Dhing-Tang
Dhing-Tang

ढिंग टांग : कोंडी!

बेटा : (अत्यंत स्फुरण चढलेल्या अवस्थेत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावून बसलेल्या अवस्थेत) हं!
बेटा : (कमरेवर हात) इतका कसला विचार करते आहेस?
मम्मामॅडम : (चिंताग्रस्त सुस्कारा टाकत) तुझाच! आणखी कसला विचार करणार मी?
बेटा : (उजळलेल्या चेहऱ्याने) मग ठीक आहे! मला वाटलं की आपल्या पार्टीच्या भवितव्याचा विचार करते आहेस की काय!! हाहा!!
मम्मामॅडम : (कोरडेपणाने) तो विचार करणं मी हल्ली सोडून दिलंय! अगदी कोंडीत सापडल्यासारखं झालं आहे!!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेटा : (खांदे उडवत) कसली कोंडी? कुणी केली? कोणाची? कधी? का?
मम्मामॅडम : (कळवळून) कमळवाल्यांनी आपली केलीये कोंडी! तुला समजलं नाही का? कोंडीतून बाहेर पडणं कठीण झालंय!
बेटा : (दिलासा देत) जस्ट डोण्ट वरी मम्मा! मैं हूं ना!
मम्मामॅडम : (कळवळून) तू सारखं सारखं त्या कमळवाल्यांना डिवचणारं का बोलतोस? त्यामुळे ते खवळतात आणि आपल्यामागे या नसत्या चौकशा लावून देतात! बघितलंस नं आता काय झालं ते?
बेटा : (बेफिकिरीनं) काय झालंय इतकं?
मम्मामॅडम : (कपाळावर हात मारत) कोंडी झालीये आपली, कोंडी! जरा कुठे विरोध केला की मेल्या लागला त्या चौकशांचा ससेमिरा मागे! इथून पुढे फक्त कोर्टाच्या खेपा घालत बसावं लागेल अशानं! आणि इथे तुझा तोफखाना चालूच आहे! एक दिवस असा जात नाही की त्या कमळवाल्यांना डिवचणारं काही बोलत नाहीस! अशानं भयंकर संकट कोसळेल आपल्यावर एक दिवस!!
बेटा : (बाणेदारपणाने) देशाच्या रक्षणासाठी मी काय वाट्टेल ते भोगायला तयार आहे मम्मा! एक कडवा विरोधक म्हणून मी किती लौकिक कमावला आहे, हे विसरू नकोस! मैं किसकू डरता नहीं! आँख से आँख मिलाकर बात करता हूं! सच्चाई का खराखुरा सिपाही हूं!! एक दिन ये दुनिया जानेगी की मैं सही था, और तुम गलत! क्‍यूंकी मैंने हमेशा सचही कहा है, और सच के सिवा कुछ नहीं कहा है! मैंने मोदीजी को आँख में आँख मिलाकर-
मम्मामॅडम : (हादरून) हळू बोल! ऐकेल कुणीतरी! भिंतीला कान असतात!
बेटा : (उडवून लावत) हॅं:!! इकडे भिंतीला फक्त आपले अहमद अंकल असतात! आणि मी कोणाला डरत नाही! कर नाही त्याला डर कशाची? गेल्या चार महिन्यांत घरात बसल्या बसल्या या कमळवाल्यांना मी एकट्यानं सळो की पळो करून सोडलं आहे, हे विसरू नका!!
मम्मामॅडम : (विचारात पडत) त्याच्यामुळेच ही कोंडी झालीये आपली, हेदेखील विसरू नकोस!
बेटा : पण या कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग फक्त मलाच ठाऊक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा!
मम्मामॅडम : (हरखून जात) खरंच का? काय सांगतोस काय?
बेटा : (मूठ हातावर हापटत) अफकोर्स! शेवटलं अस्त्र मी काढलं की हे कमळवाले मागे हटतील, याची खात्री बाळग!!
मम्मामॅडम : (उतावीळपणे) काय आहे तुझं ते अस्त्र? मला नाही सांगणार?
बेटा : (डोळे बारीक करून) फोन करून त्यांना सांगणार की मी विपश्‍यनेसाठी चार महिने सुटीवर चाललोय! कसे सुतासारखे सरळ येतील बघ!! सांप भी मरेगा, लाठी भी नहीं टूटेगी! हाहा!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com