ढिंग टांग : गॉट वेल सून!

ढिंग टांग : गॉट वेल सून!

फ्रॉम द डेस्क ऑफ - ऑनरेबल प्रेसिडेण्ट ऑफ युनायटेड स्टेट्‌स,
१६००, पेनसिल्वानिया अवेन्यू, एनडब्ल्यू, वॉशिंग्टन डीसी.
(स्ट्रिक्‍टली कॉन्फिडेन्शल, फॉर युअर आइज ओन्ली!)
हे देअर माय डिअर बडी नमो, हौडी!! मी कालच इस्पितळातून परत आलो. ऑल इज वेल! इथल्याच एका लष्कराच्या इस्पितळात मला दाखल करण्यात आले होते. खरे सांगायचे तर मला कुठलाच त्रास नव्हता. पण रिस्क नको असे सगळ्यांचे मत पडले. लोकांच्या शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पडला. पण सगळ्यांत स्पेशल शुभेच्छा तुमच्या होत्या. तुम्ही पाठवलेले ‘गेट वेल सून’चे कार्ड मला इस्पितळातच मिळाले. ते वाचले आणि ताबडतोब कोविड नेगेटिव झालो! केवढा हा परिणाम! आय वॉज झॅप्ड!!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझी चाचणी पॉझिटिव आली आहे, असे मला ज्या सीआयएच्या अधिकाऱ्याने पहिल्यांदा सांगितले, त्याला मी ताबडतोब कामावरून काढून टाकले. नॉन्सेन्स!! असल्या बेकार बातम्या थेट मला येऊन सांगण्याचा त्याचा आगाऊपणा मला आवडला नाही. निवडणुकीतील माझे स्पर्धक जो बायडन यांच्या माणसांनी व्हाइट हौस पोखरले आहे, असा भास मला कधी कधी होतो. तसे मला बऱ्याच प्रकारचे भास होतात. पण ते जाऊ दे.

असल्या बंडल व्हायरसला घाबरणारा मी नव्हे. म्हणूनच मी कधी मास्क तोंडाला लावला नाही. परवा इस्पितळात दाखल होताना लावला, तेव्हा तोंडाची आग आग झाली. मास्कआडून मी सगळ्यांना फैलावर घेतले. जो बायडन हे गृहस्थ अगदीच घाबरट आहेत. मध्यंतरी आमची आमनेसामने चर्चा झाली. त्यावेळी त्यांना छत्तीस वेळा शेकहॅंड करायचे मी ठरवले होते. (तुम्हीच तर ही आयडिया मला शिकवली, टीचर! हाहा!!) पण जो बायडन दहा मीटर अंतर राखून उभेच राहिले. मला शेकहॅंड करता आला नाही. जाने दो. 

डिअर नमो, यू आर माय गुरु, माय फिलॉसफर, माय गाइड!! डिट्टो तुमच्यासारखाच मी निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. परवा इस्पितळातून बाहेर पडून मोटारीत बसून उगीच नसलेल्या गर्दीला हात दाखवून परत येऊन आडमिट झालो!! परवा त्या तुमच्या अटल बोगद्याचे उद्घाटन केलेत, तेव्हाही तुम्ही जीपमध्ये बसून कोणाला तरी हात करत होता? तेही समोर कुणीही नसताना! ते बघूनच मी प्रेरणा घेतली. उगीच मोटारीने एक चक्कर मारून आलो.

यंदाचे इलेक्‍शन मी तुमच्या स्टाइलनेच लढणार आणि जिंकणार! आपल्या दोघांची दोस्ती जगजाहीर आहे. ती तशीच राहायला हवी, म्हणून तरी मला ही निवडणूक जिंकायलाच हवी! रादर (पक्षी : किंबहुना) हा विचारच मला प्रेरणा देतो. त्यात तुमचे शुभेच्छा कार्ड मिळाले. त्यावर एक पिसारा फुललेला मोर होता आणि खाली लिहिले होते,- डिअर फ्रॅंड डोलांड, गेट वेल सून! त्या क्षणालाच मी खडखडीत बरा झालो! 

बाय द वे, व्हाइट हौसच्या हिरवळीवर पाच-दहा मोर आणून सोडा, असे फर्मान मी सीआयएच्या लोकांना सोडले आहे. या घटकेला किमान डझनभर  सीआयए एजंट मोर पकडायला देशोदेशी पळत असतील, याची खात्री आहे! आठवड्याभरात मीदेखील मोर आणून त्यांना दाणे खिलवणार आहे. निवडणुकीत चांगला इफेक्‍ट होईल, असे वाटते. बघूया!
टिल देन, बाय बाय! सी यू सून. 
युर्स डोनाल्ड (डोलांड)
ता. क. : मला कोरोना झालाच नव्हता! मीच कोरोनाला झालो, असे लोक आता म्हणतात. हाहा!! 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com