ढिंग टांग : सर्जिकल आणि डिजिटल!

ढिंग टांग : सर्जिकल आणि डिजिटल!

रणगाडा रोंरावत निघाला...क्‍याप्टन जोशात आला. अब होगी जंग! ऐसी जंग जो आज तक किसीने नहीं देखी! किसीने नही सुनी, और किसी ने नही कही!!
क्‍याप्टनच्या नजरेसमोर युद्धभूमी पसरली होती. समोर अक्राळविक्राळ पर्वतरांगा. मोठा दुर्गम भाग. इथं गवताचं पातं उगवत नाही. चहू दिशांना बर्फाने झांकलेले राखेचे ढिगारे जणू. अशा इलाख्यात लढण्यासाठी खास प्रशिक्षित जवानच हवा. क्‍याप्टन अगदी तस्सा होता. धडाकेबाज. डेरिंगबाज.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तलवारबाज! फौज त्याच्या शब्दाबाहेर नव्हती. त्याच्या बोटांच्या संकेतांनिशी पायदळ हले. विमानदळ उडे, आणि नौदल तरंगे. त्वेषात येऊन क्‍याप्टन स्वत: आघाडीच्या रणगाड्यावर स्वार झाला. ‘‘चलो, आगे बढो!’’ तो ओरडला. स्टार्ट! ‘‘टॅंगो चार्ली टॅंगो चार्ली...मूव्हिंग अहेड!’’ क्‍याप्टनने जोशात वायरलेसवरुन संदेश पाठवला.

बस्स! हाच तो क्षण, हीच ती वेळ! आता कुठल्याही क्षणी युद्धाला सुरवात होणार. क्‍याप्टन युद्धकलेत प्रवीण होताच. रिकाम्या वेळेतही तो युद्धाचाच विचार करी. क्‍याप्टनच्या इशाऱ्यासरशी थोड्याच वेळात सारी पलटण शत्रूच्या मुलखाकडे धावून जाईल. मग एकच रणकंदन होईल. धुमधडाड. गोळाबारी. बॉम्बफेक. आरोळ्या. मारो काटो. फेंकदो, उडा दो...वगैरे.
धुमश्‍चक्रीत सारा देश दंग होईल. दंग राहील. सारं जग पाहात राहील. क्‍याप्टनची मर्दुमकी दशदिशांना दुमदुमेल. चलो स्टार्ट! बंदूक कुठे आहे? ओह, अखेर युद्ध पेटलं तर!

‘अरे बघता काय, आता माघार नाही. पुढे व्हा! दाखवा शत्रूला तुमचं सामर्थ्य! मी स्वत: तुमच्या साथीला आहे!’’ क्‍याप्टन तारस्वरात ओरडला... थंडी मी म्हणत होती. क्‍याप्टनही मी म्हणत होता. तो नेहमीच मीमी म्हणतो. पण आजचा त्याचा आवेश निराळाच होता. अंगात बारा हत्तींचं बळ आलं होतं. छप्पन इंची छातीत सिंहाची दिलेरी होती. सरहद्दीकडे अंगुलीनिर्देश करुन तो ओरडला, ‘‘ आ-क्र-म-ण!!’’

जसं वाटलं होतं तस्संच घडलं. युद्धविमानं सुसाट सुटली. भोंगे वाजवत युद्धबोटी शत्रूसागराकडे झेपावत निघाल्या. क्षेपणास्त्रांनी आपापली टोकं भराभर वळवली. कळ दाबण्याचा अवकाश, ती आकाशात झेपावून शत्रूमुलखात जाऊन आदळली असती. दाबू का बटण, दाबू? पण क्‍याप्टन समंजस होता. एकेक क्षेपणास्त्र म्हणजे जीविनहानीची हमी. बटण दाबताच, शत्रूमुलुख क्षणार्धात बेचिराख होईल. तसे ते सोपे आहे. क्‍याप्टनने मनात आणले तर दहा मिनिटात सगळा किस्सा खतम झाला असता. पण क्‍याप्टन मनाशी म्हणाला : खरा सामर्थ्यवान तोच असतो, जो युद्ध टाळतो. जे लेखणीनं जमतं, वक्तृत्त्वानं जमतं, त्यासाठी तलवार वापरु नये.

क्‍याप्टनने मनात आणले असते तर दाती तृण धरुन शत्रू चीची करत शरण आला असता. पांढरे निशाण फडकवत मनधरण्या करु लागला असता. साऱ्या जगाने क्‍याप्टनचा लोहा मानला असता.....रणगाड्यावर बसून दृढनिश्‍चयी चेहरा करुन क्‍याप्टन स्वत:शीच म्हणाला, ‘‘तरी मी त्यांना खूप संधी दिली होती. त्यांच्यासाठी काय नाही केलं? जेवलो, खेळलो, झोपाळ्यावर बसून झोके घेतले. पण त्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहिलं.’’ आता क्षमा नाही!

एवढे बोलून क्‍याप्टनने हातातील मोबाइलची कळ दाबली. सटासट सटासट गोळीबार करत दहाव्या मिनिटाला तो ओरडला, ‘‘गेम ओव्हर! मी जिंकलो!’’
मोबाइमध्येच पबजीचा आणखी एक गेम खेळावा की नको, याबद्दल क्‍याप्टन विचार करु लागला. शेवटी म्हणाला, जाऊ दे, नकोच!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com