ढिंग टांग : २६/११ : एक संध्याकाळ!

ब्रिटिश नंदी
Friday, 27 November 2020

दर वर्षी असेच घडते, अशीच होते दिवेलागण, अशाश्वताचे उदास दिवे उकरुन काढतात जुनी आठवण

दरवर्षी असेच घडते काहीतरी होते गारुड प्रहर होतात उलटसुलट संध्याकाळी झरते गूढ

दर वर्षी असेच घडते,
अशीच होते दिवेलागण,
अशाश्वताचे उदास दिवे 
उकरुन काढतात जुनी आठवण

दरवर्षी असेच घडते
काहीतरी होते गारुड
प्रहर होतात उलटसुलट
संध्याकाळी झरते गूढ

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरवर्षी याच दिवशी 
विस्मृतीची झटकून चादर
तरातरा निघतो कुणी,
आणि गाठतो बोरीबंदर

काही तास राहातो उभा
पाहात बसतो नुसती वर्दळ
लोकलगाड्या, दिवे, भोंगे
गर्दी, वास, भूक, हलचल

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऐकू येतात उद्घोषणांचे
आवाज पडत राहतात कानी
भराभरा पाय उचलत
परतत असतात चाकरमानी

वीजनळ्यांच्या उजेडामध्ये
उजळत जाते बोरीबंदर
भूतकाळाच्या येराझारा
टर्मिनसच्या बाहर अंदर

इंडिकेटरचे आकडे तेव्हा
सांगत असतात गूढ काही
ओढघस्तीच्या गर्दीला तर
त्याचीसुध्दा फिकीर नाही. 

गर्दी गर्दी नुसती गर्दी
जणू मुंग्या खातात अळी
वाहून नेतात कलेवराला
नंतर खातात ताजी शिळी
पीक आवरच्या लबेद्यामध्ये
तो आहे मुकाच उभा
आठवणींचा येतो शहारा,
भूतकाळाच्या लवलव जिभा

गर्दी सतत चालत राहते
गाड्या सुटतात, कल्लोळ होतो
वर्दळीच्या चलचित्रात
त्याचा मात्र फोटो होतो.

आणि अचानक रुळ बदलतात
धक्के बसतात, होते खडखड
विस्मृतीच्या धुक्‍याआडून
ऐकू येते तीच धडपड

टर्मिनसच्या घुमटाखाली
उसळून उठतो एकच आक्रोश
किंकाळ्यांचे आवाज घुमतात
बंदुकीच्या नळ्या मदहोश

थडाथडा सुटतात गोळ्या
जणू रगडतो सैतान दाढा
थाळी वाजवत
 हडळ म्हणते,
‘‘माणुसकीचा पडो सडा!’’

कलेवरांचा
 निष्प्राण आक्रोश
विखुरलेले डबे, चपला
रक्तमांसाच्या
 सड्यात तेव्हा
जो संपला, तोच थांबला

 दरवर्षी असेच घडते...

दर वर्षी असेच घडते,
अशीच होते दिवेलागण,
अशाश्वताचे उदास दिवे 
उकरुन काढतात 
जुनी आठवण

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article on dhing tang

Tags
टॉपिकस
Topic Tags: