ढिंग टांग : आत्मनिर्भर सिंह!

ब्रिटिश नंदी
Tuesday, 11 August 2020

विनम्र भावाने दोन्ही हात (पुढ्यात) बांधून रक्षामंत्री राजनाथजी उभे होते. तंत्रज्ञाननिपुण अभियंते आणि सर्वशक्तिमान असे मेक्‍यानिक जे की माननीय श्रीश्री नमोजीसाहेब हातात पाना आणि स्क्रू ड्रायवर घेऊन समोर पसरलेल्या सुट्या यांत्रिक भागांकडे एकटक  पाहात होते. समोर एका पायाने लंगडा, कमरेत वाकलेला एक यांत्रिक सिंह उभा होता. हाच तो बहुचर्चित ‘मेक इन इंडिया’चा सिंह!

विनम्र भावाने दोन्ही हात (पुढ्यात) बांधून रक्षामंत्री राजनाथजी उभे होते. तंत्रज्ञाननिपुण अभियंते आणि सर्वशक्तिमान असे मेक्‍यानिक जे की माननीय श्रीश्री नमोजीसाहेब हातात पाना आणि स्क्रू ड्रायवर घेऊन समोर पसरलेल्या सुट्या यांत्रिक भागांकडे एकटक  पाहात होते. समोर एका पायाने लंगडा, कमरेत वाकलेला एक यांत्रिक सिंह उभा होता. हाच तो बहुचर्चित ‘मेक इन इंडिया’चा सिंह!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असंख्य चक्रे, पुल्या, पट्टे, दांड्या, बटणे आदींनी बनलेला तो यंत्र वनराज आज अजीजीने (कसाबसा) उभा होता. इतकेच काय, तो डरकाळी मारतो आहे की विव्हळतो आहे, याचीही टोटल कुणाला लागत नव्हती! या सिंहात पुनश्‍च जान भरावी आणि सारा दिक्काल त्याच्या डरकाळीने दुमदुमावा, अशीच साऱ्यांची इच्छा होती. पण ते व्हावे कसे...अं? त्याला एकच उपाय! तंत्रनिपुण प्रो. नमोजी यांचे फेमस ‘जनता ग्यारेज’ !  

मा. नमोजींना एखादी गोष्ट सुधरेना, याचा अर्थ समस्या जटिल असणार यात शंकाच नव्हती. रक्षामंत्र्यांनी (पुढ्यात) हात बांधलेल्या अवस्थेतही ते ताडले. तथापि, तंत्रनिपुण नमोजींची तंद्री भंग करण्याचे धाडस त्यांना होईना. यात बराच वेळ गेला...

‘‘मान्यवर, क्‍या मैं आपसे प्रश्न पूछ सकता हूं की, आप किस समस्या में उलझे हो?’’ रक्षामंत्र्यांनी दोन्ही हात (पुढ्यातच) बांधलेले ठेवून अधोवदनाने विचारले. 
‘‘आ मेक इन इंडियानो सेर च्यालतो नथी के?’’ तंत्रनिपुण नमोजींनी उगीचच विचारले.

‘‘चलता तो है, किंतु बहुतही धीरे धीरे! उसकी दहाड भी किंचित क्षीण सुनाई देती है!’’ रक्षामंत्री राजनाथजींनी (पुढ्यात) हात बांधून कंप्लेंट सांगितली. ‘शुद्ध घी’मध्ये तळलेले रक्षामंत्र्यांचे शब्द ऐकून तंत्रनिपुण नमोजी किंचित थरथरले. पण त्यांनी चेहरा निर्विकार ठेवला. इतका वेळ तो यांत्रिक सिंह याने की शेर (उच्चार : सेर) दिडक्‍या पायावर गुमान उभा होता. त्याची लोखंडी आयाळ भयाकारी होती खरी, परंतु, कमरेत थोडा चेपल्यागत झाला होता. 

‘‘टोटल सर्विसिंग अने ओइलिंग करवु पडसे!’’ बराच वेळ टक लावून बघितल्यानंतर तंत्रनिपुण नमोजीसाहेबांनी जाहीर केले. कुठलाही बंद पडलेला खटारा अथवा इंजिन झटक्‍यात चालू करून दाखवण्यात तंत्रनिपुण नमोजी वाकबगार आहेत. त्यांच्याकडे आपले वाहन दुरुस्त व्हावे, म्हणून मोठमोठाले लोक वेटिंग लिस्टवर नंबर लावून बसतात.

‘‘यह कहना उचित होगा की लोह की इस प्रतिमा को यदि हम पूरी तरह से नये शस्त्रभूषांकित वनराज में परिवर्तित कर दें, तो राष्ट्र के रक्षा हेतु उसका हम उपयोग कर सकते है...,’’ राजनाथसिंहजींनी (पु. हा. बां.) आपली विनंती अभिव्यक्त केली. तंत्रनिपुण नमोजींच्या डोळ्यांत पाणी आले! ते रक्षामंत्र्यांच्या विशुद्ध हिंदीमुळे आले की दुरुस्तीसाठी आलेल्या ‘मेक इन इंडिया’च्या सिंहाकडे पाहून आले, हे कळू शकले नाही.  

...थोड्याच वेळात तंत्रनिपुण श्रीश्री नमोजींनी आपल्या हातातील पाना आणि स्क्रू ड्रायवरची जादू दाखवली. ‘मेक इन इंडिया’च्या यांत्रिक वनराजाने शेपूट दाणकन मागे आपटली आणि एक गगनभेदी डरकाळी मारली.-‘हॉऽऽऽव!!!’
चपळाईने मागे सरलेल्या रक्षामंत्र्यांना त्याच्या डरकाळीत राफेल विमानांचा उड्डाणध्वनी, तोफांचा भडिमार, संहारक क्षेपणास्त्रांचा क्रोधाग्नी, बॉम्बचा वर्षाव, रायफलींचा गोळीबार असे अनेक आवाज एकाच वेळी ऐकू आले. पुढ्यात बांधलेले हात सोडून त्यांनी दोन्ही कानांत बोटे घातली आणि म्हणाले- ‘आत्मनिर्भर सिंह की जय हो!’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article Dhing Tang