ढिंग टांग : कावळे!

ब्रिटिश नंदी
Saturday, 5 September 2020

‘काकशाही आघाडीचा विजय असो... काव काव!,’’ एक संतप्त कावळा बेंबीच्या देठापासून ओरडला. बाकीच्या कावळ्यांनी त्याला साथ दिली. तारेवर रांगेने कावळे बसले होते. काही उडून पुन्हा बसत होते. काही बसून पुन्हा उडत होते.

‘काकशाही आघाडीचा विजय असो... काव काव!,’’ एक संतप्त कावळा बेंबीच्या देठापासून ओरडला. बाकीच्या कावळ्यांनी त्याला साथ दिली. तारेवर रांगेने कावळे बसले होते. काही उडून पुन्हा बसत होते. काही बसून पुन्हा उडत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘आपण किती जण आहोत?’’ एका कावळ्याने उत्सुकतेने विचारले. ‘‘तेरा! जास्त असतील तर दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे आले असतील, आणि कमी असतील, तर त्यांनी पक्षांतर केलं असं समजा!’’ एक हुशार कावळा म्हणाला. त्याच्या एका डोळ्यात बिरबलाचे चातुर्य होते.

‘पक्ष म्हंजे भाद्रपद कृष्ण पक्षच ना?’’ एक भुकेला कावळा ओरडला.
‘‘दिवस काय आलेत, आणि तुम्ही काय बोलताय? सतत आपला एक डोळा पिंडावर, ही वृत्ती बरी नाही!’’ एका सच्छील कावळ्याने चोच मारली.
‘‘सर्वात आधी मंदिरं उघडा, मंदिरं...क्राय?,’’ एका कावळ्यानं थेट मुद्द्यालाच हात घातला. तो नुकताच जवळच्या मंदिराच्या कळसावरुन उडत तारेवर येऊन बसला होता.

‘गेल्या कित्येक दिवसात चोचीत अन्नाचा कण नाही! भुकेनं मरायची पाळी!’’ आणखी एक कावळा वैतागाने म्हणाला. सगळंच कावळे भयंकर कावले होते.
‘...पण केसेस वाढताहेत, त्याचं क्राय?,’’ गंभीर प्रकृतीच्या कावळ्याने सामाजिक अंतर ठेवून समंजस सूर लावला. ‘‘केसेस वाढताहेत म्हंजे? वाढणारच. इथे आरोग्याच्या सोयी कुठे आहेत?’’,तरुण संतप्त कावळ्याने व्यवस्थेवर कोरडे ओढले. त्यावर त्याला ‘तुम्ही मास्क लावा आधी’ असे बजावण्यात आले.

‘हा असाच लॉकडाऊन सुरु राहिला ना, तर अवघड होईल! परवा परवापर्यंत त्या घराच्या खिडकीवर बसलं की ती माऊली पावाचे तुकडे तरी टाकत होती, हल्ली हाकलून देते!’’ एका कावळ्याने खंतावलेल्या सुरात कावकाव केली.
‘‘ लॉकडाऊननं लोकांचे हाल केले बाबा अगदी!’’ आणखी एका माणसाळलेल्या कावळ्याने आपले मत नोंदवले. त्याचे घरटे एका बहुमजली इमारतीलगतच्या गुलमोहरावर होते.

‘मला कळत नाही, यांचा मंदिरांवर इतका आकस का?,’’ मंदिराच्या कळसावर राहणाऱ्या कावळ्याने आपला आग्रह सोडला नाही. ‘‘पण तुमचा एवढा आग्रह का? एवढे देवभोळे तुम्ही कधीपासून झालाऽऽत?’’ हिलवर राहणाऱ्या कावळ्याने हिरीरीने वाद घालायला प्रारंभ केला. 
‘ते काही नाही, लौकरात लौकर यांनी बंदी उठवली नाही तर यांच्या पिंडाला शिवायचं नाही, अशी आपण प्रतिज्ञा करु या!’’ एका क्रांतिकारक कावळ्याने थेट पवित्रा घेतला. 

‘याला कावळकी म्हणत नाहीत बरं का! एका गोळाभर पिंडासाठी इतकं टोकाला जाण्याची गरज नाही!’’ समंजस कावळ्याने हळूवार शब्दात सुनावले. क्रांतिकारक कावळा चडफडत तारेवरुन उडाला, पुन्हा बसला. 
‘‘आपण या लोकांच्या घराच्या खिडक्‍यांवर जाऊन काव काव करु आणि पाहुणे येणार असल्याची खोटी वर्दी देऊ! कसले टरकतील...ना?’’ 
एका अवखळ कावळ्याने अभिनव आंदोलनाची आयडिया काढली.
‘‘कावळा आहेस की गाढव! हल्ली पाहुणे येत-जात नाहीत कुणाकडे! वेडा कुठला!’’ एका कावळ्याने माहिती पुरवली. ‘‘एकेकाळी लोक कावळ्यांना दहीभाताची उंडी देत होते, आता हाकलून देतात!’’ एका बुजुर्ग कावळ्याने आपले वृद्ध पंख फडफडवत प्रतिक्रिया नोंदवली.

‘समोर पिंड आहेत, पण चोच मारता येत नाही, अशी अवस्था!’’ एका कावळ्याने आपले दु:ख व्यक्त केले.‘‘यालाच महामारी म्हणतात, बाळा, यालाच महामारी म्हणतात!’’ बुजुर्ग कावळ्याने मान हलवत सांगितले. महामारीत अकाली गेलेल्यांचे पिंड पुढे पडले होते. त्याच्याकडे टक लावून पाहात कावळे बसून राहिले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article on Dhing Tang

Tags
टॉपिकस
Topic Tags: