esakal | ढिंग टांग : मेरे अंगने में...
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

राजाधिराज महाराज उधोजीराजे दालनात येरझारा घालत आहेत. हवेतल्या हवेत तलवारीचे दोन हात काढत आहेत. अदृश्‍य शत्रूला आव्हान देत आहेत. तेवढ्यात महालाबाहेर गडबड ऐकू येते. राजे सावध होतात. अब आगे... 
उधोजीराजे : (सावध पवित्र्यात) क...क...कोण आहे रे तिकडे? 
मिलिंदोजी फर्जंद : (लगबगीने येऊन मुजरा घालत) मुजरा म्हाराज! म्या हाये की!!

ढिंग टांग : मेरे अंगने में...

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. 
प्रसंग : युद्धाचा. 

राजाधिराज महाराज उधोजीराजे दालनात येरझारा घालत आहेत. हवेतल्या हवेत तलवारीचे दोन हात काढत आहेत. अदृश्‍य शत्रूला आव्हान देत आहेत. तेवढ्यात महालाबाहेर गडबड ऐकू येते. राजे सावध होतात. अब आगे... 
उधोजीराजे : (सावध पवित्र्यात) क...क...कोण आहे रे तिकडे? 
मिलिंदोजी फर्जंद : (लगबगीने येऊन मुजरा घालत) मुजरा म्हाराज! म्या हाये की!! 
उधोजीराजे : बाहेर काय गडबड आहे रे? 
मिलिंदोजी : (उडवून लावत) त्ये ना! तुम्ही लक्ष नका दिऊ! उगा आपलं टाइमपास करत्यात काही लोक! 
उधोजीराजे : (डोळे गरगरा फिरवत) आम्ही लॉकडाउनचा फतवा काढल्यानंतर ही गर्दी का झाली आहे, अं? एकेकाला पोकळ बांबूचे फटके द्या, उठाबशा काढायला लावा! सूर्यनमस्कार घालून घरी पाठवा! चार दिवस अंग आंबून घरी बसतील लेकाचे!! 
मिलिंदोजी : (दातात काडी घालूनशान...) त्ये समदं क्‍येलं धनी!! आईकंना झाल्यात बगा!! आता तुम्हीच सांगा, हा आंदोलणं करायचा टाइम हाये का? पन ऐक्कतच न्हाईत! दाढीला हात लावूनशान समजूत काहाडली! बाबापुता क्‍येलं! पन नाव न्हाई! मेरा आंगण, मेरा रणांगण म्हने!! 
उधोजीराजे : (चक्रावून) क्कॅय? मेरा आंगण, मेरा रणांगण? ही काय भानगड आहे? 
मिलिंदोजी : (आंगठा-तर्जनी मिळवून समजावत) कमळवाल्यांनी आंदोलन केलंया! महाराष्ट्राचं कारभारी घराभाईर जाम पडत न्हाईत! त्यांचा काहीही कंट्रोल उरल्याला न्हाई, असं म्हनत्यात ते!! 
उधोजीराजे : (चवताळून) ही हिंमत? कालपर्यंत आमची बटीक असलेली ही कमळा आता असं बोलायला लागली? जीभ कशी झडली नाही म्हणतो आम्ही!! अरे, आमचं पाठबळ होतं म्हणून या बयेनं इतकी वर्ष राज्य केलं! संकटाच्या काळात आमची साथ देणं राहिलं बाजूला, आता रणांगणाची भाषा करते आहे? 
मिलिंदोजी : (निर्विकारपणे) चुक चुक!! त्यांचं म्हननं असं, की उधोजीमहाराजसाहेबांनी पीपीइ किट घालूनशान महालाभाईर पडून लोकास्नी माणशिक आधार द्याहावा!! 
उधोजीराजे : (तलवार उपसत) नानाची टांग!! मी घराबाहेर पडू? मीच लोकांना सांगतोय की घराबाहेर पडू नका आणि मी तेच करू? मी घरात राहून युद्ध लढतोय, हे अवघा महाराष्ट्र बघतोय ‘फेसबुक’वर लाइव्ह!! मी पीपीइ किट घालून रस्त्यावर फिरायला लागलो तर युद्ध कोण लढेल? ते काही नाही! त्यांचं आंदोलन मोडून काढा! महाराष्ट्रात लाल क्षेत्रात काही गडबड करू पहाल तर एकेकाचे मागील क्षेत्र- 
मिलिंदोजी : (तोंडावर हात मारत) अयाबया, आसं बोलू नका महाराज!! 
उधोजीराजे : (गोरेमोरे होत) बरं बरं! आणखी काय गडबड करताहेत ही कमळाबाईची माणसं? 
मिलिंदोजी : (सहज सांगितल्यागत) तसं काई शीरिअस न्हाई म्हना! ‘शेतकरी, बलुतेदारांना सांभाळा’, ‘५० हजार कोटीचं प्याकेज द्या’ असे बोर्ड घिऊनशान निस्ते हुबे हायेत! उन्हं चढली की गपगुमान घरला जातील बघा! आपन लक्ष दिऊ ने!! 
उधोजीराजे : (विचारात पडत) मेरा आंगण, मेरा रणांगण काय! अरे मग दोन महिने मी काय करतोय? घरच्याच आंगणात तर रणांगण रणांगण खेळतोय!! जा...त्यांना जाऊन सांग! 
मिलिंदोजी : (मुजरा घालत उठून) अक्षी जातो! पन काय सांगू त्यास्नी? 
उधोजीराजे : (हनुवटी खाजवत) अंऽऽ..त्यांना सांगा, महाराजसुद्धा ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’मध्येच बिझी आहेत! जय महाराष्ट्र!!