esakal | ढिंग टांग : एका बैठकीचा वृत्तांत!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

गेल्या आठवड्यात एक अत्यंत महत्त्वाची राजकीय बैठक झाली. या बैठकीमुळे महाराष्ट्राचे राजकारण कंप्लीट बदलेल, असे दिसते. प्रचंड मोठा व देदिप्यमान इतिहास असलेल्या काँग्रेस पार्टीतील काही नेत्यांनी दक्षिण मुंबईतील एका बंगल्यात मास्क लावून मीटिंग केली. आपण सरकारात सामील असूनही आपल्याला सापत्न वागणूक मिळते, या भावनेने काँग्रेस नेते बेजार झाले होते.

ढिंग टांग : एका बैठकीचा वृत्तांत!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

गेल्या आठवड्यात एक अत्यंत महत्त्वाची राजकीय बैठक झाली. या बैठकीमुळे महाराष्ट्राचे राजकारण कंप्लीट बदलेल, असे दिसते. प्रचंड मोठा व देदिप्यमान इतिहास असलेल्या काँग्रेस पार्टीतील काही नेत्यांनी दक्षिण मुंबईतील एका बंगल्यात मास्क लावून मीटिंग केली. आपण सरकारात सामील असूनही आपल्याला सापत्न वागणूक मिळते, या भावनेने काँग्रेस नेते बेजार झाले होते. आपले गाऱ्हाणे कोणाच्या तरी कानावर घालावे लागेल, याबद्दल साऱ्यांचे मतैक्‍य झाले. विविध सूचना झाल्या. या गुप्त बैठकीला आम्ही चहापाणी देण्यासाठी (मास्क लावून) हजर होतो. त्या बैठकीचा हा थोडक्‍यात वृत्तांत -

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही दिवसांपूर्वीच अचानक माझ्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट आली की- राज्याचे महसूलमंत्री आणि पक्षाध्यक्ष मा. बाळासाहेब यांनी विषयाला सुरुवात केली. त्यांनी बोलायला सुरुवात केल्या केल्या, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी कानात काडी घातली आणि विद्यमान सभाध्यक्षांसकट दोघा-तिघांनी घाईगडबडीने आपापला मोबाईल फोन चार्जरला लावला. इतर कुणी कुणी मास्क ठाकठीक करू लागले.

‘‘...लक्षात आलेली गोष्ट ही, की आपणसुद्धा सत्तेत आहोत, हे लक्षात आलं!,’’ मा. महसूलमंत्र्यांनी शोध लागल्यागत जाहीर केले. या शोधाच्या घोषणेने सारेच दचकले. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या चेहऱ्यावर ‘काय सांगताय काय? खरंच?’ असे भाव आले. त्यांनी हातातली काडी आणि कानदेखील बदलला. 

‘‘हंऽऽऽ...कस्तुरीमृगाला कुठे ठाऊक असतं की त्याच्याकडे कस्तुरी आहे?,’’ मा. अध्यक्षांनी एक सुस्कारा सोडत सुभाषित सांगितले. त्यांना हल्ली सुभाषिते फार सुचू लागली आहेत. ना इथे, ना तिथे!! सुभाषिते सुचतील नाही तर काय? 

‘‘पण आपल्याला कुणी मंत्रीच मानून नाही ऱ्हायलं नं!,’’ महसूलमंत्र्यांनी तक्रार केली. हे बाकी खरे होते. काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मनातली वेदनाच जणू त्यांनी मांडली. ज्यांच्यामुळे सरकार तग धरून आहे, त्या काँग्रेसवाल्यांना अशी सापत्न वागणूक मिळणे, हे लोकशाहीला धरून मुळीच योग्य नव्हते. अजिबात योग्य नव्हते.

‘‘अधिकारीसुद्धा विचारीनासे झाले आहेत आपल्याला!,’’ वीजमंत्र्यांनी तोंड उघडले आणि चारशेचाळीस व्होल्टचा झटका दिला. 

‘‘तुम्ही आपले अध्यक्ष आहात! तुम्हीच सीएमशी एकदा बोलून घ्या!,’’ सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी काडी बदलून सूचना केली. 

‘‘बोललो ना! मागल्या खेपेला भेटले तेव्हा त्यांना सरळ विचारलं होतं! पण त्यांनी वळखसुद्धा दाखवली नाही हो!,’’ महसूलमंत्र्यांनी खुलासा केला. 

‘‘याची गंभीर तक्रार केली पाहिजे! हे चूक आहे!’’ वीजमंत्री खवळले.
‘‘त्यांची चूक नव्हती हो! माझ्याच तोंडाला मास्क होता, ते तरी कसे वळखणार?’ महसूलमंत्र्यांनी मवाळपणे सांगितले. हा मवाळपणाच आपल्या अंगलट येतो आहे, यावर काही मिनिटे वादावादी झाली. त्यातही तथ्थ होतेच. काँग्रेसचे एक बरे असते. सगळ्यात काही ना काही तथ्य असतेच!!

‘‘ऐका, मीसुद्धा विषय काढला होता एकदा फोनवर त्यांच्याकडे! म्हटलं आमच्या लोकांना जरा मानानं वागवा की!’’ अध्यक्षभाऊ म्हणाले.
 ‘‘मग? ’’ सा. बां. मंत्र्यांनी आणखी एक नवी काडी काढली.
ते म्हणाले,‘‘हो हो तर! सन्मानाने वागवलंच पाहिजे, वागवणार! हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे! किंबहुना वागवणारच!..वगैरे बरंच बोलले!’’ अध्यक्षभाऊ पडेल सुरात म्हणाले. अखेर बरीच चर्चा झाल्यावर तीन गोष्टी ठरल्या. एक, प्रोटोकॉलप्रमाणे रीतसर भेटीचा प्रस्ताव तयार करावा. दोन, त्यासाठी एक पक्षांतर्गत प्रस्ताव समिती नेमावी आणि तीन, प्रस्तावाचा अंतिम मसुदा हायकमांडकडे मंजुरीसाठी पाठवावा.
...ही बैठक अतिशय फलदायी झाल्याचे वृत्त आहे. इति.