ढिंग टांग : हम बोलेगा तो बोलोगे के!

ढिंग टांग : हम बोलेगा तो बोलोगे के!

जो इतिहास विसरतो, त्याला इतिहासदेखील विसरतो, असे कुणीतरी म्हटलेच आहे. या घटकेला आम्ही गुरुवर्य श्रीमान खड्‌गप्रसाद ओली यांच्या सुमीरणाने (अर्थ : स्मरण!) सद्‌गदित झालो आहो!! सुविख्यात इतिहास संशोधक आणि आपल्या विशाल सनातन संस्कृतीचे एक आधारस्तंभ श्रीमान खड्‌गप्रसाद ओली यांना कोण ओळखत नाही? त्यांना इतिहासदेखील विसरलेला नाही आणि विसरणारही नाही! परंतु, जे इतिहासाला विसरले, अशा अनेक अज्ञजनांसाठी आम्ही येथे श्री. खड्‌गप्रसाद यांची थोडक्‍यात ओळख करून देत आहो. वास्तविक श्रीमान खड्‌गप्रसाद यांची ओळख बालकांडापासून उत्तरकांडापर्यंत अनेक खंडांत करून द्यावी लागेल. परंतु, जागेअभावी येथे किंचित परिचयच शक्‍य आहे. तेव्हा सुरू करूया! सियावर रामचंद्र की जय!!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्रीमान खड्‌गप्रसाद ओली हे जागतिक कीर्तीचे प्रकांडपंडित असून नेपाळी आहेत. आमची पहिली भेट अजूनही सुमीरते! (अर्थ : स्मरते!) अंधेरीच्या सात बंगला भागात एके दुपारी फूटपाथवर त्यांनी आम्हाला ‘श्‍यामसिंग की दुकान किधर है?’ असा कूटप्रश्न विचारला होता. हा त्यांचा यक्षप्रश्न आजही आमच्या कानात रुंजी घालतो आहे. आम्ही तेव्हा निरुत्तर झालो, परंतु, त्यांना ‘सॅमसंग’ची शोरूम शोधायची होती, हे नंतर आम्हाला कळलेच!! असो!!

श्रीमान खड्‌गप्रसाद हे कलियुगातील ते क्रमांक दोनचे वाल्मिकी आहेत. कलियुगात संत तुलसीदास विरचित श्रीरामायण रिराइट करण्याचे काम तेच करतील, अशी भविष्यवाणी शास्त्रपुराणात लिहून ठेवलेली आहे. पुरावा घ्या-

‘वाल्मिकिस्तुलसीदास: ओली देवि भविष्यति। रामचंद्रकथामेतां भाषाबद्धा करिष्यती।’ असे वचनच भविष्योत्तर पुराणात (प्रतिसर्ग ४.२०) मध्ये लिहून ठेवलेले आहे. अर्थ उघड आहे. वाल्मिकी आणि संत तुलसीदासांनंतर ओली नामक विद्वान गृहस्थ रामकथा भाषाबद्ध करतील, असा हा आदेश-कम-भविष्यकौल आहे. इतकेच काय, एका प्राचीन दोह्यामध्ये असाच उल्लेख आम्हाला आढळला. हे पहा-

‘रामकथा उत अति मधुर बोली। पढत पढे जो मतिमंदसु ओली।।’...अर्थ सोपा आहे. -ओली यांनी पढलेली रामकथा कोणालाही समजेल! -आम्हाला समजली!! प्रारंभी आमचाही या दोह्याबद्दल काहीएक गैरसमज होता. असो, असो!! अशा या सुविख्यात ओलीपंडितांनी नुकताच आपला संशोधन प्रबंध जाहीर केला. श्रीरामांचे जन्मस्थान शरयुतीरावरी अयोध्या ही नसून, दक्षिण नेपाळातील ठोरी या पवित्रग्रामी त्यांचा जन्म झाला. हे आधी कळले असते तर ‘गीत रामायणा’तील ‘शरयुतीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी’ हे गीत बदलून ‘नेपाळातील नगरी अद्रभुत, नाव तिचे ठोरीऽऽ’ असे काहीसे झाले नसते का? अयोध्या वगैरे सारे काल्पनिक आहे, हा त्यांचा निष्कर्ष वाचून ‘आपण इतके वर्षे काय केले?’ या विचाराने पू. अडवानीजींना मूर्च्छा आली असेल का? ‘अयोध्येत येऊन आपण काय बांधले, काय पाडले, आणि काय केले?’ असे प्रश्न बाबरापासून अनेकांना पडल्यावाचून राहतील का? महाराष्ट्रप्रमुख श्रीमान उधोजीसाहेब यांनी दोनदा अयोध्येऐवजी काठमांडूला जाऊन यायला हवे होते का? हादेखील एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. पुन्हा असो!

श्रीमान खड्‌गप्रसाद ओली यांच्या नामोल्लेखाचा धांडोळा आम्ही संत तुलसीदासांच्या दोह्यांमध्ये घेत असताना आम्हाला एक यथोचित दोहा सांपडला. तो असा-
लसी पावस के समय, धरी कोकिलन मौन,
अब तो दादुर बोलिहं, हमें पूछिह कौन?
अर्थ : पावसकाळ आला की कोकिळ गप्प होतो, पण बेडकं ‘डरांव डरांव’ करून ‘तू कोण बे?’ ऐसे विचारू लागतात! असोच!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com