्थात बोललो नाही. आपण स्वत:च्याच तोंडाने कशाला सांगा? 

‘काळजी करू नका, मी बघतोय, काहीतरी करतोय!’’ ते म्हणाले. कोरोनाविरुद्धचे युद्ध मी जिंकत कसे आणले आहे. आता फक्त शेवटला घाव बाकी आहे, असे ते सांगत राहिले. मी फोन ठेवला. हात चोळत गप्प बसलो. काय करणार? आता पुढली पाच अधिक एक अशी सहा वर्षं हेच ऐकत (हात चोळत) बसावे लागणार, या कल्पनेने अंगावर शहारा आला. 
शेवटी मनाचा हिय्या करुन दिल्लीला फोन लावला. ‘‘बोलोंऽऽ...’’ तोच तो दिव्य सानुनासिक स्वर कानी पडला आणि अंतरंग तृप्त जाहले! 
‘‘काहीतरी टास्क द्या गुरुवर...लॉकडाउन खायला उठतो आहे!’’ सद्गदित स्वरात मी कसेबसे म्हणालो. मिनिटभर शांतता पसरली. मग आकाशवाणीप्रमाणे एक वाक्‍य ऐकू आले- ‘‘बेटा, आत्मनिर्भर बनो!’’ 
...आम्ही घ्यायचा तो बोध घेतला आहे. महाराष्ट्र बचाव आंदोलन हाती घेतले आहे. आता आपण लॉकडाउनच्या पाढ्याला डरणार नाही. जय महाराष्ट्र!