ढिंग टांग : वाघाचे पंजे!

Dhing-Tang
Dhing-Tang

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक.
(मा. उधोजीसाहेब पिंजऱ्यातील वाघाप्रमाणे खोलीत येरझारा घालत आहेत. मधूनच गुरगुरत आहेत. हाताची मूठ वळून हवेत ठोसे लगावत आहेत. एकंदरित मामला गरम आहे. एवढ्यात खोलीच्या दारावर टकटक होते. अब आगे...)
उधोजीसाहेब : (करड्या सुरात) कोणाय? गुर्रर्र..!
चि. विक्रमादित्य : (खट्याळ सुरात) हिर्रर्र...हिर्रर्र! मे आय कम इन बॅब्स?
उधोजीसाहेब : (नाइलाजाने) मास्क लावला असेल तरच प्रवेश करा! अन्यथा निघून जा!! गुर्रर्र!!
विक्रमादित्य : (दारात उभे राहून) व्हाट्‌स अप? काय चाल्लंय? गुरगुरताय का असे?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उधोजीसाहेब : (गोरेमोरे होत) कुठे काय! काहीही नाही!!
विक्रमादित्य : (दिलासा देत) सोडा आणू? हल्ली एकाच जागी बसून बसून फार त्रास होतो! परवा एक गंमतच झाली- 
उधोजीसाहेब : (घाईघाईने खुलासा करत) वाघांचा विचार करतोय! सोडा कसला आणतोस? वाघ काय सोडा पितो?
विक्रमादित्य : द्या टाळी! मीपण वाघांची काळजी करतोय!
उधोजीसाहेब : महाराष्ट्रातला प्रत्येक वाघ मी वाचवणारच! अर्थातच वाचवणार! किंबहुना वाचवल्याशिवाय राहणार नाहीच! वाघ ही शेवटी माझीच जबाबदारी आहे. मी काल मोदीजींना पत्र लिहिलंय- तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो!
विक्रमादित्य : (बुचकळ्यात पडत) कसली जबाबदारी?
उधोजीसाहेब : अर्थात वाघांची! मेळघाटातल्या व्याघ्र प्रकल्पातून हे लेकाचे रेल्वेमार्ग काढताहेत! असा बरा काढू देईन!! तिथे रेल्वेगाड्या धावायला लागल्या तर वाघांनी काय स्टेशनात येऊन उभं राहायचं? नॉन्सेन्स!!
विक्रमादित्य : (निरागसपणे) वाघांनासुद्धा रेल्वेची तिकिटं काढावी लागतील का बॅब्स?
उधोजीसाहेब : (दुर्लक्ष करत) मेळघाटातल्या वाघांचं भविष्य धोक्‍यात येईल अशानं! (सात्त्विक संतापानं) अरे, वाघ आहेत म्हणून महाराष्ट्र आहे! आणि महाराष्ट्र आहे, म्हणून देश आहे!! एका जरी वाघाला धक्का लागला तर या उधोजीशी गाठ आहे म्हणावं!! फाडून खाईन!!
विक्रमादित्य : (इम्प्रेस होत) वॉव!! तुम्ही वाघासाठी इतकं करताय! खरंच तुस्सी ग्रेट हो, बॅब्स!!
उधोजीसाहेब : (फुशारून) वाघाचा बच्चा आहे मीसुद्धा! असा तसा नाही!!
विक्रमादित्य : (पुन्हा निरागसपणे) मागल्या वेळेला मुनगंटीवारकाकांनी कचकड्याचा वाघ आणला होता आपल्या घरी! तेव्हा वाघ आला म्हणून वरच्या मजल्यावरून खाली येत नव्हता तुम्ही!! हाहा!!
उधोजीसाहेब : (गडबडून) हॅ:!! काहीतरीच!! कचकड्याच्या काय, मी खऱ्या वाघालासुद्धा घाबरणार नाही!! मेळघाटातल्या वाघांच्या भवितव्यासाठी मी काल मोदीजींना पत्र लिहिलंय! म्हटलं- तो रेल्वेमार्ग करू  नका! अशानं तिथल्या वाघांची जाम पंचाइत होईल!! 
विक्रमादित्य : (विचारात पडत) ॲक्‍चुअली, मीसुद्धा त्यांना सेम टु सेम पत्र लिहिलंय! ताडोबा अभयारण्याच्या क्षेत्रात खाणींना परमिशन देऊ नका, असं सांगितलंय!! बघू या, माझं ऐकतात की तुमचं!!
उधोजीसाहेब : (ठामपणाने) दोघांचंही ऐकतील! मेळघाट काय, ताडोबा काय, किंवा मुंबईतला काय...वाघ वाचलाच पाहिजे!! मोदीजींचं मतपरिवर्तन व्हायलाच हवं! 
विक्रमादित्य : आपण मोदीअंकलना कचकड्याचा वाघ गिफ्ट पाठवू या का? किंवा एखादं वाघाचं चित्र? 
उधोजीसाहेब : (विचारात पडत) नको!  त्यापेक्षा त्यांना आणखी एक पत्र पाठव तूच! म्हणावं- प्रिय मोदीअंकल, महाराष्ट्रातले वाघ वाचवा! वाघ धोक्‍यात आला, तर महाराष्ट्राचं वाळवंट होईल... 
विक्रमादित्य : (इनोसंटपणाची कमाल!..) वॉव! महाराष्ट्राचं वाळवंट!!...राजस्थानसारखं ना बॅब्स?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com