ढिंग टांग : नैमित्तिक रजा!

Dhing-tang
Dhing-tang

बेटा : (घाईघाईने अवतीर्ण होत) ढॅणटढॅऽऽण, मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : आलास? ये! तुझीच वाट पाहात होते!
बेटा : मी येत नाही, जातोय! जाणार म्हंजे जाणारच!!
मम्मामॅडम : (च्याट पडत) कुठे निघालास? ही एवढी मोठी बॅग कशाला घेतलीस?

बेटा : (घड्याळाकडे पाहात) अर्जंट निघालोय! येतो परत दोनतीन दिवसात! कतार एअरवेजचं विमान निघेल आता थोड्या वेळात! मला निघायला हवं!
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) पुन्हा सुट्टीवर निघालास? हे योग्य नाही! मी सुट्टी मंजूर करणार नाही!!
बेटा : (बॅग खाली ठेवत) वाटलंच होतं मला! म्हणून मी सुट्टीचा अर्ज टाकलेलाच नाही! विदाऊट पे सुट्टी करा! ऑन ड्यूटी निघालोय, असं समजा! पण मी जाणार म्हंजे जाणारच!
मम्मामॅडम : (आश्‍चर्यानं) कुठे?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेटा : (उत्तर न देता) गेल्या वर्षभरात वर्क फ्रॉम होम केल्यामुळे सगळ्या सुट्या शिल्लक आहेत माझ्या! मी हक्काची रजा टाकून जाऊ शकतो! पण तरीही मी रजा टाकणार नाही! मला प्रवास भत्तासुद्धा नकोय! पण मी जाणार म्हंजे जाणारच!
मम्मामॅडम : (अजीजीनं) आपल्या पक्षाचा स्थापना दिवस असताना, असं सुट्टीवर जाणं शोभतं का तुला? छे, छे! मी जाऊ द्यायची नाही हो तुला!!
बेटा : (थंडपणे) शोभतं! मी असेन तिथून ट्विट करीन! मी जिथे निघालो आहे, तिथं नेटवर्क आहे म्हटलं!! काहीही असलं तरी मी जाणार म्हंजे जाणारच!
मम्मामॅडम : (नाराजीनं) याचा अर्थ तू ऐकणार नाहीस!! यंदाही तू पक्षाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीस!!

बेटा : वेल, स्थापनेच्या वेळी तरी मी कुठे होतो?
मम्मामॅडम : (डोकं धरुन खुर्चीत मटकन बसत) ओह गॉड! आता हे कमळवाले फाडून खातील!! किती हसतील ते तुला!!
बेटा : (बेफिकिरीने) हसतील त्याचे दात दिसतील! आय डोण्ट केअर!! मला अर्जंटली जावं लागणार आहे! जाणार म्हंजे जाणारच!
मम्मामॅडम : (ओरडून) परत आल्यावर चौदा दिवस क्वारंटाइन व्हावं लागेल!!
बेटा : (सुस्कारा टाकत) आत्तासुद्धा क्वारंटाइन असल्यासारखाच आहे!!
मम्मामॅडम : (अतीव आग्रहाने) अजिबात कुठे जायचं नाही! स्थापना दिवसाच्या झेंडावंदनाला तू इथं दिसला पाहिजेस!! मी अजूनही पक्षाध्यक्ष आहे, हे विसरु नकोस!!
बेटा : (आळस देत) हू केअर्स! मी निघालोय!! पोचलो की फोन करतो!! जस्ट तुम्हा लोकांना सांगायला आलोय! (बॅग उचलत) जाणार म्हंजे जाणारच!
मम्मामॅडम : (घाईघाईने) थांब, थांब! काय अर्जंट आहे इतकं?
बेटा : (बॅग खाली ठेवत) मिलानला जातोय! इटलीला! आजोळी!!... काय म्हणणं आहे?
मम्मामॅडम : (कळकळीने) स्थापना दिवसाचा कार्यक्रम झाल्या झाल्या का नाही जात? इथं शेतकऱ्यांची अवस्था किती भयंकर आहे, कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे! अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे! तिकडे चीननं सरहद्दीवर नसती उठाठेव सुरु केली आहे! अशा परिस्थितीत देशबांधवांना वाऱ्यावर सोडून तू मिलानला निघालास, हे शोभतं का? तुझ्या गैरहजेरीत सगळी उत्तरं आम्हाला द्यावी लागतात, हे लक्षात ठेव!
बेटा : (युक्तिवाद करत) ट्विटरवर संदेश तर द्यायचा असतो! तो इथून दिला काय, इटलीहून दिला काय? की फर्क पईंदा? बरोबर ना? चलो, बाय! सी यु सून!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com