esakal | ढिंग टांग : कुटुंबप्रमुख : एक असहाय प्राणी! 
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

मा. साहेब (मा. मु. म. रा.) यांच्या चरणी लाख लाख दंडवत आणि मानाचा मुजरा. पत्र लिहिण्यास कारण कां की, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही योजना आपण जाहीर केल्यानंतर माझी अवस्था ना घर का, ना घाट का अशी झाली आहे. आजवर मी कुटुंबप्रमुख या नात्याने घरच्या घरीच जबाबदारी पार पाडत होतो.

ढिंग टांग : कुटुंबप्रमुख : एक असहाय प्राणी! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

मा. साहेब (मा. मु. म. रा.) यांच्या चरणी लाख लाख दंडवत आणि मानाचा मुजरा. पत्र लिहिण्यास कारण कां की, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही योजना आपण जाहीर केल्यानंतर माझी अवस्था ना घर का, ना घाट का अशी झाली आहे. आजवर मी कुटुंबप्रमुख या नात्याने घरच्या घरीच जबाबदारी पार पाडत होतो. परंतु, कुटुंबाचे याबाबत मतभेद होते. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेसंबंधात मी आमच्या कुटुंबीयांस माहिती देण्याचा प्रयत्न केला असता ‘जबाबदारी म्हणे! तोंड बघा आरशात’ असे ऐकून घ्यावे लागले. असो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गावोगावच्या नामनियुक्त व सहभागी आरोग्यसेवकाने आपापल्या विभागातील कुटुंबांना भेटी देऊन त्यांची आठवडा-पंधरा दिवसातून एकदा विचारपूस करावी, अशी ही योजना असल्याचे कळले. कागदावर ही योजना भलतीच उदात्त आणि सकारात्मक वाटत असली तरी प्रत्यक्षात त्यात धोके अधिक आहेत, असे वाटू लागले आहे. या योजनेतील सहभागी आरोग्यसेवक हा एका अर्थी अनेक कुटुंबांचा ‘कुटुंब प्रमुख’ ठरतो. कुटुंब प्रमुखाप्रमाणे त्याने आपल्या भागातील कुटुंबांची काळजी घ्यावी, असे ही योजना सांगते. परंतु, इथेच खरी मेख आहे. ही योजना कार्यान्वित करण्यापूर्वी एखादी आचारसंहिता आपण जाहीर करावी, व त्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी विज्ञापना आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आचारसंहितेतील काही कलमे खालीलप्रमाणे असावीत -
१) कुटुंबप्रमुखांना ओळखपत्र द्यावे, तसेच संरक्षणही द्यावे. काही सोसायट्यांमध्ये घराचे दार वाजवणाऱ्यावर अनवस्था प्रसंग ओढवल्याच्या घटना घडल्या आहेत. आमच्या आळीतील एक समाजसेवी तरुण एका घरी ‘काही हवंय का?‘ असे विचारवयास गेला असता त्यास ‘लाकडं’ असे उत्तर मिळाले. नंतर दार नाकावर हापटण्यात आले.
२) ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेतील आरोग्यसेवक हा नावापुरताच कुटुंब प्रमुख असेल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात यावे. या कलमाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, याची कृपया नोंद घेण्यात यावी.
३) विचारपूस करावयास गेलेल्या ‘कुटुंबप्रमुखा’स भाजी वा दळण वा मिसळ पार्सल आणून द्या, असे फर्मावण्यात येऊ नये.
४) मिसळ पार्सल आणण्यास एखाद्या कुटुंबाने सांगितलेच, तर ‘कुटुंबप्रमुखा’च्या मिसळ प्लेटीचे पैसे वेगळे आकारण्यात येतील, हे आचारसंहितेतच स्पष्ट केलेले ठीक राहील.
५) ‘मिसळ पार्सल आणून देणारा माणूस’ अशी कुटुंब प्रमुखाची इमेज समाजात तयार होऊ नये. ती घातक आहे.
६) ग्यासचा सिलिंडर लावून देणे, संपलेला बदलून आणणे, पंखा पुसून घेणे, लादी साफ करणे, भांडी घासणे, फ्रीज हलवून मागील बाजूस मरुन पडलेली पाल काढून देणे, आदी घरकामे ही घरातल्या खऱ्या खुऱ्या कुटुंब प्रमुखानेच पार पाडायची आहेत. ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या योजनेतील ‘कुटुंबप्रमुख’ फक्त विचारपुशीपुरता आहे, हे सर्वप्रथम जाहीर करण्यात यावे.
७) कुटुंबप्रमुख चौकशीसाठी चाळीत आला, की त्याला लागलीच गराडा घालून हैराण करु नये. सोशल डिस्टन्सिंगचे यथोचित पालन व्हावे, अशी अपेक्षा आहे.
८) सर्वात महत्त्वाचे : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेअंतर्गत ‘कुटुंबप्रमुख’ या पदावर नियुक्त झालेल्या कुठल्याही बिचाऱ्या व्यक्तीला चारचौघांत ‘अहो, कुटुंबप्रमुखसाहेब’ अशी कुत्सितपणे हाक मारू नये.
९) योजनेतील ‘कुटुंबप्रमुखा’स स्वत:च्या घरातील घरकामामध्ये कायदेशीर सवलत मिळावी, ही विनंती.

Edited By - Prashant Patil